अरेबियन नाईटस

अरेबियन नाईट्सच्या कथासंग्रहातील कथा

कथा दोन मुर्खांची

दोन मुर्ख होते. एक रहात होता बगदादमध्ये,आणि दुसरा रहात होता कैरोमध्ये. बगदादचे लोक म्हणत या मुर्खाऐवढा मुर्ख सगळ्या जगात नाही. कैरोतले लोकही आपल्या गावातील मुर्खाला असंच म्हणायचे.

एक दिवशी कैरोमधील मुर्खाला बगदादमधील मुर्खाविषयी कळाले.आपल्यापेक्षा मुर्ख कोण कसा असू शकतो,या विचाराने तो बैचैन झाला. त्याने एक दिवस बगदादला जाऊन बगदादच्या मुर्खाची भेट घेतली.

आपल्यातील जास्त मुर्ख कोण याबाबत त्यांनी बराच वेळ चर्चा केली, पण त्यांचे एकमत होईना.शेवटी कैरोचा मुर्ख बगदादच्या मुर्खाला म्हणाला, “ आपण दोघेही आपल्या मुर्खपणाचा एक एक नमुना दाखवू, लोक ज्याला जास्त मुर्ख म्हणतील तो जिंकला.” बगदादच्या मुर्खाने मान्य केले.पहिला नमुना दाखवण्याचा मान त्यालाच मिळाला.

कार्टुनिस्ट – डॉ. शिवाजी गावडे – बारामती 

बगदादी मुर्खाने एक गाढव भाड्याने घेतले. त्यावर बाभळीच्या काट्याकुट्यांचे मोठमोठे भारे रचले. गावात मोठा बाजार भरला होता. मोठी गर्दी झाली होती. बगदादी मुर्खाने आपले गाढव त्या गर्दीत घातले. काठीने गाढवाला मारत पुढे पुढे घुसवत राहिला. गर्दीतील लोकांच्या कपड्यांना काटे लागून त्यांचे कपडे फाटू लागले, भाजी विकायला बसलेल्यांच्या अंगावर गाढव जाऊ लागले. लोक बगदादी मुर्खाच्या अंगावर ओरडले, “ अरे मुर्खा, ही काय गाढव घेऊन यायची जागा आहे काय? दुसरा रस्ता नाही का तुला.”बगदादी मुर्ख म्हणायला लागला, “ माझे घर येथे पलिकडेच आहे,मला येथूनच रस्ता आहे. “ गाढवाच्या ओरडण्याने आणि काटे टोचल्याने हैराण झालेले लोक त्याच्यावर रागाने धावून गेले. “अरे मुर्खा, आजच्या दिवस दुसऱ्या रस्त्यान जाता येत नाही का तुला, ही काय बाभळीचे भारे घेऊन जाण्याची जागा आहे का?” बगदादी मुर्खाचे एक टुमणे, “माझे घर पलिकडेच अगदी जवळ आहे, मला जाऊ द्या. “ असे म्हणून तो गाढव पुढे दामटतच राहिला. लोकांच्या हातातून त्यांचे सामान पडू लागले, त्यांचे कपडे फाटू लागले, त्यात गोंधळलेल्या गाढवाने आवाज काढून पाय झा़डायला सुरूवात केली, ते इकडे तिकडे सैरावैरा धावायला लागले. सगळीकडे गोंधळ उडला. अखेर सगळ्या लोकांनी बगदादी मुर्खाला पकडून चांगला चोप दिला. “ मुर्ख, मुर्ख, मुर्ख, मुर्ख ” हा शब्द त्याला अनेकदा ऐकायला मिळाला.

आपले दुखरे अंग घेऊन तो कैरोच्या मुर्खाकडे आला. त्याला म्हणाला, “ बघ, आहे का नाही मोठा मुर्ख, आता तरी तुझी खात्री पटली कि नाही.“ कैरोचा मुर्ख म्हणाला, “ तु कामगिरी तर खरच मोठी मुर्खपणाची केली, पण त्यात लोकांचे नुकसान झाले, त्यांचे नुकसान न होता मी तुला मोठा मुर्खपणा करून दाखवतो.”

कैरोच्या मुर्खाने बाजारात जाऊन टपोऱ्या गुलाबांची एक मोठी टोपली विकत घेतली. शहरात मध्यभागात सार्वजनिक संडास होते. पहाटेच्या वेळेसच कैरोचा मुर्ख त्या संडासाच्या वाटेवर जाऊन बसला. हातात पाण्याचे टमरेल घेऊन लोक घाईघाईने संडासाकडे येऊ लागले.त्यांना अडवून त्यांने टपोरे गुलाब त्यांच्यापुढे धरायला सुरुवात केली.“ गुलाब घ्या गुलाब, अगदी स्वस्त लावलेत, बघा कसा सुवास येतोय.”

कार्टुनिस्ट – डॉ. शिवाजी गावडे

लोक वैतागून म्हणायला लागले.“ चल, बाजूला हो.आमची कसली घाई आणि याची कसली घाई. ही काय गुलाब विकायची वेळ आहे का? “ पण कैरोचा मुर्ख त्यांची वाट अडवून पुन्हा पुन्हा त्यांना तेच म्हणत राहिला, गुलाब घ्या, गुलाब घ्या. टपोरे गुलाब खास तुमच्यासाठीच आणलेत. गुलाबाचे फूल त्यांच्या नाकाजवळ नेऊन त्यांना गुलाब घेण्यासाठी आग्रह करत राहिला. काहीजण त्याला चुकवून संडासाकडे पळाले, तसा तो त्यांच्यामागे धावत येऊलागला. त्याने एक धोशा लावला, “ गुलाब घ्या, गुलाब. माझी भवानी करा, स्वस्तात देतो. “ लोक त्याला हाकलायला लागले,पण तो लोचटपणाने त्यांच्यामागे जातच राहिला. त्यांच्या नाकासमोर गुलाब धरून त्यांना आग्रह करत राहिला.अगदी घाई लागलेला पळत पळतच आला. एक उघडा संडास बघून पटकन आत जाऊन बसला.कैरोचा मुर्ख त्याचे दार ठोठवत त्याला म्हणू लागला. “ अहो, दार उघडा कि जरा. गुलाब आणलेत, ते घ्या की. अहो घ्या की गुलाब. “

अखेर लोक वैतागले. त्यांनी त्याला पकडून चांगला चोप दिला, भरपूर मार खाल्यावर कैरोचा मुर्ख परत आपल्या घरी गेला. आता दोघे मुर्ख एकत्र बसून ठरवायला लागले, आपल्या दोघातील मोठा मुर्ख कोण ?

त्यांना काही उत्तर सापडले नाही.तुम्हाला सापडतय का बघा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.