शिवाजीराव खटकाळे

शरद पवार यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना शिवाजीराव खटकाळे

महाराष्ट्राच्या औद्योगिक विश्वात १९८० ते ९० चा काळ संप, ताळेबंदी असा औद्योगिक अशांततेचा  होता. कामगार युनियन अत्यंत आक्रमक होत्या. मुंबईमध्ये कापड गिरण्यांमध्ये मालक व कामगारांचा मोठा संघर्ष सुरू होता, ज्याची परिणती मुंबईच्या कापड गिरण्या बंद होण्यात झाली. याची झळ बारामतीच्या परिसरातील वालचंदनगर इंडस्ट्रीजलासुद्धा लागली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वालचंद शेठनी मोठ्या धडाडीने सुरू केलेली ही कंपनीही संपामुळे बंद झाली; परंतु याठिकाणी मात्र हा संघर्ष चिघळला नाही. कारण येथे शरद पवारांसारखा कणखर नेता कंपनी आणि कामगार यांच्यामधील समन्वयाच्या बाजूने उभा राहिला.
या सार्‍या घडामोडी जवळून पाहिलेली, त्यात सहभागी असलेली एक व्यक्ती म्हणजे शिवाजीराव रामचंद्र खटकाळे. शिवाजीरावांचे वडील वालचंदनगर येथे शेती महामंडळात कामाला होते. घरची परिस्थिती सर्वसाधारण. कॉलेजचे शिक्षण बारामतीला झाले. सामाजिक कामाची आवड, त्यामुळे नकळत काँग्रेसच्या कामात ओढले गेले. अनेक राजकीय पदांवर काम केले. त्यावेळेस वालचंदनगर येथील राहणार्‍या एका अनाथ कुटुंबातील बहिणीचे लग्न सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन नीरा नरसिंगपूर येथे लावले. त्यासाठी वालचंदनगरचे हे कार्यकर्ते वर्‍हाडी बनून सायकलवरून तेथे गेले होते.

संपाच्या वेळची अस्वस्थता
कॉलेज संपल्यावर वालचंदनगर इंडस्ट्रीत नोकरी सुरू झाली. आयुष्याची घडी व्यवस्थित बसू पाहत होती. त्याचवेळी १९८५ साली संप सुरू झाला. दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय आक्रमकपणे कामगार एकत्र आले आणि संप सुरू झाला. सुमारे २५०० कामगार, त्यांच्यावर अवलंबून असलेली कुटुंबे अचानक संकटात आली. कंपनीवर अवलंबून असलेली वालचंदनगरची बाजारपेठ ठप्प झाली. महिना झाला तरी मार्ग निघेना. दोन्ही बाजू हटून बसल्या.
शिवाजीरावांसारख्या काही कामगारांच्या मनात मात्र अस्वस्थता होती. काहीतरी चुकत आहे, असे सारखे वाटत होते. संघर्ष हा मार्ग नाही याची जाणीव होत होती; परंतु बहुमत दत्ता सामंतांकडे होते. त्यांच्या आक्रमकतेपुढे सर्वसामान्य कामगार हतबल होता; पण शिवाजीरावांमधला कार्यकर्ता त्यांना गप्प बसू देत नव्हता. हळूहळू त्यांनी आपल्या विचाराचे कामगार एकत्र केले. सुहास जोशी, पांडुरंग बोराटे, राजाभाऊ दुसगकर, सदाशिव दंगाणे, विठ्ठल भोसले, सदाशिव यादव, शिवाजी लोहार, शांताराम दंडवते, सुधाकर इनामदार, डी.जी.कुलकर्णी, लक्ष्मण घाडगे, वंदन चंदनशिवे, शिवाजी जमदाडे, गुलाब वीरकर, सतीश दडस असे अनेकजण एकत्र आले. वातावरण फार तणावाचे होते. बहुमताविरुद्ध उभे राहणे धोक्याचे होते. या वेळेस या मंडळींच्या मागे ठामपणे उभे राहणारे एकमेव राजकीय नेतृत्व होते ते म्हणजे शरद पवार.

पवारसाहेबांची मध्यस्थी
पवारसाहेब आणि शिवाजीरावांचा प्रत्यक्ष संबंध या काळात आला. यापूर्वी बारामतीत कॉलेजला असताना निवडणुकीच्या काळात मतदारांच्या भेटी घेताना पाहिले होते, त्यांची भाषणे ऐकली होती. या माणसाच्या वेगळेपणाची, दूरदृष्टीची जाणीव त्यावेळेसही मनात ठसली होती. पण त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय संपाच्या काळात आला. वालचंदनगर इंडस्ट्री हा शरद पवारांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. कंपनी बंद पडली तर हजारो कामगार रस्त्यावर येणार होते. तसेच हे लोण आसपासच्या कारखान्यांतही पसरण्याचा धोका होताच. ही कंपनी पुन्हा सुरू व्हावी, संप मिटावा यासाठी त्यांनी अथक प्रयत्न सुरू केले. त्यावेळेस ते विरोधी पक्षनेते होते. हातात सत्ता नव्हती; पण त्यापेक्षा मोठा जनतेचा विश्वास होता. सर्व गटांनी त्यांची मध्यस्थी मान्य केली. कंपनी मालक, दत्ता सामंत यांची युनियन आणि कंपनी सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करणारा शिवाजीराव व त्यांच्या सहकार्‍यांचा गट हे सारे त्यामध्ये होते.  शिवाजीरावांना अजून स्पष्टपणे तो दिवस आठवतो. साहेबांच्या बी-४ या बंगल्यावर बैठकांचे सत्र सुरू होते. कंपनी मालक श्रीमान शेठ चकोर दोशी यांच्याबरोबर पवारसाहेबांची बैठक झाली. त्यानंतर दत्ता सामंत यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर सुहास जोशी, पांडुरंग बोराटे, राजाभाऊ दुसगकर, सदाशिव दंगाणे व शिवाजीराव भेटायला गेले. गेल्या गेल्याच साहेबांनी सांगितले, ङ्गङ्घमी तुमच्या बाजूने आहे. मला कंपनी पुन्हा सुरू करायची आहे. तुम्ही अतिशय चांगले काम करत आहात.फफ हे ऐकल्यावर समन्वयाचा विचार मांडणार्‍या या कामगारांच्या अंगात बारा हत्तींचे बळ आले. या बैठकीनंतर शिवाजीराव पवारसाहेबांचेच झाले. साहेब मांडतील तो विचार, देतील ती जबाबदारी पुढच्या आयुष्यभरात डोळे झाकून स्वीकारली.
बैठकीनंतर दत्ता सामंत सर्व कामगारांपुढे आले, त्यांनी सांगितले, ङ्गङ्घपवारसाहेबांबरोबर माझे बोलणे झाले आहे. पवारसाहेब जे ठरवतील त्याला माझी मान्यता असेल.फफ दत्ता सामंत यांच्यासारख्या अत्यंत आक्रमक कामगार नेत्यानेही साहेबांचे म्हणणे मानले, यातच सारे आले. पुढे दोन्ही युनियनचे लोक घेऊन समन्वय समिती स्थापन झाली. याला समन्वय समिती हे नावही साहेबांनीच दिले. वालचंदनगरच्या भूमीतून हा समन्वयाचा विचार पेरला गेला, जो आज देशभरातील औद्योगिक क्षेत्रात पसरला आहे. पुढे कंपनी सुरू झाली. हळूहळू कामगार कामावर येऊ लागले. हे सर्व झाले तरी संपाच्या काळातला कडवटपणा अजून शिल्लक होता. समन्वयाचा विचार मांडणारे अजूनही अल्पमतातच होते. त्यांना कामगारांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. यातून शिवाजीराव बाहेर पडले १९९२ साली, तेही पवारसाहेबांच्याच मदतीने. या निवडणुकीत साहेबांनी शिवाजीरावांना पंचायत समितीच्या निवडणुकीला उभे केले. विरोधी युनियनही शिवाजीरावांचा पराभव करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली; पण सर्वसामान्य कामगार शिवाजीरावांच्या विचाराचा असल्याचे दिसून आले. ही निवडणूक शिवाजीराव जिंकले. एक कामगार लोकप्रतिनिधी झाला. यानंतर मात्र शिवाजीरावांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. तीसहून जास्त वर्षे युनियनचे जनरल सेक्रेटरी म्हणून ते काम पाहत आहेत. समन्वयाचा विचार घेऊन कामगार आणि कंपनी या दोघांसोबतही ते उभे आहेत. जनरल सेक्रेटरीपदाची पंचवीस वर्षे पूर्ण केल्याबद्दल १४ जानेवारी २०११ रोजी शिवाजीरावांचा भव्य नागरी सत्कार झाला. त्यावेळी पवारसाहेब आवर्जून उपस्थित होते. प्रत्येक वेळेस पवारसाहेबांनी त्यांना बळ दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत त्यांना कामाची जबाबदारी दिली. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सदस्यपदावर चार वेळा काम करण्याची संधी दिली. आजही ते साहेबांच्या विचाराचा झेंडा घेऊन उभे आहेत. अनेकदा साहेबांच्या भेटीचा योग आला, कधी बारामतीत, कधी मुंबईत तर कधी दिल्लीत. प्रत्येक वेळी लक्षात राहिला तो साहेबांचा जिव्हाळा, सर्वसामान्य कामगारांबद्दलची कळकळ. ङ्गउद्योग टिकला तर कामगार कामगार जगेल व कामगार जगला तरच उद्योग टिकेलफ ही ठाम भूमिका. साहेब भेटले की विचारतात. आसपासच्या कंपन्यांमधील परिस्थितीची माहिती घेतात. कामगारांसंबंधातील काही विषय पुढे आले तर चर्चा करतात.  
शिवाजीरावांना आज असंख्य लोक ओळखतात. कामगारांच्या जगात नेता म्हणून, राजकीय क्षेत्रात राजकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून, प्रशासनामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा राबता आहे; पण आजही त्यांना जी ओळख सर्वांत महत्त्वाची वाटते ती म्हणजे पवारसाहेबांच्या विश्वासातला माणूस ही होय.
जोपर्यंत कंपनीच्या चिमणीतून धूर येतो आहे, तोपर्यंत कामगार म्हणून आपले अस्तित्व राहणार आहे. त्यामुळे कंपनी सुरू ठेवून कामगारांच्या प्रश्नावर लढा देण्याचा समन्वयाचा विचार हाच पवारसाहेब आणि शिवाजीराव यांच्यातील या गाढ विश्वासाचा अतूट धागा आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.