
आजपासून फेअर अॅन्ड लव्हलीने आपले नाव बदलले. आजपर्यंत फेअर अॅन्ड लव्हली असलेली ही क्रीम आता ग्लो अॅन्ड लव्हली या नावाने ओळखली जाणार आहे.
अमेरिकेत उसळलेल्या Black lives Matter या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तुमच्या शरीराचा रंग हा काही तुमच्या हातात नसतो. पण तो रंग कसा आहे यावर आजही तुमची प्रतिष्ठा ठरत होती. आज फेअर अॅन्ड लव्हलीने नाव बदलल्याने यात काही फार फरक पडेल असे नाही, पण या दिशेने एक महत्वाचे पाऊल पडले असे म्हणता येईल.
गोऱ्या रंगाचे आकर्षण आणि गोऱ्या रंगाला असलेली प्रतिष्ठा ही जगभर दिसते. निग्रो काळ्या रंगाचे गुलाम गौरवर्णियांच्या देशात गेले तिथे काळे आणि गोरे यांच्यातील संघर्ष जास्त ठळक दिसतो. पण राम, कृष्ण, विठ्ठलासारखे अनेक काळ्या रंगाच्या देवांचे पूजन करणाऱ्या भारतातही गोऱ्या रंगाचे आकर्षक अनिवार आहे. वधू पाहिजेच्या जाहिरातीत बहुतांशी गोऱ्या रंगाची अपेक्षा आपल्याला दिसून येते. यामुळेच चेहऱ्याचा रंग गोरा करून देणाऱ्या मलमांना जगभर प्रचंड मागणी आहे. मार्केट ओळखून आपली उत्पादने खपविण्याचे तंत्र आज जुने झाले आहे. तर आपल्या उत्पादनाला मागणी निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून ते खपवण्याचा नवे तंत्र आज आहे. त्यानूसार गोऱ्या रंगाचे आकर्षण लक्षात घेऊन त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची व नंतर गोरा रंग होण्यासाठीची क्रीम खपवायची हे तंत्र फेअर अॅन्ड लव्हलीनेही आजवर राबवले आणि करोडो रुपयाचा नफा कमावला.
अमेरिकेत काळ्या रंगाच्या माणसाच्या जगण्याला काही किंमत आहे की नाही हा प्रश्न उभा राहिला तो एका काळ्या रंगाच्या माणसाच्या मानेवर तो मरेपर्यंत गुडघा रोवून ठेवलेल्या अमेरिकी पोलिसांच्या कृत्यामुळे. यामुळे साऱ्या अमेरिकेत आंदोलने सुरू झाली आणि ती हळू हळू साऱ्या जगभर पसरली. या आंदोलनांचे एक आजपर्यंत न दिसलेलेल वैशिष्ठ हे होते ती यामध्ये काळ्या रंगाच्या बरोबरीने गोऱ्या रंगाचे लोकही सामील होते. कदाचित हिच गोष्ट जगभराच्या मार्केटिंग कंपन्यांनी हेरली असावी. त्यामुळे आम्ही तुमच्या त्वचेचा रंग गोरा बनवतो असे सांगण्याऐवजी आम्ही तुमच्या त्वचेचा रंग उजळवतो असे म्हणणे या पुढच्या काळात जास्त फायद्याचे ठरेल असे या कंपन्याना वाटले असावे. त्याचाच एक परिणाम फेअर अॅन्ड लव्हलीने आपले नाव बदलण्यात झालेला दिसतो.
गोऱ्या रंगाचे आकर्षण यामुळे लगेच संपेल असे नाही, पण काळ्या माणसांच्या जगण्यालाही काही किंमत आहे यासाठीच्या लढ्यामधील हा एक अगदी छोटासा विजय झाला असे म्हणायला हरकत नसावी.
घनश्याम केळकर