मलाला – पार्ट 1 (Malala)

मलाला तिच्या प्रसिद्ध वाक्यासह – एक मुल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन जग बदलून टाकू शकतात.

शाळा सुटली. आपल्या मैत्रिणींसोबत ती स्कुलबसमध्ये बसली. तेवढ्यात दोन हातात बंदुक घेतलेले लोक बसमध्ये शिरले. त्यांनी विचारले, “ तुमच्यापैकी मलाला कोण आहे.” कोणीच उत्तर दिले नाही. परंतू काहींची नजर अभावितपणे मलालाकडे वळली आणि दणादण गोळ्या सुटल्या. एक गोळी मलालाच्या डाव्या डोळ्यापासून केवळ 18 इंचावर शिरली, तिने तिच्या कवटीला धक्का दिला आणि तिच्या मानेतून जाऊन तिच्या खांद्यावर अडकली. तिच्या दोन मैत्रिणीही जखमी झाल्या.

ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी मलाला केवळ 15 वर्षाची होती. या मुलीने अस काय केले होत की तिच्यावर असा जीवघेणा हल्ला व्हावा. याचे एकमेव कारण म्हणजे शिकण्यासाठीचा हट्ट. मी शिकेन आणि सगळ्या मुलींनादेखील शिकण्याचा हक्क मिळाला पाहिजे हा तिचा हट्ट होता. हा हट्ट तिला मरणाच्या दारात घेऊन गेला.

या मलालाची गोष्ट खरोखरच अद्भभूत अशीच आहे.

मलाला तिच्या वडलांसोबत

मलाला ही पाकिस्तानी. मलाला युसुफजाई हे तिच नाव. पाकिस्तानातल्या खैबर पख्तुनीस्तानातल्या स्वात खोऱ्यातला तिचा जन्म. मलाला हे तिच नावदेखील जून्या काळातील एका कवयत्री आणि वीरांगनेचे आहे. ऐतिहासिक काळातील एका लढाईमध्ये परकियांच्या आक्रमणापुढे येथे स्थानिक माघार घेत होते. त्यावेळी एका मलाला नावाच्या मुलीने डोंगरावर चढून तेथून त्यांना लढण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्या मलालाच्या नावावरून या मुलीचे नाव मलाला असे ठेवले गेले. तिचे वडिल हे शिक्षक होते. त्यांनी त्यांची इंग्रजी माध्यमाची शाळा सूरू केली होती. सुरुवातीला ही शाळा घराशेजारीच होती. त्यामुळे मलाला अगदी लहान असल्यापासून या शाळेत जाऊन बसत असे. येथून तिला शिकायची गोडी लागली असे म्हणता येईल.

पण ज्यावेळी प्रत्यक्ष शिक्षण घेण्याची वेळ आली त्यावेळी परिस्थिती बदलत गेली. ती अकरा वर्षाची होती, त्यावेळी स्वात खोऱ्यात तालिबानी दहशतवाद्यांचा जोर वाढत गेला. त्यांचा पहिला विरोध शिक्षणाला होता, त्यातही कडवा विरोध मुलींच्या शिक्षणाला होता. त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी मुलींनी शिक्षण सोडून घरी बसावे यासाठी प्रयत्न सुरू केले. यात एक रेडिओ मुल्ला होता. हा दररोज रेडिओवरून भाषण देऊन मुलींना शिक्षण देण्याविरूद्ध धमकावत असे. या दहशतीच्या वातावरणात मलालाच्या वर्गातील मुलींची संख्या हळूहळू कमी होऊ लागली. मलाला आणि तिचे वडिल अस्वस्थ होऊ लागले. ही अस्वस्थता व्यक्त झाली पेशावरच्या एका कार्यक्रमात. पेशावर येथील प्रेसक्लबमध्ये वडिलांनी मलालाला तेथील मिडियासमोर उभे केले. त्यावेळी पहिल्यांदा मलालाने जाहिर प्रश्न विचारला, ‘ आमचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेणारे हे तालिबानी कोण ?. “ मात्र त्यामुळे परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. स्वात खोऱ्यावर दहशतवाद्यांचा कब्जा झाला. सगळ्या शाळा बंद झाल्या. काही शाळांच्या इमारती बॉम्बस्फोट करून उडविल्या गेल्या. भर चौकात चाबकाचे फटके मारण्याचे प्रकार सुरू झाले. सगळी यंत्रणा दहशतवाद्यांच्या हातात गेली. स्वात खोऱ्यात काय चालले आहे हे बाहेरच्या जगात समजेनासे झाले. त्यावेळी बीबीसी उर्दूच्या एका वार्ताहराने मलालाच्या वडिलांशी संपर्क साधला. त्याला अशी एक मुलगी हवी होती, जी दररोज स्वातमध्ये काय घडते आहे त्याचा तपशील पाठवेल. त्या मुलीचे नाव गुप्त ठेवले जाणार होते. मलालाच्या अगोदर तिच्या वर्गातील एका मुलीने हे काम करण्याची तयारी दाखवली होती. परंतू तिच्या घरच्यांनी याला विरोध केला. त्यानंतर मलालाने पुढाकार घेऊन हे काम करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर स्वातमध्ये काय घडते आहे हे मलाला बीबीसी उर्दूला पाठवू लागली आणि त्याला प्रसिद्धी मिळू लागली. ही माहिती कोण पाठवते याचा शोध दहशतवादी घेत होतेच. पण त्यावेळेस ते मलालापर्यंत पोचू शकले नाहीत.

सगळ्या पाकिस्तानमध्येच दहशतवाद्यांनी जोर धरला होता. त्याविरूद्ध पाकिस्तानी लष्कराची मोहिम सूरू झाली. त्यानूसार स्वातमध्येही पाकिस्तानी लष्कर दाखल झाले. खुलेआम बंदुका घेऊन फिरणाऱ्या दहशतवादयांना त्यांनी पिटाळून लावले. पण दहशतवाद्यांचे गट अजूनही प्रबळ होते.

आता मलाला जाहिरपणे पुढे आली. वृत्तपत्रे आणि टेलिव्हिजन चँनेलवर मुलाखती देऊ लागली. तिचा सगळा भर हा मुलींच्या शिक्षणावर होता. मुलींना शिक्षणाचा हक्क आहे, आणि तो कोणीही हिरावून घेऊ नये हा तिचा आग्रह होता. अर्थातच त्यामुळे ती दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली. तिला फोनवरून, फेसबुक पेजवरून धमक्या येऊ लागल्या. मलाला आणि तिच्या वडिलांनी याकडे दुर्लक्ष केले. आणि अखेर तो दिवस उजाडला.

2012 च्या 9 ऑक्टोबरला दहशतवादी तिच्या बसमध्ये शिरले आणि त्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यावेळी तिचे वय होते 15 वर्षाचे. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने लष्कराच्या हेलिकॉप्टरने रावळपिंडी येथील हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. ती बेशुद्ध झाली होती आणि मरणाच्या दारात उभी होती. तिच्यावरील हल्ल्याच्या बातमीने सगळे जग हादरून गेले. देशोदेशात हजारोच्या संख्येने लोक जमा झाले. मंदिर, मस्जिद, चर्चेसमध्ये तिच्यासाठी प्रार्थना होऊ लागल्या. खुद्द पाकिस्तानमध्ये तिच्या सहानुभूतीची लाट उसळली. मात्र तिची प्रकृती गंभीर होती. तिला इंग्लंडमधील नामवंत हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले.

मलाला तिच्या फॅनसोबत सेल्फी घेताना

मानवी मनाला ज्ञान मिळविण्याची ओढ असते. या ओढीपायी अनेकांनी आपले प्राण पणाला लावलेले आहेत. अशांच्या यादीमध्ये आजच्या काळातील एक प्रमुख नाव म्हणजे मलाला.

मलालाची कहाणी एका भागात संपणारी नाही. उरलेली गोष्ट पुढच्या भागात

—————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————-

जाहिर निमंत्रण

मित्रांनो,

आपण सगळे आज मानवजातीवर आलेल्या कोरोनाच्या या संकटाशी सामना करीत आहोत. याचवेळी जगात सगळीकडे आणखी एका विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे. ती म्हणजे कोरोनानंतर जग कसे असेल. (world after corona) आपणही या विषयावर खुली चर्चा सुरु करणार आहोत. तुम्हीदेखील कोरोनानंतर जग कसे असेल याबाबत तुमचे मत या चर्चेत मांडावे ही अपेक्षा आहे.

पण अर्थातच मलालाची ही गोष्ट संपल्यावर.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.