सकुते ढाका

आज १६ डिसेंबर. आपल्या शेजारच्या दोन देशांमध्ये हा दिवस पाळला जातो. एका देशात दु;खाचा, तर दुसऱ्या देशात आनंदाचा. हा दिवस म्हणजे पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यासमोर ढाका येथे शरणागती पत्करल्याचा दिवस. एक देश तुटल्याचा आणि एक नवीन देश निर्माण झाल्याचा दिवस.

शरणागतीच्या करारनाम्यावर  भारतीय जनरल अरोरा यांच्सयासमोर सह्या करताना पाकिस्तानचे जनलर नियाझी

हा १६ डिसेंबर १९७१ सालातला. या दिवशी ढाक्यात पाकिस्तानी जनरल नियाझी यांनी भारतीय जनरल अरोरा यांच्यासमोर शरणागतीच्या कागदांवर सही केली आणि पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन बांगलादेश जन्माला आला.

पण याची खरी सुरवात झाली १४ ऑगस्ट १९४७ रोजी. या दिवशी हिंदुस्थानचे तुकडे होऊन पाकिस्तानचा जन्म झाला. भौगोलिकदृष्ट्या हे दोन तुकडे होते आणि त्यांच्यामध्ये १००० किलोमीटरचे अंतर होते. असे दोन प्रदेश एक देश म्हणून एकत्र कसे राहू शकतील अशी शंका स्वाभाविकपणे त्या वेळेस यायला हवी होती. पण आश्चर्य अस की ही शंका पाकिस्तानऐवजी भारताबद्दल जगातील अनेक विचारवंतांनी घेतली. अनेक भाषा, अनेक धर्म, पराकोटीचीआर्थिक, सामाजिक विषमता असलेल्या या देशाचे काही महिन्यातच तुकडे पडतील अशी भीती अनेकांनी व्यक्त केली. याउलट इस्लामच्या आधारावर बनलेला पाकिस्तान एकत्र राहिल अशी भावना होती. पण उण्यापूऱ्या पंचवीस वर्षाच्या आत पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. भारत मात्र अजूनही अखंड आहे आणि यापूढेही राहिल अशा स्थितीत आहे.

`सकुते ढाका` म्हणजे ढाक्याची हार या नावाने हा दिवस पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध आहे. आजच्या दिवशी सर्व चॅनलवर चर्चासत्रे रंगतात. अनेक सार्वजनिक कार्यक्रम घेतले जातात. शहिदांना मानवंदना दिली जाते. कुणी पाकिस्तानच्या तत्कालिन सत्ताधाऱ्यांना दोष देते तर काही भारताला दोषी धरतात. एकुण पाकिस्तान तुटल्याची सल आजही ताजी आहे.

दुसरीकडे बांगलादेश. तिथला तर हा स्वातंत्र्यदिन.साऱ्या देशातजल्लोष, झेंडावंदन, लष्कराची परेड, रोषणाई, मिठाई वाटप, एकुणच आनंदीआनंद असणारे वातावरण. पण तिथेही काही कोपऱ्यात इस्लामच्या नावाने निर्माण झालेला देश तुटल्याचे दु:ख असतेच, आणि त्याहीपेक्षा `हिंदू` भारताच्या साह्याने हे झाल्याचे दु:ख जास्त असते.

सहकार्य आणि साथ

दोन्हीकडे असलेले एक साम्य म्हणजे भारताची आठवण. एका देशात राग व्यक्त होतो, तर एका देशात कृतज्ञता. प्रत्यक्ष भारतात मात्र हा दिवस फारसा कुणाच्या लक्षात नसतो. सैन्याच्या पातळीवर शहिद सैनिकांना मानवंदना दिली जाते.दिल्ली आणि कलकत्याच्या बांगलादेशाच्या एम्बसीमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात एवढेच.

पण या घटनेतून आपल्याला शिकण्यासारखे काय आहे? पाकिस्तान का तुटला आणि भारत का अखंड राहिला? यामागे आजकाल ज्यांना उटसूठ शिव्या देण्याची फॅशन आहे त्या नेहरू आणि गांधीची दूरदृष्टी आहे. त्यांनी हा धोका वेळीच ओळखला आणि त्यावर उपाय योजला. पाकिस्तानचे राज्यकर्ते मात्र या चुका करतच राहिले.

पहिली चुक भाषेबाबत. जीनांनी ऊर्दु ही पाकिस्तानची राष्ट्रभाषा असेल अशी घोषणा केली आणि ती भाषा बंगाली बोलणाऱ्या पुर्व पाकिस्तानवर लादली. त्यातून संघर्षाची पहिली ठिणगी पडली. इकडे नेहरूंनी हिंदीला प्रमुख भाषेचा दर्जा देऊन तिचा प्रसार करण्याचे धोरण आखले. पण तिला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याचे टाळले. सर्व भाषांचा आदर केला. लोकभावना लक्षात घेऊन भाषेनूसार राज्यांची निर्मिती केली.

दूसरा प्रश्न समान दर्जाचा.पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी बंगाली लोकांना कायम दुय्यम लेखले. त्यांनी लष्करभरतीचे असे नियम बनवले की कमी उंचीचे आणि सडपातळ बंगाली तिथे जाऊच शकणार नाहीत. नोकरशाहीतही बुद्धीमत्ता असतानाही बंगाल्यांना महत्वाची पदे नाकारली गेली. एकही बंगाली पंतप्रधान आपला कार्यकाळ पुरा करू शकला नाही. ज्यावेळेस निवडणूकीच्या मार्गाने बहुमत मिळवून पंतप्रधानपद बंगाल्यांच्या वाट्याला आले त्यावेळी ते नाकारून पंतप्रधानपदाचे उमेदवार शेख मुजिबूर रहेमान यांना थेट तुरुंगाचा रस्ता दाखविण्यात आला.

बंगबंधू शेख मजिबूर रहेमान
बंगाली जनतेवर अत्याचार करणारे पाकिस्तानी सैनिक

१९६५च्या भारत – पाक युद्धात तर त्यावेळच्या पुर्व पाकिस्तानी आणि आजच्या बांगलादेशी जनतेला मोठा धक्का बसला. त्यांच्या असे लक्षात आले की आपल्या संरक्षणासाठी सीमेवर सैन्यच नाही. सगळे सैन्य पश्चिम पाकिस्तानच्या संरक्षणासाठी तिथल्या सीमेवर पाठवण्यात आलेले आहे. या सगळ्यामुळे बंगाली जनतेमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. तो दडपण्यासाठी सैन्य पाठवण्यात आले, बंगाली जनेतवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे वणवा आणखीच भडकला आणि अखेर भारताच्या साह्याने बंगाली जनतेने पाकिस्तानपासून आपलीसुटका करून घेतली.

भारतीय सैन्याचे स्वागत करताना बंगाली जनता

भारताने मात्र राज्यघटनेमध्येच सर्वांना समान दर्जा आणि समान संधी दिली. राज्यघटना लिहण्याचे कामच उपेक्षित वर्गातून आलेल्या डॉ.बाबासाहेबआंबेडकरांवर सोपवले. त्यामुळे तळागाळातील जनतेचा राज्यघटनेवरील विश्वास दृढ झाला. धर्म, वंश, वर्ण,जात यावरून भेदभाव न करता सर्वांना समान संधी मिळावी यासाठी राज्यघटनेतच तदतुदी झाल्या. त्याचा परिणामस्वरूप भारतातून फूटून निघण्याची कोणतीही चळवळ येथे मूळ धरू शकली नाही. अशा अनेक चळचळी तयार झाल्या. हिंसक आणिसशस्त्र लढेही उभारले गेले पण त्या त्या वेळच्या भारतीय राज्यकर्त्यांनी सैनिकी बळाबरोबरच राजकीय मार्गाचा वापर करून या चळवळी शांत करण्यात यश मिळवले.

मुक्तीबाहिनी – बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी हाती शस्त्र घेतलेल्या बंगाली रंणरागिणी

पण गोष्ट इथे थांबत नाही. आजही काश्मिरची जखम चिघळतेच आहे. तिथे लष्करी बळाचा अतिरकी वापर होताना दिसतो आहे. पंजाब आणि ईशान्य भारत आज शांत असले तरी राज्यकर्त्यांची चुकीची पावले परिस्थिती बिघडवू शकतात. अशा प्रत्येक वेळी `सकुते ढाका` लक्षात ठेवून पावले टाकणे हाच यातला धडा आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.