काश्मीरचा सम्राट ललितादित्य!

संजय सोनवणी


भाष्य। काश्मीरच्या इतिहासाबद्दलच पराकोटीची अनास्था असल्याने महान सम्राटाकडे दुर्लक्ष

पश्चिमोत्तर भारतातून अरबांना पिटाळुन लावत अफगाणिस्तान, तुर्कस्तान, लडाख ते दक्षिणेकडे नर्मदा नदीपर्यंतचा विशाल प्रदेश जिंकून चंद्रगुप्त मौर्यानंतर आठव्या शतकात एवढे विशाल साम्राज्य निर्माण करणारा सम्राट म्हणजे ललितादित्य मुक्तापीड. हा काश्मीरचा नरेश होता. काश्मीर राज्याला बाल्टिस्तान, गिलगिट तर त्याने जोडलेच; पण तत्कालीन महासत्ता तिबेटला हरवत प्रथमच लडाख भारताला जोडला. किंबहुना भारतीय उपखंडाचे आजही प्रभाव टाकून असणारे राजकीय नकाशे त्याने बदलले. युद्धे, त्यांतील विजय एवढ्यापुरते त्याचे कर्तृत्व मर्यादित नव्हते तर मार्तंड मंदिर ते परिहासपूरसारखी भव्य नगरे उभारून अतुलनीय अशी निर्माणकार्ये केली. चीनसारख्या देशाला त्याने आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाच्या जोरावर अनेकदा शह दिले. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळातही हा विजीगिषू सम्राट शांत बसला नाही तर थेट चीनवर स्वारी करत तारीम खोऱ्याला पादाक्रांत केले. त्याची अखेरही तिकडेच झाली. आणि एवढे असूनही हा सम्राट जगाला सोडा, आम्हा भारतीयांनाही अज्ञात होता ही आपल्यासाठी स्पृहणीय गोष्ट नक्कीच नव्हती.मुळात काश्मीरच्या इतिहासाबद्दलच पराकोटीची अनास्था असल्याने भारताच्या एवढ्या महान सम्राटाकडे इतिहासकारांनी दुर्लक्ष केले असावे. आपल्या दृष्टीने काश्मीरचा इतिहास १९४७ नंतर सुरू होतो. काश्मीरलाही एक गौरवशाली इतिहास आहे आणि तो अपरिहार्यपणे भारताशी जोडला गेला हे वास्तव आहे. कल्हण आणि इतरांनी लिहिलेल्या राजतरंगिणी आणि तारिखांतून तो इतिहास जपला गेलेला आहे. खरे तर काश्मीरच भारतातील एक असे राज्य आहे, जेथे किमान ढोबळ स्वरूपात का होईना सलग पाच हजार वर्षांचा इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. हिमालयीन पहाडांनी घेरल्यामुळे काश्मिरी भाषा व तेथील संस्कृती अत्यंत वेगळ्या पद्धतीने विकसित झालेली आहे. सर्व धर्मांचे आणि ज्ञानाचे केंद्र म्हणून काश्मीरने सातवे ते तेरावे शतक अशी जवळपास सातशे वर्षे भारताचे नेतृत्व केलेले आहे. खरे तर काश्मीरचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास अभ्यासल्याखेरीज काश्मिरीयत’ या शब्दाचा अर्थही लक्षात येणार नाही.ललितादित्य हा काश्मीरच्या (आणि संपूर्ण देशाच्याही) इतिहासाचा मध्ययुगातील मुकुटमणी होय, असे म्हटले तर यत्किंचितही अतिशयोक्ती होणार नाही. पण दुर्दैव असे की, आजवर त्याचे साधार आणि परिपूर्ण म्हणता येईल असे चरित्रच कोणी लिहिलेले नव्हते. फुटकळ लेख किंवा काश्मीरवरील पुस्तकात एखादे प्रकरण आणि तेही दंतकथांनी भरलेले हे सोडले तर त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि भारतातील एकूण राजकीय संस्कृतीवर त्याने टाकलेला प्रभाव पूर्ण दुर्लक्षित राहिला होता. पण काश्मीर आणि सीमावर्ती राज्यांतील नागरिकांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहाशी जोडण्याचे कार्य करणारे सरहद संस्थेच्या संजय नहारांनी मला ललिदित्याकडे आकर्षित केले. तेथूनच एक इतिहासलेखनाचा रोमहर्षक काळ सुरू झाला. ललितादित्याचा इतिहास म्हणजे दक्षिण आशियाचा इतिहास. अरब, तुर्की, अफगाणी, तिबेटी, चिनी आणि भारतीय साधनांचा आधार घेतल्याखेरीज ललितादित्याचे प्रामाणिक चरित्र लिहिता येणे अशक्यच होते. ती साधने मिळवणे, अभ्यास करत त्यांचा इतर साधनांशी मेळ घालणे हेच एक आव्हान होते. ते करत ललितादित्याची कालरेखा निश्चित करत समकालीन घटनांची योग्य सांगड घालत हे पहिले चरित्र तीन वर्षांच्या अथक परिश्रमांतून “काश्मीरचा सम्राट ललितादित्य’ हे ऐतिहासिक चरित्र पूर्ण झाले. या मराठी पुस्तकाचे चिनार प्रकाशनाकडून प्रकाशनही झाले ते परिहासपूर या ललितादित्यानेच उभारलेल्या आता अवशेषग्रस्त असलेल्या राजधानीतील गोवर्धन मंदिराच्या पायऱ्यांवर.खुद्द काश्मिरी जनतेला आता ललितादित्य किंवा इतरही इतिहास फारसा माहीत नाही. पण या मराठी पुस्तकामुळे हा इतिहास समोर आला आहे, याचा त्यांना आनंद आहे. आणि आता तर प्रशांत तळणीकरांनी या चरित्राचा इंग्रजीत अनुवाद केला असून पुढील महिन्यात तो प्रसिद्ध होईल. काश्मीरच्या इतिहासातील हीही एक महत्त्वाची घटना आहे. जागतिक इतिहास अभ्यासकांची काश्मीरकडे आणि तेथील लोकांकडे पहायची दृष्टी यामुळे बदलायला मदत होईल, असे जे संजय नहार म्हणतात ते खरेच आहे.

कोणत्याही समाजाच्या वर्तमान समस्यांवर त्यांचे इतिहासाचे ज्ञान आणि आकलन कसे आहे याची अपरिहार्यपणे छाया पडलेली असते. काश्मीर याला अपवाद नाही. ललितादित्याने आजच्या काश्मीरच्या सांस्कृतिक वैभवात भर घातलेली आहे. गिलगिट, बाल्टिस्तान आणि लडाख काश्मीरला जोडून भारताच्या बाह्य सीमा विस्तारलेल्या आहेत. कनोजचा राजा यशोवर्मनला हरवून राज्याच्या सीमा नुसत्या वाढवल्या नाहीत तर मध्य देशातील विद्वान काश्मीरमध्ये नेत काश्मीरच्या ज्ञानसंस्कृतीला भरभक्कम बनवले आहे. चीनसारख्या देशाचा धोका ओळखत रेशीम मार्गांवर आपले नियंत्रण कसे कायम ठेवता येईल यासाठी मुत्सद्दीपणा दाखवलेला आहे. किंबहुना आजही त्याची विदेशनीती भारतासाठी मार्गदर्शक आहे. या महान सम्राटाचा काश्मीरचा सम्राट ललितादित्य या मराठी पुस्तकातून आणि याचा अनुवाद Emperor of Kashmir: Lalitaditya the Great मधून प्रथमच जगासमोर आता आलेला आहे. वाचक त्याचे चिकित्सकपणे अवगाहन करतील याचा मला विश्वास आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.