
तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म? हा प्रश्न श्रीकृष्णाने विचारला होता कर्णाला.
वेळ होती महाभारत युद्धाची. कर्ण आणि अर्जून यांचे युद्ध सुरू होते. कर्णापुढे अर्जूनाचा निभाव लागेल असे वाटत नव्हते. त्यावेळी कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले. काही केल्या ते बाहेर निघेना. ते बाहेर काढण्यासाठी कर्ण रथाखाली उतरला. त्याने धनुष्यबाण बाजूला ठेवले आणि रथाचे चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी श्रीकृष्णाने अर्जूनाला कर्णावर बाणांची वृष्टी करण्यास सांगितले. त्यावेळी कर्णाने कृष्ण- अर्जूनांना प्रश्न केला, “ अरे, हे धर्मयुद्ध आहे. हाती शस्त्र नसलेल्या शत्रूवर घाव घालू नये असे धर्म सांगतो.”
त्यावर श्रीकृष्णाने कर्णाला केलेला हा प्रतिप्रश्न. “ तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म.”
द्रौपदीच्या पदराला भरसभेत हात घातला जात होता, त्यावेळी तुझा हा धर्म कुठे गेला होता. एकट्या अभिमन्यूला सगळे कौरव एकत्र येऊन मारत होतात तेव्हा तुझा हा धर्म कुठे गेला होता. पांडवांना दयूतात फसवून त्यांचे राज्य हडप केले जात होते, त्यावेळी तुझा हा धर्म कुठे गेला होता.
या प्रश्नाची आठवण झाली पालघरच्या घटनेनंतर सुरू झालेल्या राजकारणाने. घटना अत्यंत निंदनीय आहे. त्याचा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. पण त्यानंतर या घटनेचे भांडवल करून ज्यांनी राजकारण सुरू केले आहे, त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे.
“ तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म “
याच राज्यात वर्षाभरापूर्वी चंद्रपूर येथे पाच जणांची व धुळे येथे एकाची अशीच मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाली होती. त्यावेळी आज येतो तसा कळवळा का आला नाही ?
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या तातडीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला ती तातडी ज्यावेळी त्यांच्या राज्यात एका पोलिस इन्सेक्टरची जमावाने हत्या केली त्यावेळी का दाखवली नाही. त्यावेळी आरोपीला पकडायला उत्तर प्रदेश पोलिसांना महिना का लागला?
त्यांच्याच राज्यात दादरी येथे अखलाख नावाच्या व्यक्तीची जमावाने घरात घूसून हत्या केली. त्या आरोपींचा उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी हारतुरे देऊन सन्मान केला त्यावेळी आज आला तसा कळवळा का आला नाही?
आणि भगव्या वस्त्राचेच म्हणावे तर उत्तर प्रदेशात विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याची काही महिन्यांपूर्वी गोळ्या घालून हत्या झाली, त्यावेळी हे सगळे मुग गिळून का बसले होते ?
ज्यांनी मॉब लिंचिंगला प्रतिष्ठा मिळवून दिली तेच आज गळा काढत आहेत.
आणि त्यांच्या दृष्टीने अंगावर भगवे वस्त्र असेल तर त्याच्याच मरणाला अर्थ आहे. बाकीचे मेले तरी त्याला काही किंमत नाही. धर्मांधतेमुळे ज्यांची दृष्टी गेलेली आहे, त्यांना माणुस दिसत नाही, ते अंगावरच्या कपड्यांवरून परिक्षा करत आहेत.
म्हणूनच त्यांना हा प्रश्न विचारावासा वाटतो,
तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म