एक तरी काश्मिरी जोडावा…

एक तरी काश्मिरी जोडावा…

Posted: 06 Nov 2018 07:49 PM PST

Image may contain: sky, tree, outdoor and nature
Image may contain: 2 people, people sitting

काश्मिरला जीवनात एकदातरी जावे व तेथील अद्भूत सौंदर्याचा अनुभव घ्यावा असे स्वप्न देशातीलच नव्हे तर जगातील बव्हंशी लोक जपतात. पण काश्मिरमधील कधी शांतता तर कधी उद्रेकी अशी बेभरवशी परिस्थिती अनेकांना या स्वप्नापासुन दुर ठेवते. काश्मिरबाबत येणा-या बहुतेक बातम्या या दहशतवादाच्या, हिंसेच्या असल्याने ज्यांना तेथील वास्तव स्थिती माहित नाही त्यांच्या मनात संपुर्ण खोरेच हिंसेच्या तांडवाखाली आहे की काय असा समज निर्माण करते, त्यामुळे ते मग काश्मिरपासुन दुर राहणेच पसंत करतात. मधला काही शांततेचा काळ गेल्यानंतर गेल्या चार वर्षांत काश्मिरमध्ये जाणारा पर्यटकांचा ओघ आटत गेला आहे. काश्मिरची ७०% अर्थव्यवस्था पर्यटनावरच अवलंबुन असल्याने तेथील अर्थजीवन पुरते ढासळले आहे व ते फुटीरतावाद्यांच्या पथ्यावर पडते आहे. यात होरपळला जातो आहे तो सामान्य काश्मिरी नागरिक.

जम्मु-काश्मिर सरकारच्या पर्यटन विभागाने काश्मिरचे स्थिती निवडक लोकांनी स्वत:च्या डोळ्यांनी पहावी व काश्मिरबाबत जे समज निर्माण झालेत ते दुर व्हावेत या प्रयत्नांचा भाग म्हणून नुकताच पानगळ महोत्सव आयोजित केला होता. मी तब्बल सोळा वर्षांनंतर या निमित्ताने पुन्हा काश्मिरला गेलो. श्रीनगर, पेहलगाम ते गुलमर्गलाही भेट देता आली. मधल्या काळात तेथे काय काय बदल झाले हेही स्पष्टपणे टिपता आले व तुलनाही करता आली. आम्ही गेलो त्या दिवशीच श्रीनगरमध्ये बंदचा सामना करावा लागला. हा बंद विशेषत: दक्षीण काश्मिरमध्ये कडकडित तर अन्य भागांत तुरळकपणे पार पडला. काही भागांत दगडफेकीच्याही बातम्या आल्या. हा बंद दुस-या दिवशीही चालुच होता. कधी हुरियत तर कधी संयुक्त विरोध समिती हे बंद घोषित करत राहते. त्याचा परिणाम सामान्य व्यापारही ठप्प होण्यात होतो आणि अर्थजीवन अजुनच विस्कळीत होते हे सहज लक्षात येण्यासारखे होते. एवढे प्रचंड आर्थिक नुकसान होत असतांनाही लोक बंद पाळतात म्हणजे ते दहशतीखालीच असणार हेही उघड आहे. यात खरेच फुटीरतावादी किती असा प्रश्न आला तर त्याचे उत्तर अवघड होऊन जाईल.

या बंदच्या दरम्यान काही भागांत दगडफेकीचे प्रकार घडल्याचे कानावर येत असले तरी आम्हाला असा प्रकार प्रत्यक्ष दिसला नाही. प्रवासात गांवो-गांवी काश्मिरी पायघोळ पेहरण घातलेले लोक बंद दुकानांच्या आसपास अथवा चौकांत निवांत उभे दिसत होते. कोणाच्या गाडीवर दगडफेक करंण्याचा त्यांचा विचार दिसला नाही. अनंतनागसारख्या संवेदनशिल भागात लष्कराची उपस्थिती लक्षणीय होती. त्याउलट स्थिती गुलमर्गला जातांना होती. बंद असला तरी अनेक दुकाने अर्धी शटर्स उघडी ठेवुन चालुच होती तर लष्कर जवळपास अदृष्य होते. पर्यटकांना येथे कोठेही त्रास दिला जात नाही याचा प्रत्यय सर्वच घेत होते आणि त्यात तथ्यही आहे. पर्यटकांवर तेथील अर्थव्यवस्था अवलंबुन असल्याने का होईना पर्यटकांची सुरक्षा काश्मिरींच्या दृष्टीने महत्वाची असणे स्वाभाविक आहे. पण काश्मिरबाबत ज्या बातम्या सातत्याने येत असतात त्यात नकारात्मकताच अधिक असल्याने पर्यटक घाबरुन तेथे जाण्याचे टाळतात. खरे तर याचे काही कारण नाही. भारतात कोठेही पर्यटन जेवढे सुरक्षित आहे तेवढेच येथेही आहे.

या चार दिवसांच्या काळात सामान्य घोडा-खेचरवाल्यांपासुन ते उच्च अधिका-यांशी, अगदी काश्मिरी पंडितांशीही अनौपचारिक चर्चा केली. मुख्य प्रश्न हाच होता की काश्मिरी माणसाला अखेर हवे काय आहे? सोळा वर्षांपुर्वी मला जे जाणवले होते व ज्यासाठी मी सरहदचे संस्थापक संजय नहार यांच्या सहाय्याने अयशस्वी का होईना प्रयत्न केला होता त्याच बाबी पुन्हा ठळक होत गेल्या. बेरोजगारी ही काश्मिरची भयानक समस्या आहे. तेथील हस्तोद्योग नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने या उद्योगातील भुमीहीन व तुलनेने कमी शिकलेले बेरोजगार तरुण या दगडफेकी कारवायांमध्ये अधिक असलेले दिसतात. शेती व फळबागांच्या मालकांच्या उत्पन्नात घट होत गेली आहे. किंबहुना काश्मिरची प्रादेशिक अर्थव्यवस्था समजाऊन घेत त्यावर उपाय शोधण्याचे विशेष प्रयत्न झालेले नाहीत. काश्मिरमध्ये पर्यावरण व तेथील नैसर्गिक साधनसामग्रीपुरक उद्योग काढले गेले नाहीत. काश्मिरी जनतेला कोणत्याही वैचारिक, सांस्कृतीक व आर्थिक चळवळींपासुन दुर ठेवले जात सारे काही राजकारणकेंद्रित बनवण्यात आले.

फार कशाला, काश्मिरचा इतिहास किमान पाच हजार वर्षांचा असुनही, आणि आठव्या शतकातील कर्कोटक घराण्याच्या ललितादित्य मुक्तापीड या महान सम्राटाने अरबी स्वा-यांना थोपवत इराण, तुर्कस्थान, तिबेट ते मध्य भारतापर्यंत पसरलेले विशाल साम्राज्य स्थापन केले असुनही त्या काश्मिरी सहिष्णू परंपरेचे समग्र चित्र काश्मिरी अथवा अन्य विद्वानांना उभे करता आले नाही.  येथील मुस्लिमांचीही परंपरा आहे  ती सुफी. या सुफी विचारधारेपासुन आपण का आणि कसे नकळत दुर निघुन गेलो याचेही आकलन व विश्लेशन केले जात नाही. काश्मिरमध्ये आज संस्कुती व इतिहासाबद्दल आकलन नव्हे तर केवळ सोयिस्कररपणे करुन घेतलेले समज आहेत. आणि असे समज वर्तमान असा का आहे हे समजुन घेण्यास मदत करत नाहीत. थोडक्यात काश्मिरी समाज हा विचार बंदिस्त झाला आहे आणि त्याला त्यातुन बाहेर काढण्यासाठी जे प्रयत्न देशी विद्वान व विचारवंतांनी करायला हवे होते ते केले नाहीत. अपवाद संजय नहारांचा. गेली २३-२४ वर्ष ते सातत्याने काश्मिर व उर्वरीत देश यात हार्दिक अनुबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आले आहेत. मध्यंतरी त्यांच्याही हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता हे मराठी माणसं लवकर विसरुन गेली ही बाब वेगळी.
काश्मिरी राजकारण त्याच्या पद्धतीने चालत राहील. केंद्रातील सरकारे बदलतील तशी धोरनेही बदलत राहतील. पण लष्कराची उपस्थिती आणि अस्फा कायद्याचा वापर जी अविश्वासाची परिस्थिती निर्माण करत आहे त्यावर अत्यंत गांभिर्याने व तत्काळ मार्ग मात्र काढावाच लागेल. को्णत्याही धर्माचे असले तरी भौगोलिक स्थितीमुळे इतरांपासुन तुटलेल्या लोकांची मानसिकताही स्वकेंद्रीत बनते. पुर्वोत्तर राज्यांतही स्थिती फारशी वेगळी नाही. त्यांच्याशी भावनिक नाळ जुळवणे, समजुतदार नागरिकाच्या भुमिकेत जात स्नेहबंध कसे वाढतील व हे तुटलेपण किमान तरी क्से होईल यासाठी अन्य भागांतील नागरिकांनीही व्यक्तीगत पातळीवरही प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. किंबहुना फुटीरतावाद्यांना तेच उत्तर आहे व त्यातच काश्मिरचे पुरातन वैभव परत मिळवत काश्मिरी जीवन समृद्ध करण्याचा मार्ग लपलेला आहे.

पर्यटकांनी चिंता करावी, काश्मिरला टाळावे असे काहीही नाही. कोठेही जातांना जेवढी खबरदारी घ्यावी लागते तेवढी अवश्य घ्यावी. काश्मिरी माणूस अत्यंत साधा व अगत्यशिल कसा आहे याचा अनुभव तेथे जाऊन आलेले तुम्हाला सांगतीलच. कोणत्याही विखारी अपप्रचारांना बळी पदण्याचे कारण नाही. काश्मिरचे अलौकीक सौंदर्य पाहिलेच पाहिजे…आणि तेथील शक्यतो एका तरी माणसाशी स्नेहबंध जुळवता आले पाहिजेत. स्वत:साठी निसर्गाचा आनंद लुटत असतांनाच काश्मिरची कोंडी फोडण्यात आपण एवढा तरी हातभार नक्कीच पावु शकतो!

-संजय सोनवणी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.