सखे आणि सोबती -बी.जी.

बी.जी. उर्फ बाळासाहेब काकडे

सखे आणि सोबती या शरद पवारसाहेबांच्या मित्र व कार्यकर्त्यांवरील पुस्तकातील हे आणखी एक व्यक्तिचित्र – शरद पवारांचे पारंपारिक विरोधक असलेल्या काकडे घराण्याशी संबंधित बी.जी.उर्फ बाळासाहेब काकडे यांनी पवारसाहेबांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून त्यांचे अनुयायित्व पत्करले. बीजींच्या एकनिष्ठेचे दर्शन यातून घडेलच तसेच शरद पवारांनी घेतलेल्या अनेक मुलगामी निर्णयांचे तसेच राजकारणातील चढउतारांचेही दर्शनही या लेखातून घडेल.

पवारसाहेबांची बारामती तालुक्यातील राजकीय कारकिर्द सुरु झाली ती 62 सालापासून. त्यावेळेस बारामती तालुक्यातील राजकीय परिस्थिती मोठ्या गोंधळाची होती. तालुक्याच्या आमदार मालतीताई शिरोळे या तालुक्याबाहेरच्या. खासदारही बाहेरचे. तालुक्यात अनेक गटतट. परंतू राजकारण तसेच सहकारावर निंबूत गावच्या काकडे घराण्याचे वर्चस्व. ते ठरवतील तो आमदार, कारखान्याचा पदाधिकारी, सहकारी सोसायटीचा चेअरमन किंवा सचिव होत असे. या सगळ्या स्थितीत सर्वसामान्य माणसांचा फारसा विचार होत नव्हता. पाव्हण्या रावळ्याचे, सोयऱ्याधायऱ्यांचे राजकारण चालत होते. हुकुमशाही, मनमानी होत होती. या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य जऩतेलाही आवडत नव्हत्या. पण पुढे येऊन विरोध करणार कोण? लोकांच्या या भावनांना वाचा फोडली शरद पवारांच्या नेतृत्वाखालील काही मुठभर कार्यकर्त्यांनी. बी.जी. उर्फ बाळासाहेब काकडे हे त्यापैकीच एक. आपल्या भावकीच्या, नात्यागोत्यातील माणसांच्या विरोधात जाऊन त्यांनी शरद पवारांचे नेतृत्व स्विकारले. त्यासाठी मानसिक त्रास भोगला, आर्थिक नुकसान सहन केले. सामाजिक अपमान पचवले. पण शरद पवारांची साथ कधी सोडली नाही.

निंबूत गावातच राहणाऱ्या बीजींनी आपल्या स्वतंत्र विचारांशी तडजोड न करता सततच्या राजकीय संघर्षाचा रस्ता स्विकारला. यामध्ये पहिला मोठा संघर्ष म्हणजे 66 सालची करंजे- वडगावनिंबाळकर जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक. 67 सालच्या विधानसभा निवडणूकीची ही लिटमस टेस्ट होती.

या निवडणूकीत पहिल्यांदाच पवार गट व काकडे गट एकमेकांच्या समोर उभे ठाकले. मात्र ही लढाई होती काकडे गटाचे पुर्ण वर्चस्व असलेल्या भागामध्ये. या भागात काकडे गटाविरुद्ध प्रचार करणेही अवघड होते. सर्वसामाऩ्य माणूस तर काकडे गटाच्या विरोधात बोलायलाही घाबरत असे. या स्थितीत ज्या मुठभर कार्यकर्त्यांनी उघडपणे प्रचार केला त्यामध्ये एक नाव बीजी काकडेंचे होते. प्रचारासाठी माणसे मिळत नव्हती. पैसा नव्हता. पोलिंग एजंट म्हणूनही कोणी यायला तयार नव्हते इतके दहशतीचे वातावरण होते. रात्री चिकटलेली पोस्टर सकाळपर्यंत राहत नसत. रंगविलेल्या भिंतींवर शेणाचे गोळे पडत. मात्र या साऱ्यात सर्वसामान्य माणूस मनाने पवार गटाबरोबर होता. याचे प्रत्यंतर निकालातून दिसले. पवार गटाचे भगवानराव काकडे या निवडणूकीत विजयी झाले. या निवडणूकीने बारामतीच्या बदलत्या राजकारणाची पहिली चुणूक दाखवली.

यानंतर 67 च्या विधानसभा निवडणूकीत पवारसाहेब आमदार म्हणून निवडून आले. जिल्हा परिषद, पंचायत समिती पवार गटाच्या हातात आली. प्रत्येक निवडणूकीत बीजी शरद पवारांच्या नेतृत्वात काम करत होते. याचा परिणाम भोगत होते. बीजींचा व्यवसाय शेतीचा. ऊस हे मुख्य पीक. हा ऊस ज्या कारखान्याला द्यायचा तो कारखाना काकडे गटाच्या ताब्यात होता. त्यामुळे वेळेवर ऊस नेला जात नव्हता. 66 साली साखरेपेक्षा गुळाला जास्त भाव होता. त्यामुळे बहुतेक जणांनी कारखान्याला ऊस देण्याऐवजी गुळासाठी देण्याचा निर्णय घेतला. कारखान्याला सभासदांचा केवळ 20000 टन ऊस मिळाला. पुढच्या वर्षी कारखान्याने सर्व सभासदांकडून बॉन्ड लिहून घेण्याचा निर्णय घेतला. बीजी काकडेंसह 500 सभासदांनी असे बॉन्ड लिहून देण्यास नकार दिला. त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. त्यामुळे या लोकांनी गुऱ्हाळे सुरु करून गुळ तयार करण्यास सुरुवात केली. एका बाजूने या निर्णयाविरुद्ध कोर्टात दाद मागितली. हा संघर्ष सुरुच राहिला. सोमेश्वर साखर कारखाना सोडला तर इतर सर्व निवडणूकात पवार गटाला बहूमत मिळत होते. साखर कारखान्यात मात्र पराभवाला सामोरे जावे लागत होते. मात्र 92 सालच्या निवडणूकीपुर्वी कोर्टाचा निकाल आला, या सर्व सभासदांना मतदानाचा हक्क मिळाला, 500 ते 600 सभासद अयोग्य पद्धतीने करण्यात आलेले होते. त्यांचे सभासदत्व न्यायालयात जाऊन रद्द करण्यात आले. पवारसाहेबांच्या विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन 92 सालची कारखान्याची निवडणूक लढविली, त्यातून कारखान्यात पवारसाहेबांच्या विचाराचे संचालकमंडळ आले. याच काळात सहकार क्षेत्रासाठी संपत कमिटीच्या शिफारशी लागू झाल्या. 1250 टनी साखर कारखान्यांचे विस्तारीकरण करून ते 2500 टनी करण्यास सरकारने प्रोत्साहन दिले, अशा कारखान्यांना सर्व साखर खुल्या बाजारात विकण्यात परवानगी देण्यात आली. मात्र सोमेश्वर कारखाना 1050 टनाचा होता, त्यामुळे या योजनेत बसत नव्हता. पवारसाहेबांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिल्यानंतर त्यांनी चीफ सेक्रेटरींशी चर्चा केली, नियमात बदल केले व सोमेश्वर महाराष्ट्रातील 2 कारखान्यांना या शिफारशींचा लाभ मिळाला.

सहकार क्षेत्रात नव्या विचारांना स्थान मिळत नव्हते. सहजासहजी बदल घडत नव्हते. याचे मूळ सहकारी संस्थांनी त्यांच्यासाठी बनविलेल्या निमयावलीत होते. प्रत्येक संस्थेची नियमावली वेगवेगळी असे. संस्थास्थापनेवेळी संस्थापक आपल्याला सोयीची नियमावली बनवत असे. त्यामुळे सहकारी संस्था विशिष्ठ व्यक्तींकडे किंवा घरांमध्येच वर्षानूवर्षे रहात असत. हे लक्षात आल्यावर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व सहकारी संस्थांसाठी आदर्श नियमावली बनविली आणि ही नियमावली स्विकारणे त्यांच्यावर बंधनकारक केले. त्यामुळे सहकारक्षेत्रात शिस्त निर्माण झाली. त्यानंतर सहकारक्षेत्राने अनेक बदल पाहिले, स्विकारले आणि पचविले.

77 सालची विधानसभा निवडणूक मोठ्या संघर्षाची ठरली. कॉंग्रेसकडून शरद पवार तर समाजवादी पक्षाकडून विजयराव मोरे वकील उभे होते. काकडे व पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमेश्वर कारखाना परिसरात हाणामारी झाली. दुसऱ्या दिवशी बीजींच्या निंबूतमधील घरावर दगडफेक झाली. स्वत: बीजींना धक्काबुक्की झाली. घरासमोर उभ्या केलेल्या जीपची मोडतोड झाली. शरद पवार त्यावेळी गृहराज्यमंत्री होते. त्यांना बातमी कळताच ते तातडीने बीजींच्या घरी आले. पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था केली. अशा तंग वातावरणातही निंबूतमधून शरद पवारांना 50 टक्के मते मिळाली.

निंबूतजवळील नीरेतील पॉलिकेम कंपनीमध्ये संप झाला. सगळ्या कामगारांना बाहेर काढण्यात आले.

कामगार युनियनने दत्ता सामंतांशी जवळीक साधली. मालक व कामगार यांच्या ताठर भुमिकांमुळे कंपनी बंद पडण्याची वेळ आली. बीजी कामगार प्रतिनिधी थोरात व रिखवलाल शहा यांना घेऊन मुंबईला पवार साहेबांकडे गेले. पवार साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. साहेब म्हणाले कारखाना सुरु रहावा असे मलाही वाटते, पण मी हस्तक्षेप करणे योग्य ठरेल का . त्यावेळी कामगारांच्या नोकरीचा प्रश्न आहे, आपल्या मतदारसंघातील हे लोक आहे, त्यामुळे मध्यस्थी करण्याची त्यांना विनंती केली. त्यावेळी मुंबईचे मोठे पुढारी स.का.पाटील यांच्यामार्फत कंपनी मालक तनील किलाचंद यांच्याशी संपर्क साधला. दत्ता सामंतांनीही पवारसाहेबांच्या मध्यस्थीला मान्यता दिली. कंपनी मालक, शहा, थोरात यांच्यासह साहेबांनी पहिली बैठक घेतली. त्यानंतर पुण्याला प्रमुख बैठक झाली. तडजोडीने संप मिटला. बैठकीनंतर सर्वजण बीजींच्या पुण्यातील बंगल्यावर जेवायला आले.

बीजी तसे पुर्ण वेळ राजकारणी नाहीत. आपला उद्योग धंदा व्यवस्थित सांभाळणे. त्यानंतरचा वेळ सामाजिक व राजकीय कामासाठी देणे हा त्यांचा स्वभाव आहे. निंबूतमध्ये सोमेश्वर कारखान्याच्या सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे हायस्कुल सुरु करायचे ठरले, त्यावेळी बीजीनी आपले निंबूतमधील घर या हायस्कुलसाठी दिले. राजकारणातही त्यांनी कधीही पदासाठी हट्ट धरला नाही. पण जी पदे मिळाली तिथे त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. 78 साली ते पंचायत समितीवर निवडून आले. साडेबारा वर्ष त्यांना या पदावर काम करता आले. 5 वर्षासाठी सोमेश्वर कारखान्यावर संचालक म्हणून काम केले. पणदरे येथील सुतगिरणीवर व्हाईस चेअरमन म्हणून काम केले. तिथेही ही गिरणी सुरु रहावी यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यांनी साहेबांच्या राजकीय कारकिर्दीतील चांगला व वाईट काळ जवळून पाहिला आहे. अर्स कॉंग्रेस सोडून यशवंतराव चव्हाण पुन्हा कॉंग्रेसमध्ये गेले. त्यावेळेस शरद पवारांसोबत फक्त 9 आमदार राहिले होते. त्या काळात बीजी एकदा शरद पवारांना मुंबईत त्यांच्या फ्लॅटवर भेटायला गेले होते. तिथे दिवसभर थांबले, गप्पा झाल्या, जेवणही झाले. ज्या माणसाला दररोज शेकडोनी माणसे भेटायला येत, त्या शरद पवारांकडे त्या दिवशी एकही माणूस आला नव्हता. हा शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील अत्यंत कठीण काळ होता. परंतू बीजींचा आपल्या नेत्यावर पूर्ण विश्वास होता. पुढे निवडणूक लागली, शरद पवारांनी पुर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे केले. त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना हेलिकॉप्टरही मिळू दिले नाही. त्यावेळी सगळा महाराष्ट्र ते मोटारगाडीने फिरले. पहाटे 4 पासून सभा घेतल्या. दिवसातून कशीतरी तासाभराची झोप मिळत होती. असे अविश्रांत कष्ट करून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनमानसावर शरद पवारांनी आपले राज्य प्रस्थापित केले.

बीजींनी आपल्या राजकीय आयुष्यात शरद पवारांशिवाय कोणालाही मानले नाही. जिथे शरद पवार तेथे बीजी. शरद पवारांनीही आपल्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कधीही निर्णय घेतले नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा सहकारी संस्थांच्या निवडणूका असोत. सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बसवत. बारामतीतील राममंदिरात रात्र रात्र बैठक चालत. प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा होत असे व मग निर्णय होत असे. राजीव गांधीच्या काळात पवारसाहेबांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळीही उजनी डॅमजवळील गेस्टहाऊसमध्ये तालुक्यातील निवडक कार्यकर्त्यांबरोबर बैठक झाली. साहेबांनी सर्वांची मते ऐकून घेतली. त्यानंतरच निर्णय घेतला.

बीजींना वाटते पवारसाहेब माझ्या आयुष्यात आले हे माझे सगळ्यात मोठे भाग्य आहे. पवारसाहेबही नक्की म्हणत असतील असे कार्यकर्ते मला मिळाले हे माझे भाग्य आहे.

———————————————-

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.