शाळेच्या दहावीच्या बॅचच्या व्हॉटसअप ग्रुपवर हा फोटो काल आला. तो निरखून पाहताना हळू हळू शाळा आणि तिथे घालविलेल्या दहा वर्षातील आठवणी जाग्या होत गेल्या.
या फोटोतील सर्वजणी माझ्या भोरच्या शाळेतील त्यावेळच्या शिक्षिका. त्यातल्या सहस्त्रबुद्धे बाई, कानडे बाई, चिरपुटकर बाई व वाळिंबे बाई व खाली बसलेल्यांपैकी मधल्या बापट बाई असाव्यात. बाकीच्या दोघी कोण हे ओळखता येईना.
मी या शाळेत शिकलो ते 75 ते 85 या काळात. बाई आम्हाला शिकवत होत्या त्यावेळपेक्षा खूप आधीचा त्यांच्या तरुणपणातला, किंबहूना त्यांनी या शाळेत शिकवायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या काही वर्षातला हा फोटो असावा. आम्ही शिकायला सुरवात केली त्यावेळी ही शाळा पुर्ण ब्राम्हणी संस्काराखाली असणारी होती. पण बहुजनांचा वेगाने शिक्षक पेशात प्रवेश होत होता. आम्ही बाहेर पडलो त्यावेळेपर्यंत हे ब्राम्हणी वळण जवळ जवळ संपलेले होते. या वाटचालीत काही कमावले तर काही गमावले.
शाळेचे संस्थापक भोरचे रामभक्त राजे. त्यांनी उभारलेली जुन्या काळातील राजवाड्यासारखी भव्य इमारत. संस्कृत भाषेतील रामरक्षेतील प्रार्थना आणि सरस्वती वंदनेने शाळेला सुरवात व्हायची. त्यानंतर प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत. त्यावेळेस राष्टगीतावेळी जशी देशभक्ती उंचबळून यायची तशी आता येत नाही. त्यावेळेस देश नीट कळला नव्हता बहुतेक.
खर सांगायच तर या शाळेच आणि माझं फारस काही जमल नाही. फार उत्साहाने मी शाळेत गेलोय अस मला फारस कधी आठवत नाही. पण तिचे भव्य रुप मात्र आजही स्मरणात आहे. मोठमोठे वर्ग, राजवाड्याचा फिल देणारी इमारत, भलेमोठे ग्राऊंड असलेली ही शाळा यापुढील काळात फार क्वचित बघायला मिळेल. त्यावेळी मात्र या शाळेने मला एक न्यूनगंडाचीच भावना दिली. माझा वर्ग सगळा अभ्यासात हुशार मुलांनी भरलेला होता. त्यांच्याइतका हुशार मी होऊ शकत नव्हतो. जे मार्क मला पडत होते ते घरच्यांचे समाधान करत नव्हते. शाळेतील काही सोडले तर शिक्षकांच्या नजरेतही मी नव्हतो. शेकडो शिकतात त्यातलाच हा एक अशी भावना असावी. हा दुर्लक्षित भाव मला पसंत पडत नव्हता. हे सगळ झटकून टाकण्याऐवढा धीटपणाही माझ्याकडे नव्हता. त्यामुळे आज वाटतं आपल्याला ही शाळा मिळाली पण तिचा आनंद घेण्यात आपण फार कमी पडलो.
थोडस या फोटोतल्या शिक्षिकांविषयी,
यातही माझ्या मनात थोडे नकारात्मक भावच आहेत. सहस्त्रबुद्धे बाई, कानडे बाई, वाळिंबे बाई व बापट बाई आम्हाला प्रत्यक्ष शिकवायला होत्या. आजच्या काळापेक्षा त्यावेळी शिक्षकांबद्दल खुपच आदरभाव असायचा. आणि आपल्या पुर्वीच्या पिढीपेक्षा आपण त्यांना कमी आदर दाखवतो अशी अपराधी भावना मनात असायची. या शिक्षिका अर्थातच ब्राम्हण, शिवाय संघाचे संस्कारही असणाऱ्या. त्यामुळे `इतरां` विषयी थोडीशी तु्च्छता आणि काही ब्राम्हणी अहंकार नक्कीच होता.
एक प्रसंग मला आठवतो. पैगंबर मक्केहून मदिनेला पळूून गेले असा उल्लेख पाठ्यपुस्तकातील इतिहासाच्या पुस्तकात होता. त्याऐवजी त्यांनी स्थलांतर केले असे बदल करावा असा शाळाखात्याकडून निघाला. त्यावेळी शासकीय प्रतिनिधी आमच्या वर्गात आला. त्याने सर्वांना इतिहासाची पुस्तके उघडून तो धडा काढायला सांगितला. त्यातील पळून गेले हे शब्द खोडून स्थलांतर केले हा लिहायला सांगितला. त्यावेळी वर्गात बाईही होत्या. ते प्रतिनिधी गेल्यावर बाई म्हणाल्या, ” बघा, `त्यांच्या
` हट्टासाठी काय काय करायला लागतय. ” नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या वर्गात एक बागवान नावाचा विद्यार्थीही आहे. त्यांनी स्वत:ला सावरून बागवान बसायचा त्या बाकाकडे बघितले. सुदैवाने बागवान त्या दिवशी आला नव्हता. मला त्या वयातही आपल्याच एका विद्यार्थ्याला बाई इतरांपेक्षा वेगळ समजतात हे पाहून धक्काच बसला.
असे काही प्रसंग असले तरी या शाळेने आणि शिक्षकांनी आम्हा सगळ्यांना खुप प्रेम दिले हे नक्कीच. शिक्षकी पेशा हा व्यवसाय नाही तर व्रत आहे मानणारे हे शिक्षकांच्या संपत चाललेल्या पिढीचे प्रतिनिधी होते. आपले विद्यार्थी अभ्यासात कमी जास्त होतील पण सुसंस्कारी झाले पाहिजेत ही तऴमळ असणारे हे शिक्षक होेते. दरमहा मिळाणाऱ्या पगारापेक्षा जास्त महत्व आपल्यापुढे असणाऱ्या विद्यार्थ्याला शिकविण्यास देणारी ही माणसे होती.