आदर्श व्यक्तिमत्वे – 2. मलिक अंबर
आफ्रिकन गुलाम ते महाराष्ट्राचा राज्यकर्ता असा थरारक जीवनप्रवास असणारा माणूस म्हणजे मलिक अंबर
याचा जन्म आफ्रिकेतील इथिओपियाचा. चापू हे मुळचे नाव. आफ्रिकन काळ्या लोकांना पकडून गुलाम म्हणून जगभर विकण्याची त्या काळात स्पर्धाच सुरु होती. चापूचे घर इतके गरीब की त्याच्या आईवडिलांनीच त्याला वयाच्या आठ, नऊ वर्षी मक्केच्या अरब व्यापाऱ्यांना विकले. या व्यापाऱ्यांनी त्याला बगदादच्या एका सरदाराला विकले. या सरदाराने त्याला मलिक अंबर हे नाव दिले आणि मुस्लीम धर्म दिला. तिथेच त्याचे शिक्षण सुरु झाले. काही वर्षात अंबर त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्या सरदाराचा अतिशय आवडता झाला. इतका की त्या सरदाराची मुले त्याचा व्देष करु लागली. यामुळेच या सरदाराच्या मरणानंतर या मुलानी तातडीने मलिक अंबरला विकून टाकले. त्यांनी त्याला विकले महाराष्ट्रातील अहमदनगर येथील वजीराला. त्यावेळी अहमदनगर हे स्वतंत्र राज्य होते. देशाच्या दक्षिणेकडे ज्या पाच मुस्लिम राजवटी होत्या त्यात अहमदनगर एक होते. येथेही अंबरने वजिराचा विश्वास संपादन केला. जात्याच हुशार असलेल्या अंबरने लष्करी शिक्षण, राजकारण यासह इमारती बांधण्याच्या कामातही प्राविण्य मिळवले. अहमदनगरच्या राजकारणात त्याच्या मालकाचा म्हणजेच वजिराचा खून झाला. त्यानंतर वजिराच्या पत्नी आणि मुलांनी अंबरला गुलामीतून मुक्त केले. त्यावेळी त्याचे वय फक्त पन्नास वर्षे होते.
यानंतरच्या त्या आयुष्यातील 30 वर्षात मलिक अंबर महाराष्ट्राच्या राजकारणाचा सूत्रधार म्हणूनच वावरला.
या काळात दिल्लीच्या मुघलांनी अहमदनगरवर पुर्ण ताकदीने हल्ला चढवला. त्या रेट्यामुळे ही राजवट कोसळण्याच्या बेतात आली.
त्यावेळी धावून आली चांदबीबी. अहमदनगरची मुलगी आणि विजापूरची सून असलेली चांदबीबी आपल्या माहेरच्या रक्षणासाठी अहमदनरला परतली. तिने मुघलांशी जोरदार लढा दिला. त्यावेळेस तिच्या बाजुने लढणाऱ्यात मलिक अंबरही होता.
पण दैवाची गती फिरली. चांदबीबीचा तिच्याच सरदारांनी खुन केला. मुघलांचा जोर वाढला, त्यांनी अहमदनगर सह जवळपास सगळ राज्य ताब्यात घेतले.
त्यावेळेस मलिक अंबरने ठरवले कि आता जगायच किंवा मरायचे ते अहमदनगरच्या निजामशाहीसाठी. त्याने आपल्यासारख्या आफ्रिकन गुलामांची फौज उभी केली आणि मुघलांशी लढा द्यायला सुरवात केली.
गनिमी काव्याचा वापर करून त्याने मुघलांना हैराण करून सोडले. हळूहळू त्याची ताकद वाढत गेली. त्याच्याजवळ तीस हजाराची फौज जमली.
आता त्याच्या जोडीला आले मराठे. लखुजीराव जाधवराव, मालोजीराजे भोसले यांच्यासह अनेक मराठे सरदारांना त्याने मोठा मानमरातब देऊन आपल्याबरोबर घेतले.
निजामशाहीचा कोणी वारस शिल्लक नव्हता, जे होते ते मुघलांच्या कैदेत होते. अंबरने त्यातूनही एक वारस शोधला. त्याला सुरक्षित वाटावे म्हणून त्याच्याशी आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. त्याला त्याने निजामशहा म्हणून घोषित केले आणि मलिक अंबर त्याचा वजीर बनला.
मुघलांकडून जवळजवळ सगळे राज्य त्याने परत मिळवले.
यानंतरचे त्याचे कर्तृत्व केवळ लष्करी नाही तर एक राज्यकर्ता, मुसद्दी, एका शहराचा निर्माता म्हणून लक्षात राहण्यासारखे आहे.
औरंगाबाद हे आजचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर. या शहराचा निर्माता मलिक अंबर. या शहराचे त्यानी ठेवलेले नाव खिडकी.
मलिक अंबरने निजामशाहीची राजधानी अहमदनगर हुन खिडकी म्हणजे आजच्या औरंगाबाद येथे नेली. राजधानीच्या या शहरात त्याने अनेक इमारती बांधल्या. या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एक कँनाँल त्याने बांधला. कमी वेळेत आणि कमी खर्चात बांधलेला हा कँनाँल त्या काळातील एक आश्चर्य मानला जायचा.
मलिक अंबरची गोष्ट एका पोस्टमध्ये संपणारी नाही. त्यामुळे उरलेला भाग नंतरच्या पोस्टमध्ये