मलिक अंबर भाग 2
30 वर्षाच्या मलिक अंबरच्या या राजकीय कारकिर्दीत निजामशाहीची सगळी सूत्रे मलिक अंबरने आपल्या हातात राखण्याचा प्रयत्न केला. त्या काळची निजामशाही म्हणजे विदर्भ वगळता जवळपास सगळा महाराष्ट्राचा परिसर होय.
ही सुत्रे हातात ठेवण्यासाठी त्याने सगळ्या भल्या बुऱ्या मार्गांचा वापर केला. आपला जावई म्हणजेच निजामशहा आपले ऐकेनासा झाला आहे असे ज्यावेळी त्याच्या लक्षात आले त्यावेळी त्याने त्याच्यावर विषप्रयोग करून आपल्या स्वतःच्या मुलीला विधवा बनवले. त्यानंतर आपल्या लहान वयाच्या नातवाला निजामशहा बनवून पुन्हा वजिरपद स्वतः कडे घेतले.
कधी विजापूरच्या आदिलशहाची मदत घेऊन मुघलांना रोखले तर कधी मुघलांचा धाक दाखवून आदिलशहाला ताब्यात ठेवले.
मोगल बादशहा जहांगीर अंबरचा भयंकर व्देष करत असे. त्याने एक चित्र बनवून घेतले होते, त्यामध्ये जहांगीर एका काळ्या माणसाचे तलवारीने मुंडके उडवताना दाखवले आहे. हे चित्र जहांगीर सतत आपल्या डोळ्यासमोर दिसेल असे लावले होते. या चित्रातील काळा माणुस म्हणजे मलिक अंबर होता.
पण प्रत्यक्षात जहांगीरची ही इच्छा कधीच पुरी होऊ शकली नाही. जहांगीरच्या कारकिर्दीत मुघलांना कधीही निजामशाहीवर विजय मिळवता आला नाही. असे म्हणतात जहांगीरच्या मरणानंतर त्याचा मुलगा शहाजहान याला बादशाह होण्यासाठी अंबरने मदत केली होती. पण राजकारणाचा पट बदलला आणि शाहजहानाने निजामशाही नष्ट करण्यासाठी मोठे सैन्य पाठवले.
मलिक अंबरच्या शेवटच्या काळात त्याला अनेक पराभव पचवावे लागले. पण सगळ पचवून तो आपल्या राजकीय डावपेच आणि लष्करी ताकदीच्या जोरावर पुन्हा पुन्हा उभा राहिला. त्याच्या मरणापूर्वी काही महिन्यांपूर्वी त्याने मुघलांविरुद्ध मोठा विजय मिळवला होता.
मलिक अंबरचे महाराष्ट्रासाठी एक मोठे योगदान म्हणजे मराठा सरदारांना दिलेले पाठबळ. शिवाजी महाराजांचे दोन्ही आजोबा म्हणजे जिजाबाईंचे वडील लखुजी जाधवराव आणि शहाजीराजांचे वडिल मालोजीराजे भोसले यांसह अनेक मराठा सरदारांना त्याने निजामशाहीत मोठमोठी पदे दिली. हिंदू मुस्लिम असा भेद त्याच्यापाशी नव्हता. शिवाजी महाराजांचे वडिल शहाजीराजे यांची सुरुवातीची सगळी कारकीर्द मलिक अंबरच्या सान्निध्यात घडली. यामुळेच शिवाजी महाराजांच्या मनात मलिक अंबरबाबत अत्यंत आदराची भावना होती.
लोकांना कमीत कमी त्रास होईल अशी करवसुलीची पद्धत अंबरने लागू केली. यातून पडिक जमिन वहिवाटीला आणण्यास प्रोत्साहन मिळाले. हीच पद्धत काही बदल करुन शिवाजी महाराजांनी स्वराज्यात लागू केली.
आफ्रिकन गुलामांच्या कहाण्या अतिशय करुण आहेत. लाखो लोकांना पकडुन जगभरातील बाजारांमध्ये विकले गेले. त्यांच्या पिढ्यानपिढ्या गुलाम म्हणून जगल्या आणि मेल्या. अशा लाखोंपैकी काहीजणांना या गुलामीतून सुटका करून घेण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करून दाखविणाऱ्या काही लोकांमध्ये मलिक अंबरचा समावेश होता. स्थानिक- परदेशी, हिंदु- मुस्लिम, स्थानिक- परप्रांतीय असे अनेक भेद उभे करणाऱ्या या जगात इथियोपियात जन्मलेला एक माणूस गुलाम म्हणून महाराष्ट्रात येतो. या महाराष्ट्राच्या मातीला आपली समजून इथल्या मातीच्या आणि माणसांच्या रक्षणासाठी आपले आयुष्य खर्ची घालतो. हे पाहिल्यावरतरी आपल्या मनातील असे भेद नाहिसे झाले पाहिजेत.
एक सच्चा महाराष्ट्रीयन असलेला मलिक अंबर 1626 मध्ये मरण पावला. त्यानंतर निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजांनी अपयशी लढा उभा केला. मलिक अंबरच्या मरणानंतर चार वर्षानी याच शहाजीराजांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे दैवत शिवाजीराजे शिवनेरीवर जन्माला आले.