
धर्म म्हणजे काय रे भाऊ ?
धर्माच्या नावाखाली होणारी भांडणे आपल्याला नवीन नाहीत. आजपर्यंत धर्माच्या नावाखाली जेवढी माणसे मारली गेली, तेवढी दुसऱ्या कोणत्या कारणाने मारली गेली असतील असे वाटत नाही.
पण आजही धर्म म्हणजे काय याची सगळ्यांना मान्य असणारी व्याख्या आपण तयार करू शकलेलो नाही. याचीच एक मजेदार वस्तुस्थिती आज तुमच्यापुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
एका ईश्वराला मानणारे म्हणजेच मुर्तीपुजा नाकारणारे प्रमुख धर्म तीन आहेत. ते म्हणजे ज्यू किंवा यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम किंवा मुस्लिम. यातला मुळ धर्म हा यहुदी. या यहुदी धर्माच्या मुलभूत विचारांवरच प्रथम ख्रिस्ती आणि त्यानंतर इस्लामची उभारणी झाली. या तीनही धर्माचे जे लिखीत धर्मग्रंथ किंवा इतर ग्रंथसंपदा आहे त्याचा थोडक्यात आढावा आपल्याला घ्यायचा आहे.
या सगळ्याची सुरुवात झाली ती दहा शब्दांनी. यहुदी धर्माच्या श्रद्धेनूसार देवाने मोझेसला आपल्याकडे बोलावले आणि त्याला दहा पाट्या दिल्या. या प्रत्येक पाटीवर एक शब्द लिहलेला होता. हा देवाचा सर्वप्रथम दिलेला लिखीत संदेश, जो फक्त दहा शब्दांचा होता. याला म्हणतात दहा आज्ञा किंवा दहा वचने.
मोझेस हा संदेश घेऊन आला. पुढे या दहा शब्दांच्या स्पष्टिकरणासाठी या दहा शब्दांचे दहा वाक्यात रुपांतर केले गेले. त्यानंतर या दहा आज्ञा किंवा वचने कशी पाळायची याचे स्पष्टीकरण देण्यासाठी काही ग्रंथ लिहले गेले. यहुद्यांमधील प्रमुख नेत्यांच्या चरित्राची यात भर पडली. या सगळ्यानंतरही काही प्रश्न शिल्लक राहिले किंवा नव्याने निर्माण झाले त्याचे उत्तर देण्यासाठी आणखी ग्रंथांची निर्मिती झाली. हळूहळू या धर्मात कर्मकांडांचे महत्व वाढू लागले आणि त्याबरोबर याचे मार्गदर्शन करणारे ग्रंथही वाढू लागले. अखेर अशी स्थिती आली लोकांच्या सगळ्या जगण्यावर पुरोहितांचे वर्चस्व निर्माण झाली. केव्हा उठावे , केव्हा झोपावे, बळी केव्हा द्यावा आणि कसा द्यावा, विश्रांती केव्हा आणि कशी घ्यावी. देवाचे नाव कधी आणि असे घ्यावे यासारख्या असंख्य छोट्यामोठ्या निर्णयांचे अधिकार पुरोहितांच्या हातात गेले.
यानंतर उदय झाला येशू किंवा ख्रिस्ताचा. येशूच्या जीवनात त्याने केवळ 3 वर्षे धार्मिक उपदेश केला आणि त्यानंतर त्याला क्रुसावर चढविण्यात आले. त्याने काही लिहून ठेवले नाही. फक्त तोंडी सांगितले. त्याने या सगळ्या कर्मकांडाचे ओझे फेकून द्यायचा उपदेश केला. त्याचा सगळा लढा हा पुरोहीतशाहीविरुद्ध होता. देव आणि माणूस यांच्यामध्ये मध्यस्थांची गरज नाही असे त्याचे विवेचन होते. त्याच्या या शिकवणीमुळेच यहुदी धर्माचे ठेकेदार त्याच्या विरोधात गेले आणि त्यांनी त्याला क्रुसावर चढवले. त्यानंतर त्याच्या शिकवणीच्या आधारावर ख्रिस्ती धर्माची उभारणी करण्यात आली. त्यामध्ये प्रथम चार वेगवेगळ्या चार लेखकांनी येशूचे चरित्र लिहले. ही चार शुभवर्तमाने. त्यात भर पडली येथूच्या शिष्यांच्या चरित्रांची, त्यांनी लिहलेल्या पत्रांची. यानंतर ख्रिस्ती धर्माचे नियमन करणाऱ्या चर्च या संस्थेची निर्मिती झाली. पुन्हा कायदे आणि नियम आली. त्याची पुस्तके आली. या वरचे मतभेद आले. त्यातून प्रमुख दोन पंथ निर्माण झाले, त्यांनी आपपली स्पष्टीकरणे सांगणारे ग्रंथ तयार केले. याखेरीज अनेक लहानमोठे पंथ निर्माण झाले. त्यांची वेगवेगळी चर्चेस झाली. त्यांचे वेगवेगवळे नियम झाले. पुन्हा एका धर्माचे मार्गदर्शन आणि नियमन करणारी पुरोहितशाही चर्चच्या माध्यमातून उभी राहिली. शेकडो ग्रंथांच्या आडून ती समाजावर वर्चस्व गाजवू लागली.
यानंतर हजरत मोहंमद पैंगबर यांचा उदय झाला. त्यांनी असे सांगितले की यहुदी आणि ख्रिस्ती या दोन्ही धर्माना देवाने ग्रंथ पाठवले. पण या दोघांनीही या ग्रंथांचा चुकीचा अर्थ लावला. त्यामुळे खरा अर्थ सांगण्यासाठी देवाचा संदेश घेऊन मी आलो आहे. इस्लामच्या श्रद्धेनूसार कुराण हा ग्रंथ अवतरला. पैगंबरांनीही कर्मकांडाना आणि पुरोहितशाहीला स्थान दिले नाही. तुमच्या घरातील जेष्ठ पुरुष हाच तुमचा पुरोहीत अशी त्यांची मांडणी होती. पैगंबरांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी सांगणाऱ्या हदिस या ग्रंथांची निर्मिती झाली. कुराण आणि हदिसच्या प्रकाशात धर्माचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न झाला. यातून इस्लामधर्मीयांयांच्या जीवनावर नियंत्रण करणारा कायदा म्हणजे शरियाचा जन्म झाला. इस्लामध्येही दोन गट पडले. कुराण, हदिस आणि शरियाचे वेगवेगळे अर्थ लावणारे अनेक भाष्यकार निर्माण झाले. त्यांनी त्यांचे त्यांचे ग्रंथ लिहून ठेवले. त्यानूसार आचरण करणारे अनूयायी आपलाच अर्थ कसा बरोबर आहे हे सांगू लागले. इस्लाममध्येही आता शेकडोने ग्रंथ आहेत. तेथेही मुल्ला आणि मौलवींच्या रुपाने पुरोहितशाहीने आपली पकड घट्ट केली आहे.
अशाप्रकारे हजारो ग्रंथ, त्यांचे वेगवेगळे अर्थ लावणारे भाष्यकारांचे ग्रंथ, धर्माचार्यांचे जीवन आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रथा आणि परंपरा असा खुप मोठा पसारा या एक ईश्वराला मानणाऱ्या धर्मांमध्ये आता निर्माण झाला आहे.
हिंदू किंवा वैदिक धर्म आणि त्याच्या प्रतिवादातून निर्माण झालेले बौंद्ध, जैन किंवा शीख धर्म यांच्याबाबत ही अशी मांडणी करता येणे शक्य आहे.
दहा शब्दांपासून सुरू झालेला हा प्रवास आता हजारो ग्रंथांपर्यंत येऊन पोचला आहे, यापुढेही तो वाढत जाईल, पण मुळ प्रश्न अजूनही आहे तिथेच आहे.
धर्म म्हणजे काय रे भाऊ ?