
अंधार, काळाकभिन्न अंधार
सारे जग प्रकाशात नाहून निघत असताना भरतखंड मात्र काळाकभिन्न अंधारात खितपत पडला होता वर्षानूवर्षे. कधीकाळी रामकृष्णांचा असलेला हा देश हिरव्या शापामुळे जणू गोठून गेला होता. देवालाही त्याची दया येत नव्हती, पण एक दिवस करुणेच्या त्या सागराची नजर या भरतखंडावर पडली. त्याचे करुणामय अंत:करण द्रवले आणि त्याने या भरतखंडाच्या उद्धाराची जबाबदारी आपल्या प्रिय पुत्रावर सोपवली. देवाचा हा प्रिय पुत्र नमोसुर्य. आपल्या पित्याच्या अर्ध्या वचनात असलेल्या या नमोसुर्याने तातडीने भरतखंडावर अवतरायला सुरुवात केली आणि येथील अंधार हळूहळू दूर होऊ लागला.

एकोसोतीस करोड देशवासियांचा हा देश व्हावा अशी केवळ इच्छा नमोसुर्याने व्यक्त केली आणि काय आश्चर्य! एका क्षणात एकोसोतीस करोड देशवासियांचा हा देश अस्तित्वात आला. पुर्वी केवळ अंधार होता. आता प्रकाशाचे युग सुरू झाले. साऱ्या देशवासियांनी नमोसुर्याला भक्तीभावाने लोटांगण घातले. त्यांच्या असिम तेजाने सारे जण दिपून गेले. लोक नमोसुर्याना म्हणाले, ` नमोदेवा, तुमचे हे रुप आम्ही आमच्या या पापी डोळ्यांनी पाहू शकत नाही. तुम्ही कृपा करून आम्हाला मनुष्यरुपाने
दर्शन द्यावे ही आमची प्रार्थना आहे. ` भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या करूणासागर देवाचाच तो पूत्र, त्याने लोकभावना जाणली आणि तो उद्गारला, `अहो लोकहो, मी तुमच्यासाठी केव्हाच अवतार घेतलेला आहे. तुम्ही मला जाणा, मला ओळखण्याची खुण आहे, अच्छे दिन. `मित्रों` हा माझा हुंकार आहे. लोकांनी नमोसुर्यासमोर लोटांगण घातले. नमो नमोचा अखंड जयघोष सुरू झाला. आणि
लोकांच्या कानी आवाज आला,
`मित्रों`.
भरतखंडातील लोक हे देवाने निवडलेले लोक होते. देवाचा पुत्र त्यांच्यातच रहायला आला. त्याचा आवाज नेहमी लोकांच्या कानी पडू लागला. त्याच्या मन की बाता लोकांना आपल्या मन की बात वाटू लागली. लोक भक्तीरसात दंग झाले.
पण सैतानाचे काम सुरू होतेच. अनेक हिरवे सैतानी साप लोकांच्या कानाजवळ येऊन फुसफुसत होते. पण देवाच्या पुत्राला कोणाचीच भीती नव्हती. एक दिवस त्याने सैतानाविरुद्ध युध्द पुकारलेच. त्याने प्रथम हल्ला सैतानाजवळील धनसंपत्तीवर केला. त्याने मनात इच्छा व्यक्त केली की सैतानाजवळील धनसंपत्ती नष्ट होवो. देवपुत्राची इच्छा ती ( त्याचे आभार) एका क्षणात सैतानाजवळील सारी धनसंपत्ती नष्ट झाली. सकाळी लोक उठले आणि त्यांनी पाहिले तर त्यांच्याजवळील धनसंपत्तीही नष्ट झालेली त्यांना दिसली. लोक ओरडू लागले, आक्रोश करू लागले. नमोसुर्याची करुणा भाकू लागले. त्या करुणासागराचा क्रोधाने भरलेला आवाज प्रथमच लोकांच्या कानी पडला. `हीच काय तुमची देवावरची श्रद्धा. एवढेही सहन करू शकत नाही तुम्ही.

देवाने तुम्हाला या परिक्षेसाठी निवडलेले आहे. देवाची परिक्षा मोठी कठीण असते. त्याचे काम तुम्हाला कळणारे नाही. त्यामुळे आक्रोश करू नका. यापेक्षाही मोठमोठ्या परिक्षांना तु्म्हाला तोंड द्यावयाचे आहे. तेव्हा श्रद्धा ठेवा. हा देवाचा पुत्र तुमचे अखेर भलेच करणार आहे. ` लोक भानावर आले. त्यांनी नमो नमोचा घोष चालवला. त्यांच्या साऱ्या वेदना क्षणार्धात नाहिशा झाल्या. पण सैतान जखमी झाला होता. त्याचे विषारी साप पुन्हा पुन्हा लोकांजवळ जाऊन फुसफुसत राहिले. `अरे, तुमचे धन गेले, तुमचा रोजगार गेला, तरी तुम्ही याच्यावर विश्वास ठेवता. हा स्वत:ला देवाचा पुत्र म्हणवतो. पण हा केवळ सोंगाड्या आहे. जागे व्हा. जागे व्हा. `
सैतानाच्या भुलावणीला लोक भुलु लागले आहेत याची खबर देवपुत्राला ( त्याचे आभार) लागली. त्याने आपल्या सैन्याला आदेश दिला. जिथे जिथे हे सैतानी साप सापडतील तिथे तिथे त्यांना ठेचून काढा. देवपुत्राचे सैन्य साऱ्या भरतखंडात पसरले. सुर्याच्या भगव्या रंगाची वस्त्रे परिधान केलेल्या देवपुत्राच्या (त्याचे आभार) सैनिकांनी लाडक्या गोमातेच्या रक्षणासाठी आपली शस्त्रे परजली. अनेक हिरवे साप त्यांनी रस्त्यात पकडून मारले. पण आश्चर्य म्हणजे त्यांचे रक्त लालच निघाले.
पण सैतानाची पिलावळ कुजबुज करतच राहिली. ` कुठे आहेत अच्छे दिन. कुठे आहेत पंधरा लाख. कुठे संपलाय भष्टाचार. कुठे आहे रोजगार. अरे, हिच वचने या देवाचा पुत्र म्हणवणाऱ्याने तुम्हाला दिली होती ना! हा देवाच्या पुत्राचे सोंग घेतलेला तोतया आहे. तुम्हाला अजुन कसे समजत नाही.`
काही लोक सैतानाला भुलु लागले. त्यांनी प्रत्यक्ष देवाच्या पुत्राला (त्याचे आभार) प्रश्न विचारायला सुरुवात केली. ही तर प्रत्यक्ष देवाचीच अवज्ञा! आता देवपुत्राला राग अनावर झाला. त्याने लोकांना धडा शिकवायचा ठरवला. त्याने इच्छा व्यक्त केली, यांच्यावर अनेक संकटे येवोत. मग त्यांना माझी आठवण येईल. देवपुत्राचीच इच्छा ती. बाहेरील शत्रुचे देशावर आक्रमण झालेच. लोकांनी पुन्हा नमो नमोचा अखंड जप सुरू केला. नमोसुर्यानी लोकांना अखेरला इशारा दिला. या संकटातून मीच तुम्हाला बाहेर काढू शकतो. पण मला तुमची संपुर्ण भक्ती हवी आहे. मला कोणताही प्रश्न विचारलेला चालणार नाही. मी प्रत्यक्ष देवाचा पुत्र आहे. त्यामुळे मी ते करीन तेच बरोबर. पु्न्हा नमो नमोचा जयघोष सुरु झाला. नमोसुर्याने फक्त एक फुंकर मारली आणि शत्रु वाऱ्यावर उडत गेला. पुन्हा नमो नमो.
राफेलमध्ये भ्रष्टाचार झाला….. नमो नमो.
सगळ्या सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचार …….. नमो नमो.
शेतकरी नाराज……. नमो नमो.
महिला नाराज ……. नमो नमो.
रोजगार नाहीत…….. नमो नमो.
कुठल्याही समस्येवरचा भरतखंडातील एकच रामबाण उपाय……. नमो नमो.
मग भरतखंडातील काही शहाणे सुरते लोक एकत्र आले. त्यांनी विचार केला, देवपुत्रापेक्षा आपण प्रत्यक्ष देवालाच का विचारू नये. देव आणि आपण यांच्यात त्याच्या पुत्राची मध्यस्थी कशासाठी. त्यांनी प्रत्यक्ष देवाची करुणा भाकण्यास सुरुवात केली. `हे करुणाकरा, देवाधिदेवा, आता तुच आमचा त्राता, तुच आमचा उद्धारकर्ता. आमच्या संकटांतून आम्हाला बाहेर काढा. `
लोकांच्या अशा सततच्या ओरड्याने त्रस्त होऊन देव त्याच्या घराबाहेर आला. `लोकहो, तुम्ही स्वत:हून संकटे ओढवून घेता आणि मग माझ्या नावाने ओरडा करता. मला सगळ्या जगाचे काम पडलेले आहे. केवळ तुमच्यासाठी मी किती वेळा धावून येऊ. मी तुमची निर्मिती केली, तेव्हा तुमच्यामध्ये चांगले काय आणि वाईट काय याची परिक्षा करणारी सारासारविवेकबुद्धीही अपलोड करून दिली होती. तिचे अपडेट व्हर्जन तुम्ही का वापरत नाही बरं. आता पुन्हा तुमच्यापुढे मी आणखी एक संधी उभी केली आहे. तुमच्या देशात लवकरच मतदान होत आहे. त्यातून तुमचे प्रतिनिधी तुम्हाला निवडायचे आहेत. मी दिलेल्या सारासारविवेक बुद्धीचा वापर करून योग्य नेतृत्व निवडा म्हणजे पु्न्हा पुन्हा माझा धावा करत राहण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. ऐवढे बोलून देव पुन्हा त्याच्या घरात दिसेनासा झाला.
लोकांनी देवाचे बोलणे मनावर घेतले की नाही हे येत्या २३ मेलाच कळेल.
घनश्याम केळकर
बारामती