राजस्थानच्या प्रवासात भेट दिली उदयपूर,जयपूर आणि अजमेरला . साधारण पाहिले तर आजकालची सगळी शहर सारखीच दिसतात. पण जरा इतिहास आणि भुगोलाच्या नजरेतून पाहिले तर वेगळे दृष्य दिसायला लागते.

उदयपूर, जयपूर आणि अजमेरवरून राजस्थानच्या स्वभावाच्या तीन टोकांचा अंदाज येतो. पहिले उदयपूर, सिसोसियांच्या स्वाभिमानाची कहाणी सांगणारे. चितोडगढ आणि मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असणाऱ्याचा इतिहास असणारे शहर. राणा कुंभा, राणा संगापासून महाराणा प्रतापपर्यंतचा दैदिप्यमान वारसा. शत्रुच्या स्वाधीन होण्यापेक्षा जोहार करून स्वत:ला अग्नीला अर्पण करणाऱ्या रजपूर वीरांगनांचा. लोदी,खिलजी,बाबर,अकबर, जे जे आक्रमण करून आले त्यांच्याशी कोणतीही तडजोड न करता सर्वस्व पणाला लावून लढलेल्यांचा केशरिया रंगाचा वारसा सांगणारे शहर म्हणजे उदयपूर. उदयपूरमध्ये एक पर्यटक म्हणून फिरताना तेथील गाईडच्या तोंडून किमान चार पाच वेळा तरी हळदीघाटच्या लढाईची, महाराणा प्रताप आणि राजा मानसिंगच्या लढाईचा उल्लेख होतोच.राणा प्रतापनंतर काही काळ त्यांच्या वारसांनी मोघल बादशहांशी समन्वयाचे धोरण राखले पण आपला आत्मसन्मान राखूनच. मोघलांचीमर्जी राखण्यासाठी त्यांनीआपल्या घरातील मुली आणि बहिणी त्यांना देऊन त्यांच्याशी नातेसंबंध जोडण्याचा कधी प्रयत्न केला नाही

आजचे उदयपूर हे एक सुंदर शहर आहे.अनेक तलाव, सुंदर बागा,मोठमोठे पॅलेस यांनी नटलेले. जागोजागी महाराणा प्रताप आणि त्याच्या चेतक घोड्याची आठवण काढणारे पुतळे आणि चौक असणारे.

दुसरे शहर जयपूर. उदयपूरपेक्षाही मोठे. उदयपूरपेक्षा मोठे पॅलेस, मोठे तलाव असलेले. येथील आमेरच्या किल्ल्यावर मानसिंगाने बारा राण्यांसाठी बांधलेले बारा महाल दिसतील आणि त्या बारा महालात जाण्यासाठी बांधलेला भुलभुलैया मार्गही दिसेल. महाराष्ट्राला परिचित असलेल्या मिर्झाराजे जयसिंग यांनी आपल्या दोन राण्यांसाठी बांधलेले महालही दिसतील. उन्हाळ्यात थंडावा येण्यासाठी भिंतीतून पाण्याचा प्रवाह सोडलेले महाल दिसतील. जयपूरचाभव्य हवामहल, सिटी पॅलेस आणि तेवढीच भव्य बाजारपेठही. भव्यतेच्या बाबतीत जयपूरपुढे उदयपूर जरा मागेच पडते.

पण हाच राज मानसिंग अकबराचा सेनापती म्हणून महाराणा प्रतापवर चालून गेला होता.हेच मिर्झाराजे जयसिंग औरंगजेबाचे सेनापती म्हणून शिवाजीराजांवर चालून आले होते. जयपूरच्या राजांनी सर्वप्रथम मोगल बादशहांना आपल्या मुली देऊन त्यांच्याशी संबंध जोडले. अर्थात जयपूरचा स्वभाव संघर्षापेक्षा तडजोडीचा आहे. जयपूरमध्ये महाराणा प्रताप आणि चेतकचे नाव फारसे आढळत नाही. याच्या परिणामस्वरूप जयपूरला समृद्धी आणी शांतता जास्त मिळाली. ती आजच्या जयपूरमध्येही पाहता येते.येथील गाईड हळदीघाटच्या लढाईचा उल्लेख टाळतातातच. तेथे इंग्लंडला जाताना गंगाजलाखेरीज दुसऱ्या कोणत्याही पाण्याचा वापर न करणारा येथील राजा कसा दोन तीन महिने पुरेल असे गंगाजल तेवढ्याच मोठ्या चांदीच्या घागरीत घेऊन गेला याचे जास्तमहत्व आहे. येथील गाईड त्यानंतर महत्वाने सांगतो स्वातंत्र्यानंतरच्या काळातील महाराणी गायत्रीदेवीं बद्दल व त्यांच्या आजच्या वंशजांबद्दल.
जयपूर आणि उदयपूरमध्ये एक स्पर्धा असावी असेही जाणवत राहते. दोन्हीकडे सारखेच महाल, सारखीचतळी, सारखेच किल्ले हे एकमेकांच्या चढाओढीतून तर झाले नसावे ना असे वाटत राहते. आणि इतिहासाचाही त्याला दुजोरा मिळतो.
तिसरे शहर अजमेर. मुळचे हे शहर चौहानांचे. महंमह घोरीशी लढाई लढणारा पृथ्वीराज चौहान अजमेरचा. पण अजमेर ओळखले जाते सुफी संत मैमुद्दिन चिस्तींच्या नावाने. भारतीय उपखंडात मुस्लिमांची जी श्रद्धास्थाने आहेत, त्यातील पहिल्या दोन तीन नावांत येणारे स्थान म्हणजे अजमेर. भारतात मुस्लिमधर्माचा प्रसार करण्यात सुफी संताचा फार मोठा हातभार लागला आहे. त्यात दिल्लीचे निजामुद्दिन औलिया आणि अजमेरचे मैनु्द्दिन चिस्ती ही प्रमुख नावे. त्यामुळे अजमेर एकाबाजूने मुस्लिम संस्कृतीचे राजस्थानातील आगर. आणि दुसऱ्या बाजुने जयपूर आणि उदयपूर यांच्यातील समतोल साधणारे एक केंद्र आहे. मोगलांच्या मेवाडच्या दिशेने जाणाऱ्या सेना अजमेरमध्येच एकत्र येत असत. जयपूरशी दोस्ती आणि उदयपूरशी दुष्मनी राखणारे शहर अजमेर. सगळ्या मोगल बादशहांची अजमेरवर श्रद्धा होती. ते अनेकदा येथे येत असत.
पण अजमेर हे हिंदु मुस्लिम संघर्षाचे नाही तर हिंदु मुस्लिम एकतेचे ठिकाण,गंगाजमनी तहजीब शिकविणाऱ्यांचे आद्यस्थानम्हणून ओळखले जाते. त्यांमुळे अजमेरच्या दर्ग्याला भेट देणारात मुस्लिमांइतकेच हिंदूही असतात.

अजमेरचे आणखी एक वैशिष्ठ `चार दिनोंका झोपडा`. येथे आलेल्या मुस्लिम आक्रमक बादशहासाठी तातडीने बांधलेले हे प्रार्थनागृह. इथे पुर्वी संस्कृत पाठशाळा होती असे म्हणतात. ही भारतातले सर्वात पहिले मुस्लिम प्रार्थनेचे ठिकाण. या घाईघाईत केलेल्या बांधकामात हिंदु आणि मुस्लिम संस्कृतीचे अनोखे एकत्रीकरण झालेले दिसते.येथील खांबांवर कोरलेल्या मुर्त्या स्पष्ट दिसतात, ज्या इस्लामला अजिबात चालत नाहीत. एका बाजूने मुस्लिम आक्रमकांनी हिंदू संस्कृतीवर केलेल्या हल्ल्याचा हा पुरावा आहे. तर दुसरीकडे यातून उभ्या राहिलेल्या खास भारतीय म्हणजेच वेगवेगळ्या संस्कृतींचा संघर्ष आणि समन्वयातून उभ्या राहिलेल्या जीवनपद्धतीचे एक स्मारक आहे.

संघर्ष आणि समन्वयाचा आणखी एक राजस्थानी नमुना म्हणजे राजस्थानच्या आजच्या मुख्यमंत्री विजयाराजे सिंधिया. राजस्थानातील रजपूत राजांनी ईस्ट इंडिया कंपनीशी तह केला, त्यामध्ये त्यावेळेचे मराठे सरदार शिंदे आणि होळकर यांच्यापासून संरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी होती. त्याचशिंद्याच्या घराण्यातील विजयाराजे आज राजस्थानातील महत्वाच्या लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत.