“राक्षस” – संजय सोनवणी

 


मराठीत एके काळी उत्तमोत्तम इंग्रजी कादंब-या अनुवादित करण्याचे (आणि ढापण्याचेही) पेव फुटले होते. पाबळ (ता. शिरुर) येथील नेहरु वाचनालयात आणि धुळ्याच्या गरुड वाचनालयात मी अशा असंख्य कादंब-या वाचल्या. पण आज आठवतात अत्यंत मोजक्या. त्यातील एक म्हणजे “राक्षस” या नांवाने अनुवादित झालेली मुळ हर्मन मेल्व्हिल लिखित “मोबी डिक” ही कादंबरी. (याच कादंबरीचा मुलांसाठी साने गुरुजींनीही संक्षिप्त अनुवाद केला होता.) एका तरुण होतकरू खलाशाच्या नजरेतून लिहिली गेलेली ही कादंबरी. एका जहाजाचा कप्तान…एका निळ्या देवमाश्याने त्याचा पाय आणि त्याचा मुलगाही गिळलेला…सूडसंतप्त…काहीही करून त्या देवमाशाला शोधून त्याला ठार मारायचा प्रण केलेला…
कादंबरी संथ लयीत असली तरी एक शब्दही नजरेआड होऊ देत नाही. द्रुष्यात्मकता इतकी अचाट कि आजही “राक्षस” आठवली कि रोमांचित होतो. अनुवादकाचे मला नांव आठवत नाही…पण त्याचेही कसब पणाला लागलेले. एकच शोध…निळा देवमासा शोधायचा आणि त्याचा खात्मा करायचा. या शोधात मानवी मनांतील अरण्ये आणि त्यातील प्रत्येक पात्राची सृष्ट-दुष्ट धाव….एक आंतरिक तर एक बाह्य तर कधी दोन्हीतही संघर्ष…
कोण यशस्वी होते या लढ्यात?
खरे तर कोणीही नाही. पण ही कादंबरी म्हणजे एकोणिसाव्या शतकातील एक सर्वोत्कृष्ठ मित्थकथा आहे. या कादंबरीला नोबेल मिळाले नाही…(चित्रपट मात्र निघाला तो मी पाहिलेला नाही) पण याच कादंबरीची भुतावळ अर्नेस्ट हेमिंग्वेंवर उतरली…आणि सिद्ध झाली एक अत्यंत छोटी पण महाकादंबरी….तिचे नांव “Old man & The Sea”! ही कादंबरी मोबी डिकची एकार्थाने प्यरोडी आहे. मोबी डिकचा अदृष्य पातळीवर वावरणारा तत्वज्ञानाचा जो गाभा आहे तोच पकडत हेमिंग्वेंनी एका पोराला आपल्या अजरामर जिद्दीचे दर्शन घडवण्यासाठी एक देवमासा मारायचा पराक्रम घडवत मृत देवमाशाला सांगाडा म्हणून का होईना, किनारी आणेपर्यंतचाएका जर्जर वृद्धाचा संघर्ष टिपला. मानवी जिद्दीचे, अपयशांतीलही भव्यतेचे अजरामर दर्शन घडवले. मेल्व्हिल काय…हेमिंग्वे काय…जीवनाला निर्वस्त्र भिडनारे साहित्यिक.
पु.लं. नी “एका कोळियाने” नांवाने हेमिंग्वेचा अनुवाद कधीतरी साठ-पासठच्या दरम्यान नितांतसुंदर केला होता…ती आवृत्ती ९५-९६ सालापर्यंत तरी संपलेली नव्हती. “राक्षस” ची आवृत्ती परत काढावी असा माझा मानस होता…तोवर पाबळचे नेहरू वाच्नालय कोठे गेले याचा पत्ता लागला नाही…अन्यत्र शोधायचा प्रयत्न केला…यश आले नाही.
पण मला नेहमीच प्रश्न पडे…आमचे कोळी अशाच वेगळ्या प्रकारच्या का होईना जीवनानुभवांतून जात असतील. त्यांनी लिहिले असते तर? मी माझे (आता दिवंगत) मित्र प्रशांत पोखरकरांना कोकणात मासेमार वस्तीवर दोन-चार महिने, त्यांच्यासोबत मच्छीमार नौकांवर जात त्या अनुभ्वांतून, दंतकथांतून कादंबरी लिहायचा प्रस्ताव ठेवला होता. (अजुनही एक होता…पण त्याबद्दल नंतर…) अनिल जोशी या माझ्या रत्नागिरीतील पत्रकार मित्राने पोखरकरांसाठी मच्छीमारांच्या योग्य वस्त्या शोधल्याही होत्या…पण दुर्दैवाने पोखरकरांचा अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. राहिले ते राहिलेच!
असो. “गतं न शोच्यं” असे म्हणतात. आजही मराठी किना-यांच्या थरारक कथा येवू शकतात…जीवनाचे सागरव्यापी रूप घेत!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.