अयोध्या – सांस्कृतिक सौहार्दाचा इतिहास

अयोध्येचा वाद सर्वोच्च न्यायालयामार्फत मिटण्याच्या शक्यता वाढलेल्या आहेत. अयोध्या उर्फ साकेत हे स्थान भारताच्या सांस्कृतीक इतिहासात काशीप्रमाणेच महत्वाचे राहिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयातील वाद हा अयोध्येतील बाबरी मशीदीच्या जागी पुर्वी मंदिर होते की नाही आणि असल्यास कोणत्या धर्मियांचे यावर लढला गेला. वैदिक/हिंदूव्यतीरिक्त अन्य धर्मियांनीही त्यावर आपला दावा केला असला तरी तो मुख्यत्वेकरुन हिंदू-मुस्लमानांमधील वाद आहे असे समजले गेले. सांस्कृतीक प्रवाहात एकच स्थळ अनेक धर्म-पंथांच्या दृष्टीने महत्वाचे बनून जाऊ शकते अथवा त्याच स्थळी कालौघात वेगवेगळ्या वास्तु निर्माण होऊ शकतात.

भारताचा सांस्कृतीक इतिहास पाहिला तर लक्षात येईल की रामकथेच्या पुर्वीच हे स्थळ समन संस्कृतीच्या दृष्टीने महत्वाचे बनून गेले होते. जैन धर्माचे आद्य तीर्थंकर ऋषभनाथ यांचा जन्म अयोध्येलाच झाला. एवढेच नव्हे तर अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतीनाथ आणि अनंतनाथ  या तीर्थंकरांचा जन्मही अयोध्या येथेच झाला. बौद्ध साहित्यानुसार गौतम बुद्ध यांनी आठ वर्ष अयोध्या येथे वास्तव्य केले होते. ऋषभनाथ आणि अजितनाथ या ऐतिहासिक व्यक्ती होत्या असे मत डा. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि अनेक विद्वानांनी यजुर्वेदातील त्यांच्या उल्लेखावरून सिद्धही केले होते. असे असेल तर या तीर्थंकरांचा काळ निश्चयाने इसपू १००० पुर्वीचा आहे असे म्हणता येईल. म्हणजे अयोध्या ही एक बहुसांस्कृतीक नगरी म्हणून प्राचीन काळापासूनच पसिद्धीस आली होती असे आपणास म्हणता येईल. विशेष बाब म्हणजे जैनांचे रामायणही प्रसिद्ध असून जैनांनी रामासही आपला मानले होते असेही आपल्याला दिसते. एकंदरीत जैन, बौद्ध धर्माच्या दृष्टीने अयोध्या महत्वाची राहिली आहे. सर्व जीवांना समान मानणा-या, स्वत:तील विकारांवर विजय मिळवू पाहणा-या आणि तसे तत्वज्ञान अव्याहतपणे मांडत राहिलेल्या समन (जिन) संस्कृतीचा विकास होण्यात अयोध्या नगरीचा मोठा वाटा आहे. आणि तोच तिचा वारसा आहे.

राम मंदिराचे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत की नाहीत यावर अनेक उत्खनने होऊनही आजही वाद आहेत. असे असले तरी हे स्थळ रामजन्मभुमीच अशीही भारतभर श्रद्धा आहे. मुळात मंदिरे बांधण्याची संस्कृती फार उशीराची. पहिल्या शिव मंदिराचा नाणकीय पुरावा कुनिंद नाण्यावर मिळतो तो इसपू दिडशेमधील. तत्पुर्वी बौद्ध व जैन विहार, स्तूप, लेण्यांचे अस्तित्व विपूल प्रमाणात मिळते. हिंदू देवतांची प्रतीके व प्रतिमाही (उदा. शिवलिंग) सर्वत्र मिळतात. पण मंदिरे नाहीत कारण ती प्रथा उशीरा निर्माण झाली. अयोध्या येथील वादग्रस्त जागेवरील उत्खननांत अनेक अवशेष मिळाले असले तरी ते मंदिराचे आहेत की नाहीत यावर उभयपक्षी वाद आहे, आणि शिवाय ते पुरावे तेवढे प्राचीनही नाहीत. उलट पुरातत्वविद बी. बी. लाल यांनी १९७६ साली केलेल्या उत्खननात एक मृण्मयी जैन प्रतिमा मिळाली होती. कार्बन डेटींग नुसार ही प्रतिमा इसपू चवथे शतक एवढी प्राचीन निघाली. या स्थळी सापडलेली सर्वात प्राचीन प्रतिमा जैन आहे. किंबहुना जैन प्रतिमांतील भारतात आजवर मिळालेली ही सर्वात प्राचीन प्रतिमा आहे. तेथे जी विविध कालखंडातील नाणी, प्रतिमा मिळाल्या त्यांचा संबंध राम, सीता अथवा दशरथाशी असल्याचे कोणतेही सूचन मिळत नाही असा पुरातत्वविदांचा निर्वाळा आहे. असे असले तरी यावरुन रामजन्मही अयोध्येला झाला नाही असा मात्र निष्कर्ष काढता येत नाही. सध्याचा वाद खरे तर एका विशिष्ट स्थानावरील मालकीहक्काचा आहे. सांस्कृतीक वारसा नाकारण्याशी त्याचा काही संबंध नाही. खरे तर अयोध्येचा इतिहास अपवाद वगळता सांस्कृतीक सौहार्दाचा राहिला आहे. अगदी अठराव्या शतकापर्यंत ही परंपरा चालू राहिल्याचे दिसते.

अहिल्यादेवी होळकरांनी अयोध्येला राममंदिरासकट अजून चार मंदिरे बांधली तेंव्हा अयोध्येवर आसिफौद्दुला अमानी या सुभेदाराचे राज्य होते. १७३६ मध्ये अयोध्येच्या सुभेदाराचा दिवान केसरी सिंग याने अयोध्येला जन्म घेतलेल्या पाच तीर्थंकरांची पाच मंदिरे उभारली. मुस्लिम शासक असुनही ही मंदिरे उभारली गेली हा सांस्कृतीक सौहार्दाचा नमुना होता.  प्राचीन काळी येथे अनेक तात्विक वाद-विवाद लढले गेले असले तरी हिंसक संघर्षाचा इतिहास मात्र नाही. अयोध्या या नावाचा अर्थच आहे ’जेथे युद्ध केले जात नाही अशी भूमी’. या नगरीवर कोणा एका धर्माने “फक्त आमचीच” म्हणून दावा करणे या नगरीच्या सांस्कृतीक सहजीवनाच्या इतिहासावर अन्याय करणारे आहे. जैनांनी आपली तत्वधारा पाळत वादग्रस्त जागेवर अथवा शहरावर आपला दावा केलेला नाही. बौद्धांनीही आपल्या दाव्यात कडवेपणा येऊ दिला नाही. याचे भान ठेवत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो असेल तो असेल त्याचा सन्मान ठेवत सांस्कृतीक सौहार्दाच्या इतिहासाचे भान ठेवले पाहिजे.

-संजय सोनवणी  

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.