माझ्याविषयी

हा ब्लॉग मी का सुरू केला. त्यावेळचा विचार हा वेगळा होता. पण आता मात्र या ब्लॉगचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाल्यासारखे वाटते आहे.  भारत परिक्रमा करण्याची इच्छा, त्यासाठी मदत मिळविणे हा याचा प्रमुख उद्देश होता. त्यानंतर अरेबियन नाईट्समधील गोष्टी त्यातून मांडाव्यात असे वाटू लागले. शरद पवारांच्या अनेक जुन्या काळातील मित्र व सहकाऱ्यांशी संबंधित एक पुस्तकाचे काम करीत होतो. या ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्यातील काही व्यक्तिचित्रे या ब्लॉगव्दारे मांडली. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. परंतू त्यानंतरही फॉलोअर्स वाढत नाहीत याची कारणे शोधताना सर्व मराठी ब्लॉगर्सला एकत्रित करण्याची गरज जाणवली. आता त्या दिशेने प्रयत्न करीत आहे.

असा हा प्रवास सुरू आहे.  तुमची साथ अर्थातच हवी आहे.

अलिकडील काही महिन्यात मला आवडणाऱ्या विषयांवर वेगवेगळ्या ब्लॉगवर चांगले लेख असतील तर ते उचलून माझ्या ब्लॉगवर टाकणे ऐवढाच एक उद्योग मी करतो आहे. माझ स्वत:चे असं लिखाण यावर खूपच कमी वाचायला मिळेल. पण माझ्या मते मी खूप वेगवेगळ्या विषयांवरील लेखन माझ्या ब्लॉगवर एकत्र केले आहे. एकत्रितरित्या ते वाचण्यातही वेगळीच मजा आहे.

भारत परिक्रमा करण्याचा विचारापासून जे विचारमंथन माझ्या मनात सुरू होते ते आता महाराष्ट्र परिक्रमेपर्यंत येऊन पोचले आहे. सर्वसामान्य माणसांच्या कुटुंबात एखादे मोठे आजारपण आले की सारे घर कोलमडून पडते. अशा कुटुंबाच्या मागे समाजाने उभे राहणे गरजेचे असते. असे मदतीचे हात उभे करण्याचे उद्दिष्ट ठेऊन ही पायी परिक्रमा करण्याचे मी ठरवतो आहे. एका वर्षात महाराष्टाच्या किमान पंचवीस जिल्ह्यात पोचून असे मदतीचे हात उभे करायचे. http://www.aarogyadaan.org या नावाने आम्ही वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून पेशंट व त्याचे नातेवाईक व दुसरीकडे अशांना मदत करण्याची इच्छा असणारे लोक यांना एकत्र आणण्याचे काम या परिक्रमेत करायचे आहे.

ही परिक्रमा 17 ऑक्टोबर 2020 पासून मी सुरू करतो आहे. रायगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्शिवाद घेऊन ही परिक्रमा सुरू होईल ती 22 सप्टेंबर 2021 रोजी शिवनेरी किल्ल्यावर संपेल. हा संपुर्ण प्रवास पायी असेल. 28 जिल्हे आणि 200 हून अधिक तालुक्यातून ही परिक्रमा जाईल. या प्रवासात मी जवळ पैसे बाळगणार नाही. लोकाश्रयावर जेवणाची तसेच राहण्याची व्यवस्था होईल. या प्रवासात आपली सर्वांची साथ मला हवी आहे.

याबाबतचा सविस्तर तपशील आपल्याला http://www.aarogyadaan.org या वेबसाईटवर पहायला मिळेल. या मार्गात जर आपण स्वत: किंवा आपल्या नातेवाईक, मित्र रहात असतील तर या उपक्रमात सहभागी व्हावे ही विनंती.