सखे आणि सोबती – जवाहरशेठ

पवारसाहेबांच्या पहिल्या निवडणूकीपासून त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे सहकारी जवाहरशेठ शहा यांचे हे व्यक्तिचित्र. पवारसाहेबांच्या पहिल्या निवडणूकीचे वातावरण टिपणारे.

बारामतीचा इतिहासाचा ज्या ज्या वेळी आढावा घेतला जाईल, त्या त्या वेळी ६७ सालच्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, इतकी ही ऐतिहासिक निवडणूक होती. या निवडणुकीने बारामतीचे भविष्य बदललेच; पण त्याचबरोबर महाराष्ट्र आणि देशाच्या भविष्यालाही कलाटणी देणार्‍या शरद पवार नावाच्या नेतृत्वाला आकार दिला. या निवडणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेल्या असंख्य कॉलेज विद्यार्थ्यांना या भविष्याची जाणीव होती की नाही हे आज सांगता येणार नाही; पण आहे ती व्यवस्था बदलली पाहिजे आणि नवी व्यवस्था आणली पाहिजे या ध्येयाने ही सारी तरुणाई झपाटली होती हे मात्र निश्चित. त्यामुळे ही निवडणूक या तरुणांनीच लढवली. त्यावेळच्या बारामती कॉलेजचे ७०० ते ८०० विद्यार्थी या निवडणुकीत सक्रिय सहभागी होते. गावागावात फिरत होते. कधी पायी, कधी सायकलने, कधी ट्रकने, जे मिळेल ते साधन घेऊन परिवर्तनासाठी हाक देत होते. जवळजवळ महिनाभर हे तरुण कॉलेजला गेलेच नाहीत. त्यांनी मतदारयाद्या वाटून घेतल्या. त्यानुसार प्रत्येक मतदाराला भेटण्याचे नियोजन केले. मतदानाच्या स्लिपा वाटल्या. जे पडेल ते काम केले. या तरुणांचेच एक प्रतिनिधी होते जवाहर शहा वाघोलीकर. त्यावेळच्या बारामती कॉलेजचे ते विद्यार्थी. त्यावेळी ते एसवायबीएमध्ये शिकत होते. त्यावेळच्या या निवडणुकीची झिंग, तो थरार त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला आहे. एका नव्या नेत्याचा उदय होताना पाहिला आहे. त्यावेळच्या बारामतीत बडी नेतेमंडळी शेकापकडून उभ्या असलेल्या बाबालाल काकडेंसोबत होती. बारामती तालुका हा काँग्रेसला मानणारा होता. त्यातून शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे प्रिय शिष्य होते. त्यामुळे जनभावना मात्र काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या शरद पवारांबरोबर होती. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या नेतृत्वाकडून जनसामान्यांचा विचार होत नाही, पैशाच्या आणि दहशतीच्या बळावर सारे रेटून नेले जाते, नात्यागोत्याच्या पलीकडे हे नेतृत्व जात नाही, ही भावना तीव्र होती. त्यामुळेच बारामती कॉलेजचे हे तरुण परिवर्तनासाठी झटत होते. या तरुणांचे नेतृत्व करत होते जवाहर शहा वाघोलीकर, संपतराव देवकाते, दत्तोबा टिळेकर. त्यामध्ये युवतींचाही मोठा सहभाग होता, यातील प्रमुख होत्या नीला पवार, कुमुद शहा, जयश्री मेहता, साधना गुजर, ज्योती सावंत. याचवेळेस बारामतीपासून सोमेश्वरपर्यंत एक मोठी मिरवणूक काढण्याचे ठरले. ही मिरवणूक वडगाव निंबाळकरजवळ अडविण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेसही प्रतिकार करण्यास ही मुलेच पुढे होती. त्यांनी ती मिरवणूक पूर्ण केलीच. या निवडणुकीत या मुलांच्या मार्गदर्शक होत्या शारदाबाई पवार. बारामती शहरातून जे कार्यकर्ते उघडपणे शरद पवारांसाठी काम करत होते, त्यामध्ये होते धोंडिबा आबाजी सातव ऊर्फ कारभारी, सोनोपंत दाते, जिवाभाई कोठारी, माणिकराव वाघोलीकर, शंकरराव दाते, गुलाबराव ढवाणपाटील, कमलाकांत ढवाणपाटील. आदल्या दिवशी या सर्वांबरोबर चर्चा करून नियोजन ठरे. दररोज सकाळी ८ वाजता ही सारी मुले राममंदिरात जमत. तेथे निवडणूक कार्यालय होते. १०० मुलांचा एक ग्रुप असे. प्रत्येक ग्रुपला विभाग वाटून दिले जात. त्यानुसार ही मुले दिवसभर फिरत असत. संध्याकाळी पुन्हा जमत, दिवसभराच्या कामाचा आढावा घेतला जाई. यातील निवडक कार्यकर्त्यांची आमराईतील बंगल्यावर शारदाबाई पवारांशी चर्चा होई. त्यांच्या मार्गदर्शनानुसार दुसर्‍या दिवसाचा कार्यक्रम ठरे. अशा प्रकारे योग्य मार्गदर्शनाखाली आणि पूर्ण उत्साहाने या मुलांनी आपला सहभाग दिला आणि शरद पवारांना निवडून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. जवाहरशेठ शरद पवारांचे राजकीय अनुयायी झाले ते तेव्हापासून आजपर्यंत. या सगळ्या काळात शरद पवारांच्या अलीकडे किंवा पलीकडे कधी पाहिलेही नाही, विचारही केला नाही. जवाहरशेठचे आजोबा तुळजाराम चतुरचंद शहा प्रथम बारामतीत आले ते १२० वर्षांपूर्वी. त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील वाठार स्टेशनजवळील वाघोली. त्यामुळे ते आपल्या आडनावासोबत वाघोलीकर हे गावाचे नाव लावतात. आजोबांनी प्रथम नोकरी केली, त्यानंतर १०० वर्षांपूर्वी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्यावेळच्या बारामतीत गूळ व कापसाचा मोठा व्यापार चालत असे. त्यावेळी बँका नव्हत्या, त्यामुळे शेतकरी त्यांच्याकडील पैसे पेढीवर आणून ठेवत असत. लागतील तसे घेऊन जात असत. या सार्‍या व्यवहारात एकमेकांवरील विश्वासाखेरीज दुसरे कोणते तारण नव्हते. पुढे कुटुंब वाढले, मुले वेगवेगळे व्यवसाय करू लागली; पण तेव्हापासून आजपर्यंत वाघोलीकर शहा या नावासोबत विश्वासार्हता आणि सचोटी कायम आहे. पुढे याच त्यांच्या आजोबांचे नाव बारामती कॉलेजला देण्यात आले. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या या नामकरण कार्यक्रमास शंतनुराव किर्लोस्कर, शेठ लालचंद हिराचंद यांच्यासमवेत शरद पवारही उपस्थित होते. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जवाहरशेठनी अनेक संस्थांवर काम केले. बारामती मर्चंट असोसिएशन, कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती नगरपालिका या संस्थांमध्ये कधी संचालक म्हणून तर कधी संस्थेचा प्रमुख म्हणून त्यांनी योगदान दिले. ९९ सालापासून ते अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. या सार्‍या कामात मिळालेला मीटिंग भत्ताही त्यांनी कधी घरी आणला नाही, तोदेखील आला तसा रिमांड होमला देऊन टाकला. पुरस्कार मिळाला त्याची रक्कमही दान करून टाकली. स्वत:च्या कष्टाने मिळवावे आणि खावे ही पूर्वीपासूनची वृत्ती आजही त्यांनी जपली आहे. दर दिवाळीला पवारसाहेब त्यांच्या सिनेमा रोडवरील दुकानात येत असत. तेथेच ते बारामतीतील व्यापारीवर्गाला भेटत असत. त्यानंतर मर्चंट असोसिएशनची इमारत झाली, त्यानंतर पवारसाहेब तेथे सर्वांना भेटू लागले. आजही कॉलेजचे कोणतेही काम असो, त्यात पवारसाहेब, अजितदादा किंवा सुप्रियाताई यांची मदत लागणार असेल तर त्यांच्या एका फोनवर काम होते, असा त्यांचा अनुभव आहे. ६७ साली ज्या संस्थेत १५०० विद्यार्थी शिकत होते, त्या त्यांच्या संस्थेच्या आवारात आता १२ हजार विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर पवारसाहेब आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाचे भरीव योगदान राहिलेले आहे. एमबीए कॉलेजसाठी परवानगी मिळेल या आशेवर त्यांनी सुसज्ज इमारत बांधून ठेवली. परवानगीसाठी अर्ज केला होता; पण परवानगी मिळेना. एक वर्ष असेच वाया गेले, दुसरेही जाईल की काय, अशी शक्यता निर्माण झाली. परवानगी देणारी संस्थेचे कार्यालय दिल्लीमध्ये होते. त्यामुळे संस्थेच्या प्रमुख लोकांसह जवाहरशेठ दिल्लीला गेले. साहेब त्यावेळी केंद्रात मंत्री होते, त्यांना भेटले व आपली समस्या सांगितली. साहेब स्वत: संबंधित संस्थेत आले, केंद्रीय मंत्री स्वत: आलेले पाहिल्यावर परवानगीच्या कामाला प्रचंड गती आली. सकाळी ९ वाजता भेट घेतल्यावर दुपारी ३ वाजेपर्यंत परवानगीचे पत्र हातात मिळाले. सर्वसाधारणपणे परवानगी ६० जागांसाठी मिळते, येथे ती १२० जागांसाठी मिळाली. पवारसाहेब नावाची जादू कामाला आली. बारामतीमध्ये धर्मादाय संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून वर्कशॉप घेण्याचे ठरले. संबंधित अधिकार्‍याने बारामतीत हे वर्कशॉप कोठे घ्यावे यासाठी पवारसाहेबांना सल्ला विचारला, त्यावेळी पवारसाहेबांनी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे नाव सुचवले. असे अनेक प्रसंग जवाहरशेठच्या आठवणीत आहेत. पवारसाहेबांची स्वत:ची एक शिक्षणसंस्था बारामती परिसरात मोठे काम करते आहे; पण त्याचा परिणाम अनेकान्त एज्युकेशन सोसायटीला करावयाच्या मदतीवर कधीच झाला नाही. सर्व चांगल्या गोष्टींना मनःपूर्वक व सक्रिय पाठिंबा देण्याचे पवार कुटुंबीयांचे संस्कार याला कारणीभूत आहेत. शरद पवारांचे सारे राजकीय व सामाजिक जीवन जवाहरशेठनी जवळून पाहिले आहे. या सार्‍या प्रवासात त्यांच्यावरचा विश्वास व स्नेह यांना तडा देणारा एकही प्रसंग त्यांना आठवत नाही. पवारांसाहेबांचे ते पूर्वी कार्यकर्ते होते, नंतर सहकारी झाले आणि आताचे त्यांचे नाते हे निखळ मित्रत्वाचे राहिले आहे. हे नाते असेच पुढे चालत राहील, याची त्यांना खात्री आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.