मलाला – पार्ट 2

आपली प्रतिक्रिया नक्की कळवा

मलाला आज 22 वर्षाची आहे. या वयात तिच्या वाट्याला नोबेलसहीत 50 हून जास्त आंतरराष्ट्रीय अॅवॉर्ड आले आहेत. तिने स्थापन केलेल्या मलाला फंडाला दरवर्षी 40 लाख डॉलर्स ( रुपये नाही) इतकी मदत मिळते. ती आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलेब्रिटी आहे. पाकिस्तानमधील एक दुर्लक्षित प्रांतातल्या मुलीने ही गगनभरारी घेतली ती कशाच्या जोरावर?

हेच आपण पाहणार आहोत मलालाला पुढच्या गोष्टीत….

हॉस्पीटलमधील पहिला फोटो

मलालावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तिला इंग्लडमध्ये उपचारासाठी हालविण्यात आले. तिच्या मेंदुला धक्का बसला असण्याची शक्यता होती. अतिशय निष्णात अशा डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर मलाला 8 दिवसानंतर म्हणजे 17 ऑक्टोबरला शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्यानंतर काही दिवसानंतर ज्यावेळी तिला थोडे बोलण्याचे त्राण आले त्यावेळचा तिने तिच्या वडिलांना विचारलेला प्रश्न होता. “ माझ्या शाळेच्या परिक्षेचे काय झाले.”

यानंतरही अनेक महिने ट्रिटमेंट सुरु राहिली. ऑपरेशनमागून ऑपरेशन करावे लागले. तिच्या चेहऱ्यावर प्लॉस्टिक सर्जरी करावी लागली. काही महिन्यानंतर तिला जेव्हा डिस्चार्ज मिळाला, त्यावेळी तिला तिच्या कुटुंबासह इंग्लमध्येच उपलब्ध करून दिलेल्या घरी जावे लागले. यावेळेपर्यत साऱ्या जगात तिचे नाव झाले होते, परंतू पाकिस्तामधील दहशतवाद्यांनी मात्र मलाला पाकिस्तानात आली तर तिला ठार मारण्यात येईल अशी धमकी दिली होती. पाकिस्तान सरकारही तिला सुरक्षा पुरविण्यासाठी सक्षम नव्हते, त्यामुळे तिला नाईलाजाने इंग्लंडमध्ये राहण्याचा निर्णय घ्यावा लागला.

मात्र यानंतरही ” मला शिकायला मिळाले पाहिजे आणि जगभरातली मुलींनाही शिकता आले पाहिजे.” या तिच्या मताशी मलाला ठाम होती. या दोन्ही गोष्टींवर तिची पुढची वाटचाल सुरु झाली.

बराक ओबामा, त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्या सोबत मलाला

तिने स्वत: इंग्लंडमधील एका शाळेत प्रवेश घेऊन तिचे राहिलेले शालेय शिक्षण पुर्ण केले. ते पुर्ण केल्यानंतर तिला ऑक्सफर्डमध्ये प्रवेश मिळाला. एका बाजूला स्वत:;चे शिक्षण पुर्ण करत असताना तिने जगभरातील मुलींना आपले शिक्षण पुर्ण करता यावे यासाठी लढा द्यायला सुरुवात केली. तिने अनेक मुलाखती दिल्या. त्यातून आपली भूमिका ती मांडत राहिली. तिचे हल्ल्यानंतरचे पहिले जाहिर भाषण झाले ते संयुक्त राष्ट्रसंघात, ते देखील तिच्या वाढदिवशी. तिचा 12 जूलै हा वाढदिवस संयुक्त राष्ट्रसंघाने ‘ मलाला डे” म्हणून साजरा केला. त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना ती भेटली. तिच्या मदतीसाठी जगभरातून पैशाचा ओघ सुरू होता. याच पैशातून तिने मलाला फंड उभा केला. त्यातून अनेक गरीब देशांमध्ये मुलींसाठी शाळा सुरु करण्यात आल्या.

मलालाला 2014 सालचे नोबेल पारितोषिक मिळाले. जगभरात सर्वाधिक प्रतिष्ठेचे हे पारितोषिक तिला एका भारतीयाच्या बरोबरीने देण्यात आले. या भारतीयाचे नाव होते कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी यांनादेखील हे पारितोषिक लहान मुलांसाठी करीत असलेल्या कामाबाबत देण्यात आले होते. 17 वर्षाची मलाला ही नोबेल मिळविणारी आजवरची सर्वात लहान व्यक्ती ठरली.

पाकिस्तानातील आपल्या शाळेला भेट

हे सगळ सुरू असताना मलालाने अनेकदा तिच्या घरी म्हणजे पाकिस्तानात जाण्याची इच्छा व्यक्त केली. परंतू पाकिस्तानात तिच्या सुरक्षेची हमी नव्हती आणि सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात फिरण्याची मलालाची इच्छा नव्हती. गेल्या आठ वर्षात ती केवळ एकदा दोन दिवसासाठी आपल्या घरी जाऊ शकली. तिने आपल्या हायस्कुलला भेट दिली, मैत्रिणींशी गप्पा मारल्या आणि परत आली.

अनेक जाहिर मुलाखतीमध्ये मलालाने पाकिस्तानची पंतप्रधान होण्याची आपली इच्छा व्यक्त केली आहे. नेल्सन मंडाला यांच्याबरोबरच बेनझीर भुट्टो यांना ती आदर्श मानते. पण पाकिस्तानातील बहुसंख्य समाज तिला देशद्रोही समजतो. तिने देशाची आणि धर्माची बदनामी केली असे मानतो.

पाकिस्तानचे हे दुर्देव म्हणावे लागेल, आतापर्यंत दोन पाकिस्तानी नागरिकांना नोबेल मिळाले. एक होते एक शास्त्रज्ञ आणि दुसरी मलाला. पहिल्याला पाकिस्तानने नाकारले ते अहमदिया म्हणजे ज्यांना पाकिस्तानात मुस्लीम समजले जात नाही अशा पंथाचे होते म्हणून. दुसऱ्या मलालाला त्यांनी नाकारले ते देश आणि धर्मविरोधी ठरवून.

त्यामुळे एकीकडे सुख समृद्धी आणि प्रसिद्धी पायाशी लोळण घेत असताना मलाला आपल्या घरापासून आणि देशापासून मात्र पारखी झालेली आहे.

मलाला प्रियांका चोप्रासोबत

आज केवळ 22 वर्षाची असलेल्या मलालासमोर अजून सगळे आयुष्य उभे आहे. या वयात तिने जे मिळविले ते मात्र कौतुकास्पद आहे. तिची अनेक भाषणे तसेच मुलाखती यु ट्युबवर उपलब्ध आहेत. त्या पाहिल्यावर तिची शिक्षणावरची निष्ठा, तिच्या बुद्धीचा आवाका लक्षात येतो.

मलालाचे जसे असंख्य प्रशंसक आहेत तसेच अनेक टिकाकारही. पाकिस्तानातील सर्वसामान्यांना तिच्याबद्दल काय वाटते हे सांगता येत नसले तरी या देशातील प्रभावशाली व्यक्ती आणि संघटना तिच्या ठाम विरोधात आहेत. एकंदरीतच इस्लामी जगातील कट्टरपंथीय मलालाचा व्देष करतात. मलाला हे इस्लामला बदनाम करण्यासाठी उभे केलेले पाश्चात्य जगाचे एक बाहुले आहे असे यांचे मत असते. याखेरीजही नोबेल द्यावे किंवा इतका उदोउदो करावा अशी खरेच तिची पात्रता आहे का हा प्रश्न उपस्थित करणारेही अनेकजण आहेत. भारतात मलालाबद्दल फार लोकांना माहिती नाही. भारतीय मिडिया तिच्यापासून दूर राहणेच पसंत करतो. एक तर पाकिस्तानी म्हणल्यावरच बहुतेकांच्या मनात तिच्याविषयी नकारात्मक भाव तयार होतात. अनेकदा मलाला तिच्या काही मतांमुळे भारतीयांच्या रोषाची बळी ठरलेली आहे. काश्मिरबद्दल आणि तेथील 370 कलम हटविण्याबद्दल तिची काही मते आहेत, ती बहुसंख्य भारतीयांना न पटणारी आहेत. परंतू याठिकाणी ही गोष्टदेखील लक्षात घेतली पाहिजे की या विषयावर भारत आणि पाकिस्तान यांची विशिष्ठ अशी राष्ट्रीय भुमिका आहे. एक पाकिस्तानी नागरिक म्हणूनही या भुमिकेच्या बाहेर न जाणे ही मलालाची मर्यादा आहे. इथे एक प्रसंग सांगितला पाहिजे, ज्यावेळी मलाला ओबामांना भेटायला गेली होती, त्या भेटीत तिने अमेरिका पाकिस्तानवर करत असललेल्या ड्रोन हल्ल्याबद्दल ओबामांसमोर नाराजी व्यक्त केली होती. एक पाकिस्तानी नागरिक म्हणून तिची ही भूमिका ओबामांनीही समजून घेतली. परंतू असे काही प्रसंग सोडले तर तिची भुमिका भारतविरोधी किंवा कोणत्याही विशिष्ठ देशाविरूद्ध आहे असे म्हणता येणार नाही. तिने तिचे कार्यक्षेत्र मुलींच्या शिक्षणापुरते मर्यादीत ठेवले आहे आणि या कार्यक्षेत्राला धर्म, भाषा, देशाच्या कोणत्याही मर्यादा नाहीत.

स्त्रीशक्तीची ताकद दाखवताना मलाला

मलालाने दिलेल्या एका मुलाखतीत तिने दिलेल्या उत्तराने ही गोष्ट आपण संपवू. तिच्यावर झालेल्या हल्ल्याच्या दिवशी सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका मॅडोनाने आपले एक गीत मलालाला समर्पित केले होते. मलालाच्या नावाचा टॅट्यू तिने तिच्या पाठीवर काढून घेतला होता. याच मॅडोनाचा अगदी कमी कपड्यात स्टेजवर उभा असलेला एक फोटो मलालाला दाखविण्यात आला आणि मुलाखत घेणाऱ्याने विचारले, “ असे कपडे महिलांना घालावेत की नाही याबद्दल तुझे काय मत आहे ?आणि असे कपडे घालावे अस तुला वाटत का ? ‘ यावर मलालाने दिलेले उत्तर असे होते, “ तिने काय कपडे घालावेत याचे तिला स्वातंत्र्य आहे, आणि मी काय कपडे घालावेत याचे मला स्वातंत्र्य असावे असे मला वाटते, तिच्या स्वातंत्र्याचा मी आदर करते आणि माझ्या स्वातंत्र्याचा तिला आदर आहे. एकमेकींबद्दलचा हा आदरच आम्हांला जोडण्याचे काम करतो.”

यावर आणखी भाष्य करण्याची गरजच नाही.

महाराष्ट्राला स्त्रीशिक्षणाची मोठी परंपरा आहे. मुलींच्या शिक्षणासाठी दगडधोंडे सोसणाऱ्या सावित्रीबाई फुले, त्यासाठी कष्ट सोसणारे धौंडो केशव कर्वे यांनी घातलेल्या पायावर स्त्रीशिक्षणाचे मोठे काम आपल्याकडे उभे राहिलेले आहे. याच मुलींच्या शिक्षणासाठी जीव पणाला लावणाऱ्या मलालाची आपण देश, प्रांत, धर्म भेद बाजूला ठेऊन कदर करायला हवी.

———————————————————————————

जाहिर निमंत्रण

कोरोनाच्या संकटकाळीही आपला शिकण्याचा ध्यास पुर्ण करत असलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना समर्पित

मित्रांनो,

आपण सगळे आज मानवजातीवर आलेल्या कोरोनाच्या या संकटाशी सामना करीत आहोत. याचवेळी जगात सगळीकडे आणखी एका विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे. ती म्हणजे कोरोनानंतर जग कसे असेल. (world after corona) आपणही या विषयावर खुली चर्चा सुरु करणार आहोत. तुम्हीदेखील कोरोनानंतर जग कसे असेल याबाबत तुमचे मत या चर्चेत मांडावे ही अपेक्षा आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.