
अमेरिका हा आपल्याला अनेक बाबतीत आपल्याला कोड्यात टाकणारा देश आहे. या देशाला मेल्टींग पॉट म्हणले जाते. सगळ्या जगभरातून लोक अमेरिकेत येतात आणि काही काळाने संपूर्ण अमेरिकन होतात. कोणत्याही नव्या गोष्टीला चटकन स्विकारण्याची जेवढी क्षमता अमेरिकेत आहे, ती जगातल्या कोणत्याही देशात नाही. त्यामुळेच औद्योगिक क्रांतीपासूनचे आजच्या डिजिटल क्रांतीपर्यंत जेवढे जेवढे बदल झाले त्याचे नेतृत्व अमेरिकेने केले आहे. त्यामुळे याचा सर्वात मोठा फायदाही अमेरिकेनेच मिळवला आहे.
कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या निवडणूकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निव़ड ही या अमेरिकन स्वभागाची एक झलक आहे. जर त्यांची निवड झालीच तर त्या या पदावरच्या पहिल्या महिला असतील तसेच पहिल्या भारतीय- आफ्रिकन वंशाच्या व्यक्ती असतील. कमला हॅरिस यांची आई भारतीय आहे तर तर वडिल जमैकाचे म्हणजे आफ्रिकन आहेत. हे दोघेही शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत भेटले, त्यांनी लग्न केले. त्यांना 2 मुली झाल्या आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर या दोन्ही मुलींना त्यांच्या आईने वाढविले. आपल्याकडे साधे जातीबाहेरचे लग्नही समाजाला सहन होत नाही, तिथे वंश आणि पंथापलिकडच्याशी विवाहसंबंध जोडणे आणि त्यानंतर न पटल्यास घटस्फोटही घेणे या गोष्टी आपल्या विचारविश्वाच्या पलिकडच्या आहेत. पण ही अमेरिका आहे, आणि अशी आहे म्हणून ती आज सगळ्या बाबतीत एक नंबरवर आहे.
आपण पुन्हा कमला हॅरिसकडे येऊ. आपल्याकडे सोनिया गांधीना आणि त्यांच्या मुलांना त्यांच्या इटली कनेक्शनवरून आजही शिव्या खाव्या लागतात. अमेरिकेने ज्याचे सख्खे वडिल केनिया या आफ्रिकन देशातील मुस्लीम होते आणि सावत्र वडिल इंडोनेशियाचे होते अशा बराक ओबामांना राष्ट्राध्यक्ष बनवलेही आणि त्यांना 8 वर्षे काम करण्याची संधी दिली. अमेरिका ही मुळच्या रेड इंडियनांच्या रक्तावर आणि जबरदस्तीने आणलेल्या काळ्या गुलामांच्या घामावर उभा राहिलेला देश आहे. या काळ्या लोकांच्या विरोधात जेवढे लोक आहेत, तेवढे या लोकांबद्दल सहानुभुती दाखवणारे अमेरिकेत आहेत. याच आधारावर कमला हॅरिसची निवड झाली आहे. भारतीय आणि आफ्रिकन अमेरिकन यांना एकाचवेळी आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे.
पण या निवडीमुळे भारतीय म्हणून आपण फार हुरळून जाण्याची गरज नाही. मुळात कमलांचा जन्म अमेरिकेत झाला आहे आणि आजवरची सगळी कारकिर्द अमेरिकी संस्कृतीत घडलेली आहे. त्यांच्या आईसोबत त्या भारतात म्हणजे मद्रासला अनेकदा आलेल्या आहेत, तसेच थोडीफार तमिळ भाषाही त्यांना येते. भारतात त्यांची काही भावनिक गुंतवणूक असेलही, पण आजच्या भारतातल्या सरकारला त्याचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. त्यांच्यामध्ये थोडेफार भारतीय रक्त असले तरी त्या धर्माने ख्रिश्चन आहेत, जे हिंदुत्ववादाचा गरज करणाऱ्या आपल्या केंद्रसरकारसाठी अडचणीचे आहे. या सरकारने डोनाल्ड ट्रॅंप यांच्याशी केलेली अतीजवळीक, ट्रॅप आणि मोदी यांची अल्पसंख्याकांबाबतची व्देषावर आधारीत धोरणे ही जर डेमोक्रॅटिक पक्ष सत्तेवर आला तर भारतासाठी अडचणीची ठरणार आहेत. कमला हॅरिस यामध्ये काही बदल करू शकतील असे वाटत नाही.
हे सगळे जरी खरे असले तरी ज्यांनी आपल्यावर राज्य केले अशा गोऱ्यांच्या देशात नुसत्या नावापुरत्या का होईना भारतीय असणाऱ्या एका महिलेने ऐवढी मजल मारली हे भारतीय मनाला सुखावणारे ठरतेच यात शंका नाही.
घनश्याम केळकर
बारामती