‘द्वेष’भक्तीचा उथळ उन्माद आता पुरे!

BY: टीम, HELLO महाराष्ट्र

 FEBRUARY 27, 2019

थर्ड अँगल

Untitled design

दोन घटना आहेत. जेमतेम दोन आठवड्यातल्या! एक पुलवामा हल्ला, ज्यानंतर सारा देश हळहळला आणि दुसरी, काल वायुसेनेने केलेली कामगिरी ज्यामुळे देशात आनंद पसरला. पुलवामा हल्ल्यानंतर ‘युद्ध करा, पाकिस्तान नकाशातून मिटवून टाका.’ वगैरे वगैरे मॅसेजेस घरात बसून व्हाट्सपवरून फिरवणारे लोक दिसत होते आणि आजही दिसतात आणि हा मूर्खपणा सामूहिक असल्यामुळे तो ‘सभ्य’ मानला जातोय. पण, अशा पद्धतीने उन्मादी भावनेनं उथळपणे द्वेषभक्तीचा दाखवण्यात बिझी असलेली तरुणाई पाहून वाईट वाटतंय. हे तेच लोक आहेत, ज्यांनी भगतसिंग १४ फेब्रुवारीला फाशी गेले असं म्हणून पुलवामा हल्ल्याच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाईन डेला मॅसेज फिरवले आहेत. हे तेच लोक आहेत ज्यांना पाकिस्तानी अतिरेकी, पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तानी सरकार, पाकिस्तानी जनता यातला फरक कळत नाही.

हे तेच लोक आहेत ज्यांना युद्ध म्हणजे भारत-पाक क्रिकेटची मॅच वाटतेय. ज्यात कुणीतरी एक जिंकतं आणि कुणीतरी एक म्हणजे आपणच जिंकणार, असं वाटतंय आणि आपण जिंकलो कि प्रश्न कायमचा सुटेल, असंही वाटतय. हे तेच लोक आहेत ज्यांच्या गावी युद्धाची भीषणता, रक्तपात, असुरक्षितता, त्यानंतर कोलमडणारे अर्थकारण याचा मागमूसही नाही. लढाई पराभुतांइतकीच विजेत्यांसाठीदेखील वाईट असते, वाताहत करणारी असते, याचा गंध नाही. हे तेच लोक आहेत, ज्यांना पुलवामा हल्ला झाल्यावर ‘हा हल्ला होऊच कसा शकतो?’ असा प्रश्न विचारावा वाटला नाही. प्रचारसभा घेण्यात व्यस्त असल्यामुळे सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहणाऱ्या मोदींना जाब विचारण्याऐवजी राहुल गांधीचा हल्लेखोरासोबत फेक फोटो व्हायरल करण्यात धन्यता मानावी वाटली. हे तेच लोक आहेत जे एका व्हिडीओ गेमचा फुटेज ‘वायुसेनेने केलेला हल्ला’ म्हणून फॉरवर्ड करत सुटले आहेत.

या साऱ्या कृती या युद्धज्वर पसरवणाऱ्या आहेत. हा वाढणारा उन्मादी युद्धज्वर आणि त्याखाली लपले वा लपवले जाणारे अनेक प्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. सैनिकांच्या जीवाची बाजी लावून घरबसल्या टीव्हीसमोर बसून, असे मॅसेज फॉरवर्ड करून बेफामपणे हा युध्दज्वर पसरवणे हीच देशभक्ती, अशी व्याख्या एकूण वातावरणाचीच बनलेली दिसतेय. पुलवामा हल्ल्यानंतर ‘तरीही युद्ध नकोच. युद्धज्वरही नको…’ अशी भूमिका घेणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना देशाचे थेट शत्रूच ठरवलं गेलं.

पाकस्थित दहशतवादी, पाक लष्कर, पाक सरकार आणि पाक जनता या चार बाबी एकच नाहीत-नसतात. सरकारी पातळीवर चर्चा, व्यापार, करार-व्यवहार यातून संवाद सीमेवर ताणतणाव न राहता शांतता जनतेमध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक देवघेव यातून सुसंवाद आणि दहशतवादाचा बिमोड हा दोन राष्ट्रांचे संबध सुधारण्याचा मार्ग आहे. आणि या बाबी दोन्हीकडून व्हायला हव्यात. हा फरक समजायला हवा !

हे समजून घेण्याची क्षमताच आपली उरलेली नाहीय. इतकं आपलं ‘भावनिक उन्मादीकरण’ झालेलं आहे कि ज्याचं सामुहीकरण सोशल मीडियाने अगदी सोपं केलेलं आहे. आपल्याला हे सारं समजून घेण्याऐवजी घराशेजारच्या मुस्लिमाकडे द्वेषाने पाहणं जास्त सोपं वाटतय. वा एखाद्या व्हिडीओ गेमचे फुटेज फॉरवर्ड करत सुटणं सोपं वाटतंय.

‘घरात घुसून मारलं’ ही भावना आता सार्वत्रिक होईल आणि झालीही. यशस्वी हल्ल्याचा आनंदही होईल. जसं आपल्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर थेट पाकशी युद्ध करून ‘संपवून टाका एकदाचा विषय.’ असं म्हणून युद्धाने कोणताच प्रश्न सुटत नसतो. तसेच काल आपल्या वायुसेनेने हल्ला केल्यावरही हा प्रश्न लगेच मिटणार नाहीय. याचंही भान आज असायला नको का?

‘बर्ट्रेण्ड रसेल’नं छान म्हटलंय. तो म्हणतो, “प्रत्येक प्रखर भावना स्वतःची एक ‘रम्य कथा’ रचताना दिसते. ही भावना जर एकट्या माणसाचा विशेष गुण असेल तर, त्या माणसाने कितीही रम्यकथा उभारल्या तरी त्याला वैयक्तिक मूर्खपणाच म्हणणार! पण, काही वेळा एखादी भावना सामुदायिक भावना बनते आणि ही सामुदायिक भावना सामूहिक पातळीवर एक रम्य आकार तयार करू लागते. लढाया, युद्धे, दंगली यांच्यात अशा रम्यत्व पावलेल्या भावना मोकाट सुटलेल्या दिसतात. ही ‘मिथ मेकिंग’ची वृत्ती अनेकदा माणसाच्या मुळाशी असते.” आज आपण या मोकाट सुटलेल्या वातावरणातच आहोत, असं मला वाटतं.

‘हिंदुस्थान को नक्षे से मिटा दो!’ अशीच रम्य सामुदायिक भावना पाकीस्तान जन्मापासून आजवर पोसत आला म्हणून तर, आजवर त्याची ही वाताहत झाली. आपल्यालाही हाच विषय केंद्रस्थानी ठेऊन भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ व्हावं असं वाटतं का? युद्धाने कोण चूक, कोण बरोबर ठरत नसतं तर, युद्धात कुणाचं काय काय उरलं, एवढंच ठरतं. भारताचा सामान्य नागरिक म्हणून मला सगळंच आंतरराष्ट्रीय राजकारण नसेल कळत पण ही सूडाची भावनाच मला निरर्थक वाटते. आणि मला असं वाटतं म्हणून मी देशद्रोही ठरत नाही, हे मला शांतपणे नमूद करावसं वाटतं.

उन्मादी वातावरणात सैनिकांच्या जीवावर आणि देशपातळीवर उठलेली भावनेची लाट याचा उपयोग करून. या सगळ्या घडामोडीचं राजकारण कसं केलं जातंय हे पाहणं आणि या सगळ्या दरम्यान समवयस्क तरुणाईचं उथळपणाने व्यक्त होणंही दिसतंय, जे फारसं आश्वासक नाही.

c ba c af efbede

विनायक होगाडे  

919011560460‬

1 thought on “‘द्वेष’भक्तीचा उथळ उन्माद आता पुरे!”

  1. युध्द म्हजे रम्यकथाच हे खरे आहे.युध्दाने फक्त फेक मिथ पसरवला जाते.ह्याला राष्टअभिमान माहिती येत नाही.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.