
भारताच्या फाळणीच्या असंख्य कथा आणि कहाण्या आहेत. त्यातल्या बहुतेक मनाला दु:ख देणाऱ्या आहेत. त्यामुळेच कदाचित शालेय अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकातील फाळणी एक किंवा दोन वाक्यात संपते. पण प्रत्यक्षात लाखो कुटुंबाच्या सगळ्या आयुष्याला ही फाळणी वेढून राहिली आहे. काळाच्या ओघात हे घाव आता भरून येत आहेत. या फाळणीमधील एक कथा आणि व्यथा आहे जोगेंद्रनाथ मंडल यांची. आपल्याला आश्चर्य वाटेल पण भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातील पहिले कायदामंत्री हे हिंदू दलित होते. भारताचे हे कायदामंत्री होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पाकिस्तानचे होते जोगेंद्रनाथ मंडल. ही कथा आहे, पण यातली व्यथा अशी आहे की ` हिंदू ` भारतात दलितांवर अन्याय होईल म्हणून `मुस्लिम` पाकिस्तानमध्ये राहण्याचा आग्रह धरणाऱ्या या नेत्याला दु:खी अंत:कऱणाने आपले स्वत:चे पुर्व पाकिस्तानातील गाव सोडून कलकत्त्यात परतावे लागले आणि आपल्या आयुष्यातले अखेरचे दिवस विजनवासात घालवावे लागले.
जोगेंद्रनाथ मंडल हे नाव आज अनेकांना अनोळखी वाटेल. पण स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील हे एक बंगालमधील प्रभावशाली नाव होते. जोगेंद्रनाथ हे बंगालचे महत्वाचे दलित नेते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते अनुयायी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ढाका येथून निवडून येण्यासाठी ज्या व्यक्तींची महत्वाची मदत झाली त्यामधील एक नाव म्हणजे जोगेंद्रनाथ.
हिंदु समाजाकडून दलितांवर झालेल्या अन्यायाची जाणीव आपल्या सगळ्यांनाच आहे. याच अन्यायाला कंटाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर बौद्ध धर्मात प्रवेश केला. जोगेंद्रनाथांचा रस्ता यापेक्षा वेगळा होता. हिंदूपेक्षा दलितांना मुस्लिमांकडून समान वागणूक मिळेल असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी मुस्लिम लीगमध्ये प्रवेश केला. असा गैरमुस्लिम चेहरा त्यावेळच्या मुस्लिम लीगला हवाच होता. त्यामुळे या पक्षात त्यांना चांगले महत्वही मिळाले.
भारताच्या फाळणीने अनेक चेहऱ्यावरील बुरखे फाटले. मुस्लिम लीगच्या दलितांवरील प्रेमाचा बुरखा असाच फाटला. फाळणीच्या वेळी भारतात दलितांना हिंदूंकडून चांगली वागणूक मिळणार नाही या खात्रीने जोगेंद्रनाथ मंडल यांनी पाकिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. दलितांनी मुस्लिमविरोधी दंग्यांमध्ये सामील होऊ नये यासाठी त्यांनी पुर्व बंगाल पिंजून काढला. फाळणीनंतर अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानमध्ये जीनांनी त्यांना पहिल्या मंत्रीमंडळात कायदा व कामगार मंत्री म्हणून जागाही दिली.. योगायोगाची गोष्ट म्हणजे भारत व पाकिस्तान या दोनही देशाचे कायदेमंत्री हिंदू दलित समाजातून आलेले होते. जीना असेपर्यंत जोगेंद्रनाथांचे मंत्रीमंडळात वजन होते. परंतू वर्षभरातच जीना गेले. त्यांनतर जोगेंद्रनाथ त्यांच्या सहकाऱ्यांच्या नजरेत खुपु लागले. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दलितांना पाकिस्तानात समान वागणूक दिली गेली नाही. त्यांना तेथे हिंदू म्हणूनच पाहिले गेले. त्यांच्या वस्त्यांवर हल्ले झाले, धर्मांतराची सक्ती झाली. त्यांच्या जमिनी, संपत्ती लुटल्या गेल्या. जोगेंद्रनाथ या अत्याचाराविरूद्ध पाकिस्तान सरकारशी भांडत राहिले, परंतू पाकिस्तानी प्रशासनाची हिंदू विरोधी आणि अर्थातच दलितविरोधी वृत्ती ते बदलू शकले नाहीत.
अखेर निराश झालेल्या जोगेंद्रनाथांनी 1950 साली आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते भारतात कलकत्त्याला परतले. त्यांनी त्यावेळचे पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांना लिहलेल्या पत्रात पाकिस्तानच्या प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. त्यांच्या या पत्राचा दाखला आजही राजकीय प्रचारसभांमध्ये पाकिस्तानच्या विरोधात दिला जातो.
भारतात परतलेल्या जोगेंद्रनाथांना येथील राजकीय व्यवस्थेतही फारसे स्थान मिळाले नाही. पाकिस्तानशी केलेल्या सलगीने त्यांचे भारतातील राजकीय करियर पुर्णपणे संपवले. पुर्व पाकिस्तानमध्ये आणि आजच्या बांगलादेशात असलेल्या आपल्या जन्मगावाची आठवण काढत भारतात आल्यानंतर 18 वर्षांनी त्यांनी कलकत्यामध्ये अखेरचा श्वास घेतला.