
भारताची फाळणी ही एक अतीशय दुख:द अशी घटना आहे. या फाळणीने लाखो लोकांचे जीवन उद्धस्त केले. आपल्या धर्माचे लोक आपल्याला चांगली वागणूक देतील या आशेने पुर्व पाकिस्तानमध्ये गेलेल्या लाखो बिहारी मुस्लिमांना जे भोगावे लागले त्याची कथा असल्या धर्मवेडाची धुंदी उतरवणारी ठरावी.
1947 साली भारताची फाळणी झाली, त्यापूर्वीपासून बिहारमध्ये हिंदू मुस्लिम दंगे सुरू झाले होते. त्याचा फटका हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही बसला होता. 1947 साली झालेल्या फाळणीत भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली असली तरी प्रत्यक्षात पाकिस्तान दोन तुकड्यात अस्तित्वात आला होता आणि या दोन तुकड्यात 1000 किलोमीटरचे अंतर होते. पुर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश आणि पश्चिम पाकिस्तान म्हणणे आजचा पाकिस्तान या दोघांच्या मध्ये भारताचा भुभाग येत होता. या फाळणीच्या वेळी बिहारमधील ज्या मुस्लिमांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यांनी पुर्व पाकिस्तानला पसंती दिली, कारण त्यांना बिहारमधून पुर्व पाकिस्तान जवळ होता.
पण पुर्व पाकिस्तानची जनता ही बंगाली बोलणारी होती आणि बिहारमधून गेलेल्या या लोकांची भाषा उर्दू होती. भाषेचा हा फरक एकाच धर्माच्या दोन्ही समुदायांना त्यावेळी फारसा महत्वाचा वाटला नसेल. पण या भाषेचा फरक बिहारी मुस्लिमांना तेव्हापासून आजपर्यंत छळत आला आहे.
याच भाषेच्या मुद्यावरून पुर्व व पश्चिम पाकिस्तानमध्ये उग्र मतभेद सुरू झाले. पश्चिम पाकिस्तानने उर्दूला राष्ट्रभाषा घोषित केले, त्याचा बंगाली पुर्व पाकिस्तानने विरोध केला. मात्र या पुर्व पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या बिहारींची भाषा उर्दू होती. त्यामुळे त्यांनी उर्दुला पाठिंबा दिला. मतभेदाची पहिली ठिणगी येथे पडली. पुढे त्याचा आगडोंब झाला.

यानंतरच्या अनेक संघर्षात बंगाली व बिहारी आमनेसामने आले. बिहाऱ्यांनी बंगालमध्ये राहून पश्चिम पाकिस्तानला साथ दिली. बंगाली जनतेने बिहाऱ्यांवर हल्ले चढवायला सुरुवात केली. मार्च 1971 मध्ये बंगाल्यांनी केलेल्या अशा हल्ल्यात 300 बिहारी मारले गेले. या घटनेचा फायदा घेऊन पाकिस्तानी सैन्याने ऑपरेशन सर्चलाईट या नावाने बंगाली जनतेविरुद्ध मोहीम सुरू केली. अर्थातच याला साथ दिली बिहाऱ्यांनी. सैन्याने बंगाली जनतेवर प्रचंड अत्याचार केले. 2 ते 5 लाख बंगाली या काळात मारले गेल्याचा अंदाज आहे. हजारो स्त्रियांवर पाकिस्तानी सैन्याने बलात्कार केले. पण यानंतर बांगलादेश मुक्ति संग्राम सुरू झाला. या बांगलादेशी जनतेच्या मदतीला भारतही धावला. भारतीय सैन्याने पुर्व पाकिस्तानात घूसून पाकिस्तानच्या सैन्याला शरण येण्यास भाग पाडले. अशा प्रकारे बांगलादेश स्वतंत्र झाला.
पण बिहारी मुस्लिमांचे हालात भरच पडली. पाकिस्तानला दिलेली साथ, पाकिस्तानी सैन्याबरोबर बंगाली जननेवर केलेले हल्ले आणि त्यांची उर्दू भाषा या सगळ्यांमुळे त्यांना आपोआपच देशाचे दुश्मन ठरविण्यात आले. हजारो बिहारी बंगाल्यांनी केलेल्या हल्ल्यात मरण पावले. त्यांच्यावर जवळपास सामाजिक बहिष्कारच पडला. बांगलादेशात बिहारी ही शिवी ठरली. बांगलादेशाच्या न्यायालयाने ज्यांना बांगलादेशचे नागरिकत्व हवे आहे त्यांना नागरिकत्व देण्याचा निकाल दिला. पण प्रत्यक्षात त्यांना नागरिकत्व मिळण्यात अनंत अडचणी उभ्या करण्यात आल्या. ज्या लाखो बिहारींनी बांगलादेशऐवजी पाकिस्तानचे नागरिकत्व स्विकारून तिथे जाण्याचा निर्णय घेतला, त्यापैकी पहिल्या दीड लाख लोकांना पाकिस्तानने स्विकारले. परंतू राहिलेल्या साडेतीन ते चार लाख लोकांना स्विकारण्यास चक्क नकार दिला. खरे तर या बिहारी जनतेने पाकिस्तानसाठी बंगाली जनतेशी दुश्मनी स्विकारली होती. परंतू पाकिस्तानही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले नाही.
बांगलादेशात होणाऱ्या छळाला कंटाळून अनेकांनी अवैधरित्या पाकिस्तानात जाण्याचा मार्ग स्विकारला. हा मार्ग भारतातून जाणारा होता. नैसर्गिक रचनेमुळे बांगलादेशाची सीमा ओलांडून भारतात येणे फारसे अवघड नाही. त्यामुळे कलकत्ता, नागपूर, मुंबईमार्गे कराची असा हा अवैध स्थलांतराचा कॉरिडॉर अस्तित्वात आला. मुंबईत सापडणारे उर्दुभाषिक बांगलादेशी घुसखोर हे बहुसंख्यवेळा बिहारी मुसलमान असतात. हा प्रवासही सोपा नव्हता, आणि असा प्रवास करून पाकिस्तानात जाणाऱ्या अनेकांना पाकिस्तानमध्येही नागरिकत्व नाकारले गेले. तिथेही त्यांना कराची शहरातील झोपडपट्टीचा आसरा घ्यावा लागला. ज्यांना पाकिस्तानने नागरिकत्व दिले त्यातील बहुसंख्यांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही.


बांगलादेशातील सर्वाधिक गरीब लोकांमध्ये बिहारी मुस्लिमांची गणती होते. ढाका शहरातील झोपडपट्ट्यात त्यांना जीवन कंठावे लागते. यातील बऱ्याच जणांनी आता बंगाली शिकली आहे. त्यांची मुले आता बंगाली समाजात मिसळून जाऊ लागली आहेत. ज्यांनी हे केले नाही, त्यांची मुले अशिक्षित राहिली, समाजापासून तुटली गेली. 1947 पासून आतापर्यंतचा 73 वर्षाचा हा काळ बिहारी मुस्लिमांच्या ससेहोलपटीचा आहे. ना घर का, ना घाट का ही म्हण त्यांच्याबद्दल खरी ठरली आहे.
धर्माचा आधार घेऊन माथी भडकावणाऱ्यांच्या नादी लागल्यावर काय होते याचे हे उत्तम उदाहरण आहे.
घनश्याम केळकर
बारामती