तुर्की आणि भारत

हगिया सोफिया – चर्च, मशिद , वस्तूसंग्रहालय आणि पुन्हा मशिद

सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात तुर्कस्थानमध्ये घडलेल्या एका घटनेकडे बऱ्याच जणांचे दुर्लक्ष होणे साहजिक आहे. घटनाही तशी आजच्या काळात फार महत्वाची नाही.

दि. 24 जुलै रोजी तुर्कस्थानची राजधाऩी इस्तंबूलमधील एका वास्तूमध्ये 81 वर्षानंतर नमाज पढली गेली. सगळ्या जगभरात जे कट्टरतावादाचे वातावरण सध्या पसरत चालले आहे, ही घटना म्हणजे यातील एक कडीच म्हणावी लागेल.

या वास्तूचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. या वास्तूचे नाव हगिया सोफिया. ही वास्तू बांधली गेली सन 537 मध्ये. त्यावेळी तुर्कस्थानवर ख्रिश्चन धर्मीय बायझांटियन साम्राज्याची सत्ता होती. त्यावेळी एक चर्च म्हणून ही वास्तू बांधली गेली. दिवसेंदिवस हे साम्राज्य समृद्ध होत गेले आणि त्याबरोबर ही वास्तूही अधिक प्रशस्त होत गेली. या साम्राज्यातील सर्वात मोठे चर्च म्हणून ही वास्तू प्रसिद्ध झाली. या साम्राज्यावर मुस्लिम ऑटोमन आक्रमकांनी सन 1453 मध्ये विजय मिळविला. या विजयानंतर त्यांनी या वास्तूचे मशिदीत रुपांतर केले. म्हणजेच 916 वर्षे ही वास्तू चर्च म्हणून अस्तित्वात होती. पहिल्या महायुद्धामध्ये ऑटोमन साम्राज्य कोसळले. त्यानंतर तुर्कस्थानात एका धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या नेत्याचा उदय झाला. त्यांचे नाव अतातुर्क केमाल पाशा. त्यांनी 95 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या तुर्कस्थानची धर्मनिरपेक्ष राज्यघटना बनविली. हाच विचार पुढे नेत त्यांनी या वास्तूचे वस्तुसंग्रहालयात रुपांतर केले. त्यावेळी या वास्तुला मशिद म्हणून असलेल्या अस्तित्वाला 482 वर्षे झाली होती. अतातुर्क यांच्या विचारानेच आजचा आधुनिक, बलाढ्य असा तुर्कस्थान उभा राहिला. पण हळू हळू या देशातही धार्मिक कट्टरता वाढीस लागू लागली. आजचे तुर्कस्थानचे अध्यक्ष एरॉगॉन हे अशा कट्टरतावादाला फुंकर घालत सत्तेवर आले. अतातुर्कांची विचारसरणी बाजूला टाकून बहुसंख्यांकांच्या धर्मभावनेला हात घालत ते सत्तेवर आरूढ झाले. आणि त्यांनी या वास्तुचे वस्तुसंग्रहालयातून पुन्हा मशिदीत रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. याच्या विरोधात देशात आणि परदेशात उमटलेल्या प्रतिक्रियांना न जुमानता यांनी हा निर्णय तडीला नेला.

याचा भारताशी काय संबंध असा विचार शीर्षक वाचून नक्की तुमच्या मनात आला असेल. पण भारत आणि तुर्कस्थानात अनेक समानता आहेत. ज्यावेळी भारतात एका मंदिराच्या भूमिपूजनाची चर्चा सरकार आणि मिडियाव्दारे जोराजोराने केली जात आहे, त्या काळात तुर्कस्थानात एका वास्तूचे मशिदीत रुपांतर होत आहे. भारत आणि तुर्कस्थान दोन्हीकडेही एका धर्माचे लोक बहुसंख्येने आहेत, आणि दोन्ही देशाच्या राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहेत. दोन्ही देशांतील राज्यकर्त्यांच्या मनात ही राज्यघटना बदलून धार्मिक आधारावरील राज्यघटना आणायची इच्छा आहे. पण अजूनतरी ते शक्य झालेले नाही.

हे दोन्ही देश ज्यावेळी स्वतंत्र झाले त्यावेळच्या नेत्यांनी धार्मिक कट्टरतावादाचा राक्षस धर्मनिरपेक्ष राज्यघटनेच्या बाटलीत बंद केला होता. मात्र आता दोन्ही देशातील राज्यकर्ते हा राक्षस पुन्हा बाटली बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत. मात्र राक्षस बाहेर पडत असला तरी अजून बाटली शाबूत आहे आणि काही युक्तीने हा राक्षस या बाटलीत पुन्हा घातला येण्याची शक्यता आहे.

तसे झाले नाही तर यापूर्वीच्या अनुभवानूसार असा राक्षस ज्यांनी त्याला बाहेर काढले सर्वप्रथम त्यांचाच बळी घेतल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.