सखे आणि सोबती -खुशालभाऊ छाजेड

शरद पवार यांचे बारामतीतील आणखी एक सहकारी कै. खुशालभाऊ छाजेड यांचे व्यक्तिचित्र

खुशालशेठ छाजेड यांच्या दुकानात शरद पवारांची बैठक

विद्या प्रतिष्ठानला मिळालेल्या देणग्यांबाबत विधानसभेत गरमागरम चर्चा सुरू होती. पवारसाहेब उत्तर द्यायला उभे राहिले. विरोधकांचे आरोप खोडताना ते म्हणाले, “विद्या प्रतिष्ठानचा खजिनदार तुमचाच आहे.” काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची शैक्षणिक संस्था आणि त्याचे खजिनदारपद विरोधी विचारधारेच्या माणसाकडे. हे ऐकून विरोधक थंड झालेच, अनेक पत्रकारांनीही कान टवकारले.
या माणसाचे नाव खुशालचंद ऊर्फ खुशालभाऊ छाजेड. छाजेड कुटुंब मूळचे बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठारचे. त्यानंतर ते बारामतीत स्थायिक झाले. खुशालभाऊंचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण बारामतीतील मएसो हायस्कूलमध्ये झाले. खुशालभाऊंनी दौलतराम माणिकचंद छाजेड या नावाने आडत दुकान चालवले. त्यानंतर कापड व्यवसायही केला. चरितार्थासाठी त्यांनी हे व्यवसाय केले असले तरी ते खर्‍या अर्थाने ते रमायचे सामाजिक कामातच. काही काळ ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारकही होते. बारामती तालुक्यात अनेक गावांत शाखा सुरू करण्यासाठी सायकलवरून हेलपाटे मारत असत. गोळवलकर गुरुजी बारामतीला आले असताना त्यांचे रेल्वे स्टेशनवर स्वागत करण्यासाठी तसेच त्यांची बारामतीतील व्यवस्था पाहण्यासाठी पुढे होते ते खुशालभाऊ. नंतर आरएसएसचे सक्रिय काम सुरू राहिले नाही; पण डोक्यावरची काळी टोपी मात्र आयुष्यभर राहिली.

बैठक सुरू आहे

या माणसाची आयुष्यभराची मैत्री जमली ती मात्र काँग्रेसी विचारधारा मानणार्‍या शरद पवारांशी. या मैत्रीत विचारसरणीचा अडसर कधीच आला नाही. जो विश्वास साहेबांनी स्वपक्षातल्या माणसांवर दाखवला नाही तो खुशालभाऊंवर दाखविला. १९७२ साली बारामतीत इंग्रजी माध्यमाची शाळा पाहिजे यासाठी साहेबांकडे पाठपुरावा करणार्‍यांमध्ये भाऊ होते. त्यातूनच विद्या प्रतिष्ठानची कल्पना पुढे आली. विद्या प्रतिष्ठानच्या संस्थापक ट्रस्टीत खुशालभाऊ होते. त्यानंतर त्यांच्यावर खजिनदारपदाची जबाबदारी साहेबांनी दिली. खुशालभाऊंच्या निधनापर्यंत ही जबाबदारी त्यांच्याकडेच राहिली. खुशालभाऊंचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. पत्राचा बिनचूक ड्राफ्ट तयार करावा तर तो त्यांनीच. त्यामुळे विद्या प्रतिष्ठानमध्ये कोणताही बडा पाहुणा आला की त्याला सर्व माहिती देण्याची जबाबदारी भाऊंवरच असे. ज्येष्ठ वैज्ञानिक आणि नंतर भारताचे राष्ट्रपती बनलेले अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, विजयपत सिंघानिया अशा अनेकांबरोबर चर्चा करण्याचा योग त्यामुळे भाऊंना आला. बारामतीमध्ये अनेक संस्थांवर खुशालभाऊंनी काम केले. बहुतेक वेळा त्यांच्याकडे येणारी जबाबदारी खजिनदारपदाचीच असे.
शरद पवारांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कधीतरी त्यांचा आणि भाऊंचा परिचय झाला. तसे पाहिले तर भाऊ पवारसाहेबांना खूप सिनिअर; पण साहेबांचे वैशिष्ट्य हे की त्यांच्या मैत्रीत वय कधी आड आले नाही. भाऊंच्या आडत दुकानावर शरदराव अनेकदा येऊन बसायचे. भाऊ त्यांच्या कामात व्यग्र असत. शरदराव तेथे बसून पेपर वाचत असत; परंतु त्याच काळात त्यांनी भाऊंचा व्यवहारातील चोखपणा, प्रामाणिकपणा पाहिला असावा. त्यानंतर साहेबांच्या प्रत्येक सामाजिक कामात भाऊ त्यांच्या सोबतीने राहिले. एमईएसमध्ये मुलींसाठी शाळा सुरू झाली. ही शाळा सुरू व्हावी, यासाठी देणग्या मिळवण्यासाठी साहेबांसोबत अनेक कार्यकर्त्यांत भाऊही होते. राज्यात आज गौरवाचा विषय असलेली शेठ तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाची वादविवाद स्पर्धा सुरू करण्याची आणि त्याला मोरोपंतांचे नाव देण्याची कल्पना भाऊंचीच. असेच मोरोपंताचे नाव बारामती नगर परिषदेच्या वाचनालयाला देण्याची सूचना त्यांनी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना मांडली आणि ती मान्यही करून घेतली. दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारण्यासाठी, पानशेतच्या पूरग्रस्तांना मदतीसाठी, अवर्षणग्रस्तांना मदत करण्यासाठी, जेथे जेथे पुढाकार घेण्याची गरज वाटली, तेथे तेथे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येणार्‍या कार्यकर्त्यांत असायचे खुशालभाऊ. याला अपवाद राजकीय क्षेत्राचा. भाऊंचे याबाबतीतील विचार पवारसाहेबांना माहीत होते आणि त्याबद्दल आदरही होता. त्याचमुळे विधानसभेतही त्यांनी छातीठोकपणे याचा उल्लेखही केला.
बारामतीतील अनेक संस्थांच्या उभारणीत भाऊंचा मोठा सहभाग होता. त्यावेळी रुपी बँकेची शाखा बारामतीत व्हावी, ही साहेबांची इच्छा. त्यासाठीची पहिली बैठक खुशालभाऊंच्या दुकानी झाली. या बँकेवर खुशालभाऊंनी काम करावे हा आग्रहही साहेबांचाच होता. ब्लड बँकेची बारामतीतील उभारणी करण्यात पुढाकार घेणार्‍या कार्यकर्त्यातही ते होते. बारामतीच्या ज्येष्ठ नागरिक संघालाही त्यांनी भरघोस मदत केली. शेठ तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, महात्मा गांधी बालक मंदिर, रिमांड होम, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, अ‍ॅग्रीकल्चर प्रोड्युस मार्केट कमिटी, खरेदी-विक्री संघ एवढेच नव्हे साऊथ सेंट्रल रेल्वेचे स्थानिक सदस्य अशा अनेक संस्थांवर त्यांनी काम केले. बारामतीत स्थानकवासी जैन संघाचेही ते अध्यक्ष होते. ज्या ज्या संस्थेत भाऊंनी काम केले, त्या सर्व ठिकाणी त्यांनी आर्थिक शिस्त कसोशीने पाळली. कायद्याचा चौकटीतच काम केले. बारामती खरेदी-विक्री संघ अडचणीत आला, त्यावेळी साहेबांनी भाऊंना या संस्थेवर चेअरमन करून त्यांच्यावर जबाबदारी दिली. भाऊंनीही ही जबाबदारी पेलून संघ फायद्यात आणला. सहयोग गृहरचना सोसायटीचे अध्यक्षपद साहेबांनी आग्रहाने त्यांना घ्यायला लावले. राज्यस्तरीय खोखो आणि कबड्डी स्पर्धांच्या वेळीही त्याच्या हिशोबाची जबाबदारी भाऊंवरच आली. छाजेड कुटुंबीयांनी भाऊंच्या नावे उभ्या केलेल्या अक्षय आनंद कम्युनिटी सेंटरच्या उद्घाटनाच्या वेळी साहेबांनी भाषणात सांगितले,” विद्या प्रतिष्ठानमध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले; पण खुशालभाऊंची सही आहे हे पाहिले की मी बाकी काही न बघता सही करत असे.” अनेकदा भाऊंचा आर्थिक शिस्तीचा आग्रह आणि साहेबांच्या राजकीय कार्यकर्त्यांचा दबाव यामध्ये संघर्ष उभा राहत असे; परंतु यातून मार्ग काढताना कायदा आणि आर्थिक शिस्त यांना भाऊंनी कधीच फाटा दिला नाही.
विधानसभेत याच खुशालभाऊंचा जाहीर उल्लेख झाल्यावर अनेक पत्रकारांनी भाऊंना गाठून अनेक प्रश्न विचारले. विरोधी पक्षाच्या अनेकांनी भाऊंची भेट घेऊन काहीतरी माहिती मिळावी, यासाठी खूप प्रयत्न केले; पण भाऊंनी त्यांच्या तत्त्वाला जागून योग्य ती उत्तरे दिली. साहेबांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला.
बारामतीच्याच नव्हे तर राज्यातील व्यापार्‍यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या अडचणी साहेबांच्या कानावर घालण्याचे काम भाऊंकडे असे. बारामती मर्चंट असोसिएशनचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होतेच; पण व्यापारीवर्गासंबंधी अनेक कायदे करताना व्यापार्‍यांची भूमिका समजून घेण्यासाठी साहेब ज्या अनेकांशी बोलत असत, त्यामध्ये भाऊंचा समावेश असे.
बारामतीतील मारवाड पेठेतील त्यांच्या दुकानाच्या माडीवर पवारसाहेब अनेकदा वेगवेगळ्या पाहुण्यांना घेऊन येत. सुशीलकुमार शिंदे, शंकरराव पाटील यांच्यासारखे अनेकजण तेथे आलेले आहेत. अनेकदा पक्षीय स्वरूपाच्या बैठकीही होत. एकदा अशीच एक बैठक झाल्यावर पवारसाहेब आलेल्या पाहुण्यांना म्हणाले, “आजची बैठक कोणाकडे झाली माहीत आहे का? आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माणसाकडे पार पडली आहे.” आणि त्यांनी सर्वांची खुशालभाऊंशी ओळख करून दिली.
पवारसाहेबांनी आयुष्यभर माणसे जोडण्याचे काम केले. समोरच्या माणसातला गुण ओळखून त्याला जवळ केले. त्याच्याशी घट्ट मैत्री केली. खुशालभाऊंच्या अखेरच्या दिवसात त्यांना विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात जाणेही अवघड होऊ लागले होते. त्यावेळी त्यांनी खजिनदारपदाची जबाबदारी सोडण्याची इच्छा व्यक्त केली; परंतु पवारसाहेबांनी त्या जबाबदारीतून त्यांना कधीच मुक्त केले नाही. संस्थेची कागदपत्रे त्यांच्या घरी येत असत. ती वाचून त्यावर खुशालभाऊ योग्य त्या सूचना अथवा सह्या करीत असत. काळानेच त्यांना या जबाबदारीतून मुक्त केले; पण पवारसाहेब आणि त्यांच्यामधील निखळ प्रेमाचा धागा मात्र अजूनही तितकाच अतूट आहे.
…………………………………………………………………………………………

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.