सखे आणि सोबती – कामा

शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात त्यांच्यासोबत असलेल्या मित्र आणि सहकाऱ्यांचे चित्रण करणारे “सखे आणि सोबती ” या पुस्तकातील का.मा. आगवणे यांचे हे व्यक्तिचित्र.

शरद पवार यांच्याबद्दल चांगले तसेच वाईट मत असणारे हजारो लोेक आहेत. परंतू एखादा नेता इतकी वर्षे समाजाच्या बहुसंख्य लोकांवर आपली पकड का टिकवू शकतो याचा अभ्यास करण्यासाठी हा आणि या मालिकेतील इतर लेख उपयुक्त ठरू शकतील.

का. मा. आगवणे

आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना करणारे अनेकजण आपल्याला भेटतात. पण संकटांना आमंत्रण देऊन त्याची चव मजेमजेने चाखणारे लोक मात्र फार थोडेच सापडतात. काळुराम मारुतराव आगवणे उर्फ कामा हे अशांपैकीच एक होते. दुसऱ्या महायुद्धावेळी नागालॆँन्डमध्ये लष्करी चाकरी करत होते, त्यावेळी सैन्यात बंडखोरी करून आझाद हिंद सेनेला जाऊन मिळण्याचे डावपेच ते आखत होते. त्यानंतर पोलिस खात्यात काम करताना नियम डावलून राष्ट्र सेवा दलाची शाखा चालवत होते. नगरपालिकेत काम करताना रजा मिळाली नसताना साने गुरुजींच्या पंढरपूर येथील उपोषणासाठी जाऊन त्यांनी कारवाई ओढवून घेतली. सात वर्षे पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून उत्तम काम केल्यानंतरही सक्रीय राजकारणातून निवृत्त होऊन सामाजिक कामांना वेळ देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्याच्या भवितव्याची चिंता करत आजचे नोकरीचे जू निमुटपणे ओढणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने तर हा निव्वळ वेडेपणाच ठरावा. पण असं भाग्याचे वेडेपण कामांना लाभलं होतं.

त्यांच्या वैयक्तिक आयूष्यातही अनेक चढउतार त्यांनी पाहिले. त्यांचे गाव बारामतीजवळील मळद. वयाच्या पाचव्या वर्षी झालेले लग्न, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्लेगच्या साथीने गाव सोडण्याची आलेली वेळ, याच प्लेगच्या साथीत वडिलांचे झालेले निधन, ओढग्रस्तीच्या स्थितीत शिक्षण घेताना अस्पृशतेचे बसलेले चटके हे सारं सोसले. जसं दारिद्र्य पाहिलं तशी समृद्धीही अनुभवली. मुलांमुलींनी आणि नातवंडानी गाठलेले प्रगतीचे टप्पेही पाहिले आणि एका मुलाचा अकाली झालेला मृत्यूही पाहिला. या साऱ्यामध्ये दोन गोष्टी त्यांच्या कायम जवळ राहिल्या. पहिली म्हणजे समाजहितासाठी सतत काही ना काही करत राहण्याची वृत्ती आणि प्रत्येक परिस्थितीत अखंड समाधानी वृत्ती. हीच तृप्तीची भावना चेहऱ्यावर वागवत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कामा मुळचे समाजवादी विचाराचे सक्रीय कार्यकर्ते. सानेगुरुजींचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात मुंबईत निघालेल्या मोर्चावर गोळीबार, अश्रूधूराचा मारा करण्यात आला होता. त्या मोर्चातही ते सहभागी होते. याच विचाराने त्यांनी पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचा प्रचारक म्हणूनही काम केले. अस्पृशता नष्ट व्हावी, समाजातील भेदाभेद संपावेत यासाठी ते प्रयत्न करत होते. गांधीजींच्या हत्येनंतर सानेगुरुजींनी गांधीजींच्या आठवणी सांगणारी पुस्तिका लिहली होती. ही पुस्तिका प्राथमिक शाळांतील मुलांपर्यंत पोहचविण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. नेरळ माथेरानच्या पायथ्याशी समाजवादी मंडळींनी आदिवासींच्या मुलांसाठी वसतीगृह चालवले होते. या वसतीगृहाची जबाबदारी कामांवर सोपविण्यात आली. सहकुटुंब तेथे राहून साडेसहा वर्ष त्यांनी ही जबाबदारी पार पडली.

वसतीगृहाच्या कामातून मुक्त होऊन ते बारामतीला आले. त्यावेळी त्यांनी पुर्ण विचारांती कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. बारामतीत राहून कॉंग्रस पक्षाचे काम करण्याबाबत त्यांच्या मनात काही योजना होत्या. काही मित्रांच्या सूचनेनूसार याबाबत चर्चा करण्यासाठी ते शरद पवार या तरुण कार्यकर्त्याला भेटले. कामांचे सर्व बोलणे लक्षपूर्वक शांतपणे शरद पवारांनी ऐकले. त्यानंतर त्यांनी कामांना सुचविले, सध्या दुष्काळाची स्थिती आहे. पाणी उपलब्ध करणे, त्याचा साठा करणे व वाटपाचे नियोजन करण्याच्या कायमस्वरुपी व्यवस्था उभ्या करण्याची सध्या गरज आहे. त्यासाठी सहकारी पाणी पुरवठा संस्था उभारणीचे काम तालुक्यात करायचे आहे. यासाठी तुम्ही पुर्णवेळ काम करू शकता. कामांनी यासाठी लगेचच होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी शरद पवार जीप घेऊन कामांच्या घरी आले. त्यांना जीपमध्ये घेऊन दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर निघाले. यानंतर शरद पवार आणि कामा पुढील 15 ते 20 वर्षे सतत एकत्र काम करत होते. युवक कॉग्रेस, आमदार, मंत्री हा शरद पवारांचा प्रवास कामांनी अगदी जवळून पाहिला. कमीत कमी बोलणे आणि दुसऱ्याचे जास्तीत जास्त ऐकून घेणे हा त्यांचा गुणविशेष कामांना पहिल्या भेटीतच जाणवला होता. त्यांच्यांतील नेतृत्वगुणांचा पुढे सतत परिचय होत गेला. समाजवादी विचारांचे कामां अगदी सहजपणे पवारवादी झाले.

कामा आपल्या नाववंडासह शरद पवारांसोबत

शरद पवारांसोबत त्यांनी दुष्काळ निवारणासाठी काम केले. 21 सहकारी पाणीपुरवठा संस्थांची निर्मिती करून त्या लोकांकडे सोपविण्यात आल्या. जेजुरीजवळ मल्हारसागर धरण निर्माण करण्याचा प्रस्ताव अनेक वर्ष धूळ खात पडला होता. त्याला चालना देण्याचे काम केले. यानंतर विधानसभा निवडणूक आली. त्यावेळी बारामतीतून शरद पवारांना तिकीट मिळावे यासाठी तरुण कार्यकर्त्यांनी जिल्हा कमिटीकडे शिफारस केली होती. परंतू पुणे जिल्हा कमिटीने शरद पवारांऐवजी बुवासाहेब गाडे यांचे शिफारस राज्य कमिटीकडे केली. हे कामांना समजल्यावर त्यांनी शरद पवारांशी संपर्क साधला. त्यांच्या सल्ल्यानूसार ते आणि बाळासाहेब गीते यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना ही सारी हकिगत सांगितली. त्यानंतर बारामती तालुक्यातील त्यावेळी मुंबईत असलेले प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन प्रदेश कमिटीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांची भेट घेतली. त्यांना शरद पवार यांना तिकीट देण्याबाबतची मागणी केली. त्यानंतर एका तासाने म्हणजे 10 वाजता यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी निवड कमिटीची बैठक होती. या बैठकीत नावे निश्चित होणार होती. शरद पवार त्यांच्या कार्यकर्त्यांसह यशवंतरावांच्या बंगल्याबाहेर पोचले. तेथे रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर सर्व कार्यकर्त्यांसह ते बसले होते. त्यानंतर काय झाले हे कामांच्याच शब्दात,

“मी अस्वस्थ होतो. कोणालाही माहिती होऊ न देता जिना चढून वरती गेलो, तेथील रक्षकाने मला थांबविले. तेवढ्यात बैठकीच्या खोलीमधून श्री. मोहन धारिया बाहेर आले आणि त्यांची नजर माझ्याकडे गेली, ते माझ्याकडे आले. मी त्याचठिकाणी एका बाजूला उभा राहिलो. शरद पवार आणि सहकारी मंडळी खाली आहेत. तुम्ही तसे रक्षकाला सांगावे, अशी विनंती मी धारियांना केली. बैठकीतील कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी एका बाजूला उभे रहा किंवा शेजारच्या खोलीत बसा. तसे रक्षकाला सांगण्यात आले. दरवाजाच्या कडेलाच मी उभा राहिलो. मला आतील कोणाचे काय म्हणणे आहे हे ऐकायचे होते. पुणे जिल्ह्याची फाईल समोर येईपर्यंत मात्र शेजारच्या खोलीत बसून होतो. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याशिवाय इतर तालुक्याची माहिती घेण्यात मला स्वारस्य नव्हते. रात्री 2 च्या सुमारास बारामतीसंबंधी बोलणे सुरू होताच कान टवकारून दरवाज्याच्या कडेला उभे राहून ऐकू लागलो. शरद हा तरुण, सुशिक्षित, कर्तबगार, सदगुणी आहे. पक्षाला त्यांचा चांगला उपयोग होत आहे. शरदला पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद द्यावे. तिथे पाच वर्षे चांगले काम करून अनुभव घेतल्यानंतर पुढील वेळेला त्याचा विधानसभेसाठी जरूर विचार केला जावा असा विचार श्री. बाळासाहेब देसाई यांनी व्यक्त केला. याला श्री. आबासाहेब खेडेकर यांनीही दुजोरा दिला. पण या विचाराला मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक व प्रदेश अध्यक्ष श्री. विनायकराव पाटील यांनी विरोध केला. आणि त्याचवेळी शरदची निवड करणे कसे जरुरीचे व उपयुक्त आहे हे समजावून देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अंतीम निर्णय चव्हाणसाहेबांनी घ्यावा आणि तो सर्वांनी मान्य करावा असे सूचवले. सर्वांनीच ही सूचना मात्र केली. काही वेळ शांत वातावरण व साहेब काय मत व्यक्त करतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले. साहेबांनी शांतपणे अधिक काही न बोलता एकच वाक्य उच्चारले. शरदची उमेदवारी निश्चित करावी असे मला वाटते. आणि लगेच सर्वांनीच ते मान्य केले. लगेच श्री. मोहन धारिया दरवाज्याच्या बाहेर आले आणि शरदची उमेदवारी निश्चित झाल्याचे शरदला माझा निरोप सांगा असे त्यांनी सांगितल्याबरोबर मी त्यांचे हार्दिक आभार मानले. आमचे संबंध चांगले होते. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. शिवाजीराव पाटील, श्री. मोहनराव धारिया हे काम करीत होते. त्यावेळी दोघांशीही शरदरावांमुळे संबंध आले. तेव्हापासून श्री. धारियांशी माझे स्नेहसंबंध कायम राहिले.

ही माहिती घेऊन जिना झपझप उतरून सरळ शरदरावांकडे गेलो. आणि त्यांना गाडीत बसा. टिळक भवनात येण्यास कार्यकर्त्यांना सांगा ऐवढेच म्हणले आणि आम्ही निघताना गराडा घातलेल्यांना टिळक भवनला या, तेथे बोलू असे सांगून आम्ही निघालो. “

कामांनी आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकावर मनापासून प्रेम केले. पण त्यांच्या ह्रद्याचा एक खास कप्पा मात्र त्यांच्या शरदरावांसाठीच होता. पुढेही शरदरावांना मंत्रीमंडळात घेण्याबाबत विचार चालू होता. बारामती तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक होऊन त्यामध्ये जर कॅबिनेट मंत्रीपद मिळत असेल तरच घ्यावे, राज्यमंत्रीपद घेऊ नये असा ठराव झाला. कामांही या बैठकीत होते. परंतू घरी गेल्यावर मात्र त्यांना हा ठराव चूकीचा वाटू लागला. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्वभाव लक्षात घेता राज्यमंत्रीपद नाकारणे धोक्याचे वाटू लागले. या विचाराने त्यांना रात्रभर झोप आली नाही. अंगात बारीक ताप होता. तरी तसेच गाडी पकडून मुंबईला गेले. शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हे सांगितले आणि कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात ठराव केला आहे. त्यामुळे राज्यमंत्रीपद मिळाले तरी स्विकारावे अशी विनंती. पुढे शरद पवारांना राज्यमंत्रीपद मिळाले. ते त्यांनी स्विकारले आणि त्यानंतरच त्यांच्या राजकीय आलेख सतत उंचावतच राहिला.

आमदार झाल्यावर काही महिन्यांनी शरदरावांचे लग्न झाले. नविन लग्न झालेले हे जोडपे मधुचंद्राला कोठे जाण्याऐवजी कटफळ, निंबोडी, पारवडी, शिर्सुफळच्या ओसाड माळरानात नेहमीच्या कार्यकर्त्यांच्या तांड्यात फिरत होते. वहिनींचा चेहरा उन्हाने काळवंडला असेल, पण प्रसन्न मन प्रसन्न चेहरा पाहून व ओसंडून वाहणारा उत्साह पाहून शरदरावांना सार्वजनिक जीवनात उत्तम साथ मिळणार याची खात्री सर्व कार्यकर्त्यांसह कामांनाही त्यावेळी झाली व ती आजपर्यंत खरी ठरली आहे.

शरदरावांच्या सूचनेनूसार ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, तसेच उपाध्यक्षही झाले. सात वर्षे त्यांनी पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग विकास योजना राबविण्यासाठी पिंजून काढला. परंतू त्यानंतर मात्र त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती स्विकारली.

महाराष्ट्र आरोग्य केंद्रासाठी काम

जिप उपाध्यक्ष असतानाच ते महाराष्ट्र आरोग्य मंडळाशी निगडित होते. राजकारणातून निवृत्त झाल्यावर संस्थेचे काम त्यांनी पूर्णवेळ केले. आरोग्यसेवेचे काम, निराधार मुलांच्या शिक्षणाचे काम या काळात त्यांनी केले. 89 साली या संस्थेच्या कामातूनही ते निवृत्त झाले. पंरतू स्वस्थ राहणे त्यांना शक्यच नव्हते. जेष्ठ नागरिक संघाच्या कामात सहभाग, दोन पुस्तकांचे लेखन यात ते गर्क होते. मधुमेह व ह्रद्यविकारांसारखे आजार सोबत घेऊनही सतत प्रसन्न चेहऱ्याने सर्वांना सामोरे जात होते.

कामांच्या आयूष्याचा एक टप्पा आध्यात्मिक बैचैनीचा होता. पंधरा महिन्याचा हा काळ त्यांनी केवळ फलाहार घेतला. या काळातील सर्व प्रवास त्यांनी कोणत्याही वाहनात न बसता केला. मनात सततचे ईशचिंतन सुरू असे. यानंतर त्यांना तिर्थक्षेत्री जाण्याची इच्छा झाली. अनेकदा आळंदी, पंढरपूर पायी यात्रा झाल्या. वृंदावन, मथुरा, गोवर्धन, काशी, नाशिक, त्र्यंबकेश्वर अशा अनेक ठिकाणी भटकंती सुरू होती. चांदवडजवळील एका शिवमंदीरात एक साधू भेटले. संसारात परत जा, संसारात राहूनही परमार्थ करता येतो असा उपदेश त्यांनी केला. त्यानूसार ते परत आले. आपली सांसारिक कर्तव्ये त्यांनी योग्य रितीने पार पाडली. परंतू एक आध्यात्किक विरक्ती मात्र सतत त्यांच्याबरोबर राहिली. त्यामुळेच रंगूनी रंगात साऱ्या, त्यांचा रंग मात्र वेगळाच राहिला.

—————————————————————————

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.