
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी एक पिढी होती. स्वातंत्र्य मिळण्याची खात्री नव्हती. स्वत:सह सारे घरदार प्रचंड अडचणीत सापडण्याची मात्र खात्री होती. या पिढीचे काही प्रतिनिधी त्यादिवशी पणदरे गावच्या चावडीवर उभे होते. हातापायात साखळदंड बांधलेले, पोलिसांचा पहारा अशा बंदोबस्तात त्यांना तेथे आणण्यात आले होते. गावाला दहशत बसावी असाही उद्देश असावा पोलिसांचा त्यांना तिथे आणण्यात. त्यातच फौजदार त्यातल्याच एका बारीक चणीच्या तरुणाला मोठ्याने ओरडून म्हणाला, काय जगन्नाथ, कशाला या नसत्या फंदात पडलाय. ऐवढ्या बोलण्यावर जगन्नाथ जो उसळला, त्याने हातापायाला बांधलेल्या दोरखंडांना हिसडा दिला. समोरच्या फौजदाराला सरळ उचलला आणि उचलून खाली आपटला. सगळे पोलिस धावले, त्यांनी त्या फौजदाराला जगन्नाथच्या हातून सोडवले. सारे वातावरण एकदम तंग झाले. सगळ्या पोलिसांनी बंदुका जगन्नाथवर रोखल्या. जगन्नाथचे इतर सारे सहकारी जगन्नाथच्या अंगावर पडले. त्यांनी पोलिसांना सांगितले, जर मारायचच असेल तर आम्हा सगळ्यांनाच मारा. आम्ही तुम्हाला जगन्नाथला मारू देणार नाही. सगळ्यांच्या या एकजुटीने त्या दिवशी जगन्नाथ जिंवत राहिला. पुढे त्या सर्वांना कोर्टात हजर करण्यात आले. देशाच्या स्वांतत्र्यासाठी लढण्याची शिक्षा म्हणून त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचीही पर्वा न करणारा हा जगन्नाथ म्हणजेच जगन्नाथआण्णा कोकरे.
1942 च्या लढ्यात बारामती तालुक्यातील अनेकजण इंग्रज सरकारविरुद्ध भुमिगत राहून लढत होते. उद्धवराव इंगुले, भाई गुलामअली, बुवासाहेब गाडे, धोंडिबा खोमणे(रामोशी), जगताप यांच्यासह जगन्नाथआण्णाही यात सामील होते. या आंदोलनात बारामतीत तारा तोडणे, टपाल कार्यालय बंद पाडणे या कारवायात आण्णा पुढे होते. याचवेळी भूमिगत असताना त्यांना पकडण्यात आले. त्यानंतर पणदऱ्याच्या चावडीत वर सांगितलेला प्रसंग घडला. त्यानंतर साहजिकच तुरुंगवास पदरी आला. वेगवेगळ्या वेळचा मिळून एकुण तीन वर्षे जगन्नाथआण्णांनी तुरुंगात काढली. मागे राहिलेली त्यांची पत्नी एकटीच संसाराचा गाडा ओढत राहिली.
खरेतर जगन्नाथआण्णांनी याअगोदर बारामतीत गोविंदराव पवारांच्या सोबत शेतकऱ्यांसाठी आडत दुकान सुरू केले होते. थोडीफार शेती होती. देशभक्ती अंगात होतीच. शरीर बारीक चणीचे असले तरी भरपूर व्यायामाने कमावलेले होते. पण 42 चे चलेजाव आंदोलन सुरू झाले. स्वांतत्र्य मिळविण्याचे वेड अंगात शिरले त्यामध्ये आण्णा जे बाहेर पडले ते त्यांनी परत त्या दुकानाकडे पाहिलेही नाही. त्यानंतर स्वातंत्र्यही मिळाले पण जगन्नाथआण्णांचे मन त्यानंतरही संसारात काही रमले नाही. त्यांच्या थोरल्या मुलाने पुढे अनेक कष्ट काढून शेतीवाडी वाढवली.
स्वांतत्र्यानंतर बारामतीतील प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये आण्णांचा समावेश होता.जिल्हा लोकल बोर्डावर शारदाबाई पवारांसोबत जगन्नाथआण्णाही सभासद होते. गोविंदराव पवारांची त्यांची घट्ट मैत्री. आण्णांच्या संसाराची काहीतरी व्यवस्था लागली पाहिजे असे गोविंदरावांना सतत वाटत असे. त्यासाठी आण्णांची गावाकडची काही जमिन विकुन काही रक्कम जमा करायला लावली. पणदरे येथील लाड कुटुंबियांची जमिन विकायची होती. गोविंदरावांनी ती आग्रह करून जगन्नाथआण्णांना द्यायला लावली. त्या काळच्या गावकीच्या पद्धतीप्रमाणे यालाही विरोध झालाच. परंतू गोविंदरावांनी सर्वांची समजून काढून ती जमीन आण्णांना घेऊन दिली. त्यानंतर त्यांचा संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू झाला.
परंतू आण्णा मात्र घरापेक्षा लोकांचा संसार उभा करण्याच्या कामात जास्त रमत असत. पणदऱ्याजवळील हनुमानवाडी येथे त्यांनी तालुक्यातील पहिली दुधसंस्था काढली. त्यावेळेस हनुमानवाडीतील सरकारी रेस्टहाऊसवर तालुक्यातील अनेक महत्वाचे राजकीय निर्णय होत असत. याच रेस्टहाऊसवर यशवंतराव चव्हाण आले असताना जगन्नाथआण्णा आणि भीमदेवराव गोफणे यांनी बारामतीत आयात उमेदवार नको, स्थानिक उमेदवार द्या असे ठणकावून सांगितले होते
परंतू इतक्या जेष्ठ कार्यकर्त्यानेही शरद पवार नावाच्या एका तरुण मुलाला आपला नेता का मानले याची हकिगत जगन्नाथआण्णा नेहमी सांगत असत. ही 62 किंवा 63 सालातली गोष्ट असावी. पणदरे गावात एक सरकारी दवाखाना असला पाहिजे याबाबत गावातील पुढारी मंडळींची चर्चा झाली. पण सरकारी दवाखाना गावात आणण्यासाठी काय केले पाहिजे हे मात्र कोणालाच माहिती नव्हते. त्यावेळी ही जबाबदारी विठ्ठलराव कोकरे व जगन्नाथआण्णा कोकरे यांच्यावर टाकण्यात आली. दोघेही दुसऱ्या दिवशी बारामतीला आले, अनेक ठिकाणी गेले, पण योग्य दिशा काही दिसेना. त्यावेळी विठ्ठलराव जगन्नाथआण्णांना म्हणाले, आपण काटेवाडीला जाऊ, गोविंदरावांचा मुलगा शरद आहे, तो सध्या यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर असतो. त्याच्याकडे आपल्याला काहीतरी माहिती मिळेल. यावर दोघेही मोटारसायकलवर काटेवाडीला गेले. शरद पवारांना भेटले. शरद पवारांनी त्यांना तीन दिवसांनी मुंबईत मंत्रालयात येऊन भेटण्यास सांगितले. त्याचवेळी मंत्रालयात प्रवेशासाठीचे दोन पासही त्यांच्या हातात ठेवले. ते ठरल्यावेळी मंत्रालयात पोचले त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर शरद पवार माणसांच्या गराड्यात उभे होते. या दोघांना पाहताच ते त्यांच्याजवळ आले. आपल्याजवळील फाईलमधून काही कागदपत्रे काढून त्यांच्या हातात ठेवली. पणदरे गावाला सरकारी दवाखाना मंजुर झाल्याची ती कागदपत्रे होती. कामाचा हा झपाटा पाहिल्यावर बारामतीला नेता पाहिजे तो असाच असला पाहिजे या विचाराने जगन्नाथआण्णांनी या तरुणाचे नेतृत्व स्विकारले आणि आपल्या आयुष्यभर निभावले.
त्यामुळे 67 साली शरद पवार नावाच्या या तरुण कार्यकर्त्याला कॉंग्रेसचे तिकीट मिळाले तेव्हा पुर्ण ताकदीनिशी त्याचा प्रचार आण्णांनी केला. ऐवढेच नव्हे तर या तरुणाला तिकिट मिळावे यासाठी सर्व प्रयत्नही केले. परंतू त्यांच्या आयूष्यातील खरा कसोटीचा क्षण उभा राहिला तो 72 सालच्या निवडणूकीत. एकीकडे त्यांचे आवडते शरद पवार आणि दुसरीकडे प्रत्यक्ष त्यांचे जावई अँड.विजयराव मोरे एकमेकाविरोधात उभे राहिले. शिवाय जातीच्या आधारावर मतविभागणी होण्याचीही शक्यता निर्माण झाली. स्वातंत्रचळवळीत तालून सुलाखून निघालेल्या आण्णांना निर्णय घेण्यासाठी क्षणाचाही वेळ लागला नाही. ते जातीच्या राजकारणाविरोधात उभे राहिले, प्रत्यक्ष आपल्या जावयाच्या विरोधात उभे राहिले. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिलेल्या शरद पवारांच्याच बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. केवळ बोलून ते थांबले नाहीत. त्यांनी जाहिर पत्रक काढले, निवडणूकीत जाहिर प्रचार केला. माझा जावई वकील आहे, त्याने वकिली करावी, राजकारण करू नये. शरद पवारांसारख्या नेतृत्वाच्या आड येऊ नये. त्यामुळे आपल्या जावयाला पराभूत करा आणि शरद पवारांना निवडून द्या असे आवाहन ते जाहिरपणे करत होते. हेच आवाहन करण्यासाठी ते आपल्या सर्व पाहूण्यांकडे गेले. आजच्या संधीसाधू राजकारणात आता उदाहरण द्यायलाही असा प्रसंग सापडणार नाही.
शरदरावांवर त्यांचे प्रेम असेच आयुष्यभर राहिले. त्यांच्या विरोधातला एक शब्दही त्यांनी कधी ऐकून घेतला नाही. हनुमानवाडी येथे त्यांच्या मुलांनी नवीन घर बांधले. शरद पवारांखेरीज त्या घरात जायलाही ते तयार होईनात. जोपर्यंत शरद पवार त्या घरी येत नाहीत तोपर्यंत त्या घरी मी येणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितले. त्यावेळी शरदराव मुख्यमंत्री होते. आण्णांच्या मुलांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांना आमंत्रण दिले व आण्णांचा हट्ट सांगितला. त्यामुळे वेळात वेळ काढून शरदरावांनी या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
जगन्नाथआण्णा कोकरे यांची कन्या अलकाताई कोकरे यांचे मनोगत
पवारसाहेबांचे कुटंब व माझे वडील जगन्नाथआण्णा कोकरे यांचे कुटूंब या दोन्ही कुटूंबाचा घरोबा साहेब राजकारणात येण्यापूर्वीचा आहे. पवारसाहेबांच्या आई शारदाबाई व आण्णा हे दोघेही जिल्हा लोकल बोर्डाचे मेंबर होते. 52 साली दोघेही निवडून आले होते. शारदाबाई व माझी आत्या चंद्राबाई या दोघी शिक्षिका होत्या. साहेबांचे वडिल गोविंदराव, माझे वडील आणि माझ्या आत्याचे पती संभाजी सोलनकर यांची मैत्री होती. निरा खरेदी विक्री संघाच्या जडणघडणीत यांचा सिंहाचा वाटा आहे.
पवारसाहेबांचे मोठे बंधू अँड. वसंतराव पवार हे शेतकरी कामगार पक्षामध्ये सक्रीय काम करीत होते. पवारसाहेब कॉंग्रेस पक्षात काम करू लागले. माझे वडिल स्वातंत्र्यसैनिक, कॉंग्रेस पक्षाचे चाहते, गांधी व नेहरू यांना दैवत मानणारे, अगोदरच पवार कुटुंबाची जवळीक, त्यातून पवारसाहेब व आण्णा एकाच पक्षाचे काम करीत असल्याने साहेंबाबद्दल आण्णांच्या मनात खुप प्रेम होते. मी पवारसाहेबांना प्रथम पाहिले ते पुण्याच्या हिराबाग मैदानावर. इंदिरा गांधी यांची सभा होती. सभेत शिरायलाच जागा नव्हती. त्यावेळी शिडशिडीत बांध्याच्या, उत्साहाने भरलेल्या या तरुण कार्यकर्त्यांने आण्णांना व माझ्यासह त्यांच्या कुटुंबियांना पहिल्या रांगेत नेऊन बसविले होते.
साहेबांचे कौतुक करताना आण्णा अतिशयोक्ती करत असता. अधुन मधून हिंदीमध्ये बोलत, मला व माझे भावांना हसू यायचे पण आण्णांना काही सांगायची सोय नव्हती. साहेबांच्या निवडणूकीच्या प्रचारात आण्णा तहानभूक विसरून काम करीत. वयोमाने आण्णांना सर्दीचा व खोकल्याचा प्रचंड त्रास होता. प्रचारावरून आल्यावर आण्णांना खोकल्याचा प्रचंड त्रास व्हायचा. माझी आई म्हणायची, उद्या प्रचाराला जावू नका. आण्णा हो म्हणायचे. दुसऱ्या दिवशी आम्ही उठण्यापूर्वी पहाटे लवकर उठून चुलीवर पाणी तापवून अंघोळ करून, कडक कपडे घालून व डोक्यावर टोपी चढवून प्रचारासाठी बाहेर पडायचे. पुढे पुढे आम्ही सांगायचेच सोडून दिले.
माझे पती अँड. विजयराव मोरे पवारसाहेबांच्या विरोधात 1972 व 1978 या दोन विधानसभा निवडणूकीत उभे होते. 1978 ची निवडणूक अटीतटीची होती. माझी अपेक्षा होती की आण्णांनी शांत रहावे व कोणाचीच बाजू घेऊ नये. आण्णांनी माझे न ऐकता कै. भिमदेव गोफणे व कै. विठ्ठलराव कोकरे यांच्याबरोबर निवडणूकीच्या प्रचारात माझ्या पतीच्या विरुद्ध पत्र काढले. आमच्या सर्व पाहुण्यांकडे जाऊन पवारसाहेबांचा प्रचार केला. अत्यंत कमी मताने मोरे पराभूत झाले. या निवडणूकीनंतरही मोरे व कोकरे कुटुंबियांमध्ये कोणताही तणाव निर्माण झाला नाही. आण्णांच्या प्रेमामुळे अँड. मोरे यांना 1990 साली पवारसाहेबांनी आमदार केले. पवार, कोकरे व मोरे या तीनही कुटुंबात राजकीय मतभेद होते परंतू मनभेद कधीही झाला नाही. त्यामुळे राजकीय जीवनात कोणाच्याही मनात वैरभाव नव्हता आणि नाही.
आण्णांच्या प्रेमामुळे साहेब माझ्या लग्नाला उपस्थित होते. आण्णांना त्यांनी स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीवर घेऊन त्यांचा गौरव केला होता. आण्णांच्या 75 व्या वाढदिवशी साहेबांनी दिवसभर हजेरी लावली. मध्यंतरी साहेब माझ्या मुर्टी मोढवे गावातील आश्रमशाळेत आले होते. त्यावेळी आण्णांची आठवण निघाली. साहेबांनी आण्णांच्या नावाने वसतीगृहाची इमारत बांधून देण्याचे त्यावेळी ठरविले व त्याप्रमाणे इमारत बांधुनही दिली.
आण्णा व पवारसाहेबांच्या या नात्याबद्दल खुप काही सांगता येईल. स्वत: पवारसाहेबांनी डॉ. राजेश कोकरे यांच्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या उद्घाटनावेळी सांगितले की माझ्या राजकीय कारकिर्दीचा आलेख जगन्नाथआण्णांच्या सहकार्याशिवाय पुर्ण झालाच नसता.
अलकाताई मोरे
—————————————————————–