आदर्श व्यक्तिमत्वे 1.अतातुर्क केमाल पाशा

अतातुर्क केमाल पाशा

पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध या दरम्यानच्या काळातील दोन देशात निर्माण झालेल्या दोन नेत्यांची तुलना करता येण्यासारखी आहे. दोघेही अत्यंत देशभक्त होते. यातील एकाने आपला कोसळलेला देश पुन्हा उभा केला आणि दुसऱ्याने आपल्या देशाला अतिरेकी राष्ट्रवादाचा डोस देत दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले.

हे दोन नेते म्हणजे तुर्कस्तानचे अतातुर्क केमाल पाशा आणि जर्मनीचे अॅडॉफ हिटलर.

हिटलरबद्दल लोकांना खुप माहिती आहे, पण अतातुर्कबद्दल फारच कमी. मात्र अतातुर्कनी ज्या पद्धतीने आपला देश पुन्हा उभा केला ते पाहिल्यावर या माणसाला सलाम केल्याशिवाय राहवत नाही.

त्यांचे खर नाव मुस्तफा. तुर्कस्थानात लोक आडनाव लावत नसत. अतातुर्क यांनी सत्तेवर आल्यावर प्रत्येकाने आडनाव लावल पाहिजे असा कायदा केला. त्यानंतर त्यांच्यासाठी निवडले गेलेले आडनाव म्हणजे अतातुर्क. अतातुर्क म्हणजे पहिला तुर्क. हे आडनाव केवळ अतातुर्क यांनाच दिले गेले. हे आडनाव त्यांच्याशिवाय कुणालाही वापरण्यास तुर्कस्थानमध्ये बंदी आहे.

केमाल हे तुर्कस्थानातील एक लोकप्रिय कवीचे नाव. ते अतातुर्क यांनी स्विकारले. तुर्कस्थानच्या बादशहाला पाशा म्हणण्याची पद्धत होती. अतातुर्क हे लोकशाहीवादी नेते होते त्यामुळे त्यांनी कधी राजेपद स्विकारले नाही. पण तुर्कस्थानची जनता त्यांना प्रेमाने पाशा म्हणत असे. त्यामुळे ते प्रसिद्ध झाले अतातुर्क केमाल पाशा या नावाने.

पहिल्या महायुद्धात तुर्कस्थानचा भीषण पराभव झाला. त्यानंतर दोन खंडात पसरलेल्या तुर्कस्थानच्या ऑटोमन साम्राज्याचे विजेत्या राष्ट्रांनी लचके तोडण्यास सुरवात केली. त्यांच्याबरोबर यशस्वी लढा देऊन आपला बराचसा प्रदेश आपल्या ताब्यात ठेवण्यात ते यशस्वी झाले. मात्र यानंतर त्यांनी जे काम केले ते मात्र कल्पनेबाहेरचे होते.

तुर्कस्थानचा बादशहा हा जगातील मुस्लिमांचा खलिफा मानला जात असे. त्यामुळे हा देश कट्टरपंथीयांचा अड्डा होता. ज्यावेळेस युरोपात प्रिंटीग प्रेस सुरू झाल्या, त्यावेळी त्या काही प्रमाणात तुर्कस्थानमध्येही सुरू झाल्या. पण त्यावेळच्या तुर्कस्थानच्या बादशहाने त्यावर इस्लामविरोधी म्हणून बंदी घातली. त्यामुळे आधुनिक शिक्षणापासून तुर्कस्थान फारच लांब राहिला. एकढेच नव्हे तर या देशात साध्या चार ओळी लिहू शकणाऱ्या लोकांची संख्या फारच कमी होती. तुर्की भाषेला कोणतीही एक अधिकृत लिपी नव्हती. पद्धतशीर शिक्षणाची कोणतीही व्यवस्थाच नव्हती. अर्थातच स्त्रियांची परिस्थिती याहून फारच भीषण होती. अशिक्षितता, अंधश्रद्धा, अडाणीपणा असे अवगुण भरपुर असलेल्या या तुर्कस्थानचा अतातुर्क यांनी अक्षरश: कायापालट केला.

त्यांनी केलेल्या मुलभूत बदलांपैकी एक म्हणजे शिक्षण. हे सगळ क्षेत्र त्यांनी जणू नव्याने उभे केले.

त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. तुर्की भाषेला लॅटिन लिपी अनिवार्य केली. शिक्षणामध्ये विज्ञान, गणीत यासारख्या मुलभूत विषयांचा प्रामुख्याने समावेश केला. त्यासाठी आधी शिक्षक तयार केले, त्यांना प्रशिक्षण दिले. पाठ्यपुस्तके तयार केली, काही पाठ्यपुस्तके तर स्वत: अतातुर्क यांनी लिहली. स्त्री पुरुषांच्या सहशिक्षणावर भर दिला. अशा रितीने सगळया देशातील मुलांना आणि प्रौढांनाही सक्तीने शिकायला लावले. त्याचा परिणाम असा की 1923 ते 33 या दहा वर्षात या देशातील शिक्षितांची संख्या 9 टक्क्यांवरून 33 टक्क्यांवर गेली.

इस्तंबुलच्या विद्यालयातील विद्यार्थिनींसोबत अतातुर्क

आणखी एक मुलभूत बदल म्हणजे स्त्री स्वातंत्र्य. पडद्यात राहणाऱ्या तुर्कस्थानातील स्त्रीला त्यांनी शिक्षणाची संधी दिली. समान वागणूक दिली. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. एक महिला या काळात पायलट झाली. तुर्कस्थानात या काळात भरविलेल्या पहिल्या सौदर्यस्पर्थेमध्ये एक महिला मिस तुर्की झाली. 1935 च्या तुर्की संसदेमध्ये 18 महिला खासदार निवडून आल्या. या काळात जगातील अनेक देशात स्त्रीयांना मतदानाचा अधिकारही नव्हता. त्या काळात हा चमत्कार अतातुर्क यांनी घडवून आणला.

ज्या देशाचा बादशहा हा साऱ्या जगातील मुस्लिमांचा खलिफा म्हणवला जाई. ती खिलाफत अतातुर्कांनी रद्द करून टाकली. तुर्कस्थान हा धर्मनिरपेक्ष देश असेल, तिथे सरकारचा कोणताही धर्म नाही. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी दिले.

या अशाप्रकारचे निर्णय घेणाऱ्या अतातुर्क यांना सहजपणे तुर्कस्थानाचा हुकुमशहा होता आले असते. पण त्यांनी या देशात लोकशाही रुजविली. विरोधी पक्ष उभे केले. आपल्याच काही लोकांना या विरोधी पक्षात जाऊन हे विरोधी पक्ष सक्षम करायला लावले. ठरलेल्या वेळेनुसार निवडणूका घेतल्या. लोकशाहीसाठी लागणाऱ्या सगळ्या संस्था उभ्या केल्या आणि त्यांना बळ दिले.

जणू चमत्कार वाटावा असा हा केवळ 1923 ते 1938 हा केवळ पंधरा वर्षांचा काळ. या काळात अतातुर्क यांनी तुर्कस्थानचा जणू कायापालट केला. धर्माधारित जुनाट व्यवस्था बदलून त्यांनी हा आधुनिक, धर्मनिरपेक्ष तुर्कस्थान घडवला.

अतातुर्क कोणी संत नव्हते, बायका आणि दारू ही त्यांची कमजोरी होती. पण कोणीही स्त्री त्यांना देशहिताविरोधात काम करायला भाग पाडू शकली नाही. त्यांनी आयुष्यभर प्रचंड दारू प्यायली. त्यांचा शेवटही दारूच्या दुष्परिणामांमुळेच झाला. परंतू ही दारूही त्यांना देशहिताचे काम करण्यापासून अडवू शकली नाही.

याच काळात हिटलर जर्मनीला देशभक्तीच्या नावाखाली दुसऱ्या महायुद्धाकडे ढकलत होता आणि अतातुर्क साऱ्या जगाशी समन्वय ठेऊन स्वत:चा विकास करू पाहणाऱ्या तुर्कस्थानची उभारणी करत होते.

आज तुर्कस्थानचेही इस्लामीकरण करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. तुर्कस्थानमधून अतातुर्क यांचे विचार संपवण्याचे काम चालू आहे. पण अतातुर्क यांनी उभे केलेले कामच एवढ मुलभूत आहे की कोणीही तुर्कस्थानला पुन्हा त्याच्या जुन्या रुपात नेऊ शकत नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.