आर्यवाद, बहुजनीय चळवळीची फलिते आणि महाराष्ट्र

संजय सोनवणी

Posted: 19 Mar 2018 10:25 PM PDT

(महाराष्ट्र प्रबोधिनी आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र इतिहास परिषदेत मांडलेले विचार.)
मिथक निर्मिती आणि तिचा वापर भारतीयच करतात असे नाही. युरोपनेही प्रबोधन काळत एक वंशवादी मिथक बनवले. ते म्हणजे आर्य मिथक. आणि ते का निर्माण केले तर केवळ युरोपियनांचा तुलनेने अर्वाचीन असलेला इतिहास पार मागे नेण्यासाठी आणि आम्ही संस्कृतीचे निर्माते आहोत हे जगावर बजावण्यासाठी! या कार्यासाठी युरोपियन विद्वानांच्या पिढ्यामागून पिढ्या खपल्या. आर्य सिद्धांत वांशिक आधारावर नसला तरी भाषिक आधारावर जीवंत ठेवलेला आहे तो आहेच. या वंशिक आणि श्रेष्ठतावादात भारतातीलही तथाकथित “आर्य” अतिउत्साहाने उतरले होते आणि त्या वैदिक आर्यांचे मूळ पार आर्क्टिक प्रदेशात शोधू लागले होते. त्यातुनच मग द्रविड वंश/भाषा गट आणि मुलनिवासी हे नवी मिथके जन्माला घातली गेली. हेतू अर्थात एकच….श्रेष्ठत्वतावाद आणि वर्चस्ववाद!
प्रबोधनकाळाने जगाला अद्वितीय गोष्टी दिल्या. ज्ञान, विज्ञान व अभिव्यक्तीची क्षितीजे अमर्याद विस्तारली पण याच काळाला एक काळीकुट्ट किनार आहे व ती म्हणजे आर्यवंश श्रेष्ठत्वता वादाचा जन्म. हितलरने याच सिद्धांताचा गैरफायदा घेत लक्षावधी ज्युंची कत्तल केल्यानंतर हाच वाद नव्या नांवाने आणला गेला व तो म्हणजे पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणा-यांचा गट व त्यांची विस्थापने. केवळ नांव बदलले तरी अर्थ तोच राहिला.
याचे कारण म्हणजे युरोपियनांना सेमेटिक वंश गटाशीची सांस्कृतीक मुळे तोडायची होती. जर्मनांना जर्मनांच्या सांस्कृतीक एकीकरणासाठी “जर्मननेस” शोधायची गरज होती. डॆव्हीड ह्युमसारख्या अठराव्या शतकातील श्रेष्ठ तत्वज्ञाने “गोरेतर सारेच हीण आहेत” असे स्पष्ट प्रतिपादित केले. काहींची मजल तर काळे हे युरोपियन व एप्सच्या संकरातून निर्माण झालेले निर्बुद्ध आहेत अशी मांडणी करण्यापर्यंत मजल गाठली. यात सेमिटिक नाळ तोडण्याचे प्रयत्न सुरु होतेच. भारत हीच आर्यांची मुळभुमी आहे असे मानण्याकडे या काळात कल होता. त्यासाठी व्होल्तेयरसारख्या तत्ववेत्त्याने तर चक्क भारतीय ब्रह्म आणि अब्राहमात साधर्म्य शोधत बाप्पा अब्राहम हा भारतीय होता अशी मांडणी केली. (वर्तक अथवा ओक भारतातच नसतात!)  रेनान या फ्रेंच विद्वानाने येशु ख्रिस्त हा सेमिटिक नव्हे तर “आर्य” होता असे प्रतिपादित केले. थोडक्यात एनकेनप्रकारेन युरोपातील धर्म-संस्कृतीचे मुळ मुळात सेमिटिक नाही हे त्यांना सिद्ध करायचे होते व आर्य सिद्धांत त्यासाठी आणला गेला.
पण पुढे भारत ही आर्यांची मुळभुमी हे अमान्य करण्याची लाट आली. याला कारण ठरला आर्य संकल्पनेला वंश सिद्धांताची जोड देणारा म्यक्समुल्लर. त्याने कलकत्त्यातील रिक्षा ओढणारे आणि बंडातील शिपाई हे आर्य कसे असु शकतील असा प्रश्न उपस्थित केला. युरोपियन विद्वानांनी लगेच आर्यांचे मुळस्थान युरेशियात शोधायची मोहिम सुरु केली. हिटलरनंतर आर्य हाच शब्द धोकेदायक वाटु लागल्याने आर्यभाषा गट किंवा पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणारे, त्यांचे मुलस्थान आणि त्यांची विस्थापने याकडे मांडणीची दिशा वळाली. भारतात टिळकांसारख्या विद्वानांनीही आर्यांना उत्तर ध्रुवाच्या निकट शोधले. आर्य सिद्धांतामुळे भारतातही मोठी उलथापालथ झाली. उत्तरेतील आर्य व दक्षीणेतील द्रविड अशी सरळ विभागणी होत त्याचे सांस्कृतीक व राजकीय पडसाद उमटले. प्रसंगी हिंसा तर विभाजनवादाचा डोंबही उसळला. आजही त्याचे निराकरण झाले नाही. याच सिद्धांतातुन मुलनिवासीवादही जन्माला आला. महात्मा फुलेंनी आर्यभट आद्य आक्रमक व त्यांनी बळीस्थानावर (भारतावर) आक्रमण केले अशी मांडनी करुन प्रतिक्रांतीचा पहिला धक्का दिला.
मुळात आर्य नावाचा वंश पृथ्वीवर कधीही अस्तित्वात नव्हता. किंबहुना वंश सिद्धांतच अशास्त्रीय आहे असे जगातील सर्वच मानव आनुवांशिकी शास्त्रज्ञ मानतात. युनेस्कोने १९५२ साली जागतीक मानववंश शास्त्रज्ञांची बैठक घेऊन एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात पृथ्वीवरील समस्त मानवजाती ही होमो सेपियन या एकाच उत्क्रांत मानवी प्रजातीचे वंशज आहेत व जेही स्थानिक रंगादि भेद दिसतात ते पर्यावरणीय कारनांनी हे स्पष्ट केले. तरीही वंश सिद्धांत आर्य भाषागट सिद्धांताच्या माध्यमातून जीवंत ठेवला गेला तो आजतागायत. पण हा इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत हा विसाव्या शतकातील सर्वात मोठा फ़्राड आहे. भाषांच्या वितरणासाठी मानवी स्थलांतरांचीच आवश्यकता नसते तर भुशास्त्रीय कारणेही समान भाषा निर्मितीचे कारण असू शकतात. तरीही स्टीव्ह फार्मरसारखे विद्वान आजही आर्य स्थलांतर सिद्धांताचा पाठपुरावा करीत असतात. भारतीय सांस्कृतीक/सामाजिक/राजकीय इतिहासाची मांडणीही त्याच आधारे झाली. थोडक्यात ती खोटी व दिशाभुल करणारी मांडणी झाली.
याची मिथकीय प्रतिक्रिया म्हणजे आधी “आक्रमक आर्य” म्हणवत गौरवाने स्वत:कडे पाहणारे वैदिक लोक युरोपियनांच्या पुढे पाऊल टाकत वैदिक आर्य हे मुळचे भारतातलेच हे सांगून लागले. सिंधू संस्कृतीचे विध्वंसक वैदिक ते सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्य असे सिद्धांत भारतात हिरिरीने जन्माला घातले जाऊ लागले. आर्य भारतातुनच (हरियानातून) पश्चिमेकडे गेले व युरोपपर्यंत जात भाषा आणि संस्कृती पसरवली असे सिद्धांत मांडु लागले. आधीचा भारतातील धार्मिक श्रेष्ठत्ववाद होताच…त्याला युरोपियन सिद्धांतनाने त्यांना बळ दिले. याही मिथकाला कोणताही शास्त्रीय आधार नव्हता तर जे पुरावे आक्रमण सिद्धांतासाठी वापरले जात होते तेच पुरावे प्रसंगी तोडमोड करत अथवा त्या पुराव्यांनाच नवा अर्थ देत “भारताबाहेर” हा सिद्धांत बनवण्यात आला.
या आर्य सिद्धांताच्या झटापटीत साहजिकच अनार्यांना हीन लेखण्याचा प्रयत्न होत होता. आर्यांनीच आपले मुळ स्थान शोधावे, आपणच सर्व संस्कृती/भाषेचे जनक आहोत हे बजावून व तेही अशास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे सांगावे आणि अनार्यांनी (म्हणजेच अवैदिकांनी) गप्प बसावे असे तर होऊ शकणार नव्हते. तसे झालेही नाही. मुलनिवासी सिद्धांताचा जन्म त्यातुनच झाला.  एका मिथकातून किती मिथके निर्माण होतात त्याची ही फार छोटी झलक आहे. यात ज्ञान, विज्ञान, इतिहासाचे अन्वेषन व त्या आधारित मांडनीची आवश्यकता नसते हे उघड आहे. किंबहुना छद्म विज्ञानाचाच उद्रेक यात होत जातो. मिथके मानवी भावनांना कुरवाळण्यासाठी सहायक ठरली तरी त्यांचा अतिरेक विनाशकच असतो याचे भान मानवी समाजाला आलेले आहे असे नाही. भिमा कोरेगांव सारख्या मिथकांतून आत्मभान मिळवून देणे हा हेतू असला तरी आत्मभानाची जागा सामाजिक तिढ्याने व विद्वेषाने घेतली असल्याचे आपल्याला दिसेल. मानवी वंशाचा इतिहास अर्थातच या अभिनिवेषी मिथकांतच हरवला जाणे स्वाभाविक होते! बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात हा वांशिक नव्हे तर धार्मिक विभेदाचा संघर्ष आहे असे लक्षात आले असले तरी त्यांनी नंतर या सिद्धांताचा पाठपुरावा केला नाही.
पण वास्तव हे आहे की वैदिक धर्म भारतात येण्यापुर्वीही सिंधु काळापासुन भारतात स्वतंत्र सुफलनविधी युक्त तंत्राधारित प्रतिमापुजकांचा शैवप्रधान धर्म होताच. त्याचे विपूल पुरावे उपलब्ध आहेत. आजही हिंदू हाच धर्म पालतात. त्यांच्या धर्माचरनावर कसलाही वैदिक प्रभाव नाही. त्यांचा धर्म जसा होता तशीच समाजव्यवस्था व राज्यव्यवस्थाही होती. विदेघ माथवाच्या नेतृत्वाखाली भारतात आलेल्या मुठभर वैदिक आश्रीतांच्या येथील व्यापक संस्कृतीचा ताबा घेणे शक्यच नव्हते. भारतात आलेल्या या वैदिकांना प्रथम सिंधु नदीकाठच्या शूद्र टोळीने आश्रय दिला. या टोळीचे उल्लेख महाभारत, विष्णुपुराण ते डायोडोरससारखा अलेक्झांडरचा इतिहासकारही करतो. पुढे वैदिकांनी एका प्रथम भेटलेल्या टोळीच्या नावावरुन समस्त भारतातील जमातींना सरसकट शूद्र संबोधले. प्रत्यक्षात भारतात त्यावेळी असंख्य टोळ्या वावरत होत्या. याचे पुरावे मनुस्मृती जशी देते तसेच अंगविज्जा हा कुशानकालीन ग्रंथही देतो. जेही वैदिक धर्माचे नव्हते त्यांना शूद्र अथवा म्लेंछ म्हणायची पद्धत वैदिकांनी रुढ केली. त्यांच्या दृष्टीने शक, हुण, कुशाणही शुद्रच होते. म्हणजेच जेही वैदिक नव्हते ते शुद्र होते. म्हणजेच शुद्रांचा धर्म वेगळा होता. तो आजही आहे. यज्ञ प्रधान वैदिक धर्म येथे काही प्रमानात धर्मांतराने पसरला. दक्षीण भारतात दुस-या शतकापर्यंत या धर्माला स्थानही नव्हते. मनुस्मृती मुळात वैदिकांच्या अंतर्गत व्यवहारांचे नियमन करण्यासाठी इसफु आठवे शतक ते इसवी सनाचे चवथे शतक या विस्तृत काळात लिहिली गेली. याच काळात असंख्य शुद्र (म्हणजे अवैदिक) राजे झाले. ही स्मृती लागु असती तर असे कसे झाले असते हा साधा प्रश्न आमच्या विद्वानांना पडला नाही. पण तरीही मनुस्मृती समस्त हिंदुंसाठी लिहिली हे अजुन एक मिथक ब्रिटिश काळात जन्माला आले आणि त्याचे बळी आधुनिक हिंदू ठरले.
वर्ण ही वैदिक धर्माची व्यवस्था. ही व्यवस्था उतरंडीची व कठोर होती. जाती या मुळच्या व्यवसायाधिष्ठीत. सैल आणि परिवर्तनीय. लोखंडाचा शोध लागत नाही तर लोहार येणार कोठुन? हाच प्रश्न सर्व जातींबाबत लागु आहे. दहाव्या शतकापर्यंत तरी जातीबदल सहज होता. तो नंतर अनेक कारणांनी कठीण झाला तरी अशक्य नव्हता. वर्ण आणि जाती यांच्यात काहीएक संबंध नसता तो जोडल्यामुळे अजुन एक गोंधळ निर्माण झाला आणि हिंदुंमध्ये नव्या न्युनगंडाची सोय लावण्यात आली. हिंदू धर्माचा जो पाया त्या समताधिष्ठित तंत्रांना बदनाम करण्यात आले. सांख्यादि तत्वज्ञानावर वैदिक कलमे करीत त्यांना हिंदुंपासुन दूर नेले. आणि हे काम वैदिक धर्मात घुसलेल्या धर्मांतरीत हिंदुंनीच केले हे अधिक वाईट झाले. हिंदुंनी या धार्मिक आक्रमनाला प्रबळ विरोध केला नाही याला हे धर्मांतरीत कारण आहेत.
आज बहुजनवादी चळवळी अपयशी ठरत आहेत कारण त्याही मिथकांत मग्न आहेत. जातीसंस्थेचे जन्मदाते, संस्कृतची निर्मिती, भारतीय संस्कृतीचे मुलस्त्रोत वगैरे महत्वाच्या बाबीच मुळात वैदिक आर्य श्रेष्ठत्वतावादी मिथकांच्या गडद धुक्यात हरवलेल्या आहेत आणि त्यामुळे अज्ञानमुलक वादांची आपल्याकडे कमतरता नाही. खोटे भ्रम. खोटे वर्चस्ववाद आणि खोटे न्युनगंड यांचीच आपल्या समाजव्यवस्थेत चलती असल्याने चळवळी आधुनिक काळात एकाही सामाजिक समस्येचे ख-या अर्थाने निर्दालन करू शकलेल्या नाहीत. ब्राह्मण-ब्राह्मणेतर अथवा आर्य-अनार्य हा वाद नसून तो सर्वस्वी धार्मिक भेदातून निर्माण झालेला वाद आहे. वैदिकांसाठी वेदोक्त आणि हिंदुंसाठी (शुद्रांसाठी) पुराणोक्त हे धार्मिक विभाजन स्पष्ट आणि उघड आहे असे असुनही दोन धर्मांना एकच समजल्याने असंख्य सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. मुळात दोन धर्म व त्यांचे सामाजिक विचार वेगळे आहेत हे समजावून घेणे ही तातडीची गरज आहे.
आर्यवाद हा भारतीयांसाठी खरे तर वैदिक वाद आहे. तो एक स्वतंत्र धर्म आहे. हा संघर्ष वांशिक नाही आणि जातीयही नाही. वेदपुर्व कालापासून चालत आलेला हिंदू धर्म आणि वैदिक धर्म यातील हा संघर्ष आहे. आणि त्याचे निराकरण धार्मिक वास्तव समजावून घेण्यानेच होईल. वर्ण व जातींचा काहीएक संबंध नसल्याने सर्व जाती समान आहेत आणि त्यांचा समतेनेच सन्मान करणे हिंदुंसाठी आवश्यक आहे. आज बहुजनीय चळवळींना आपल्या तत्वज्ञानाचा मुळापासुनच विचार करावा लागणार आहे तो यामुळेच.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.