सखे आणि सोबती – जमा

more j.m

शरद पवारसाहेबांच्या आणखी एका कार्यकर्त्याचे हे व्यक्तिचित्र,  दिलखुलास स्वभावाच्या या माणसाच्या नजरेतून दिसणारे पवारसाहेब आणखीच आपलेसे वाटतात……..

प्रसंग पहिला इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यानंतर लगेचच लोकसभेची निवडणूक लागली. पवारसाहेब विरोधी पक्षात होते. त्यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. त्याचदरम्यान त्यांना राज्यपालांनी त्यांच्या बंगल्यावर चहापानासाठी बोलावले. सोबत एका कार्यकर्त्याला घेऊन साहेब गेले. राज्यपाल होते शंकरदयाळ शर्मा, ते साहेबांना म्हणू लागले, शरद, हे लोकसभा लढविण्याचे काय ठरवले आहेस तू? महाराष्ट्र तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. तु दिल्लीत जाण्याचा विचार कशासाठी करतो आहेस. त्यातून इंदिरा गांधीच्या हत्येमुळे कॉंग्रेसच्या सहानुभुतीची लाट आहे. त्यात तू निवडून येशील का? सगळे संभाषण इंग्रजीतून चालले होते. साहेब म्हणाले, या कार्यकर्त्याला समजवा. राज्यपालांनी आपल्या पीएला बोलावले व सर्व संभाषण मराठीतून त्या कार्यकर्त्याला सांगायला सांगितले. शेवटी विचारले, साहेब निवडून येतील याबद्दल नवापैसा जरी शंका असली तरी ही निवडणूक लढवू नका. कार्यकर्ता मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, अहो नवा पैसा काय म्हणता, मी 101 टक्के खात्री देतो, ही निवडणूक पवारसाहेबच जिंकणार.

प्रसंग दुसरा – हीच निवडणूक लढविण्याबाबत राज्यातील कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. साहेब सांगत होते. ही निवडणूक लढवावी की नाही याबाबत तुमची स्पष्ट मते सांगा. मला थोडी काळजीच वाटते. वातावरण इंदिरा गांधीच्या हत्येमुळे कॉंग्रेसबाबत सहानुभुतीचे आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आपण निवडून येऊ का? त्यावर इंदापूरचे संपतराव मोहिते म्हणाले, साहेब, आपण पडला तर ते जगातील नववे आश्चर्य असेल.

प्रसंग तिसरा – याच इंदापूर तालुक्यातील दहाबारा कार्यकर्ते काश्मिरला निघाले होते. जम्मुपर्यंत पोचले, फारुख अब्दुल्ला यांच्या प्रचारासाठी पवारसाहेबांची जम्मुत सभा होती. सगळेजण या सभेसाठी गेले. सगळ्या शिखांच्या गर्दीत आपली मराठमोळी माणसं साहेबांनी बरोबर ओळखली. त्यांनी बोलावून घेतले. कसे आला, कुठे जाणार याची चौकशी केली. नंतर स्वत:चे हेलिकॉप्टर रद्द करायला सांगितले. या कार्यकर्त्यांबरोबर जीपने काश्मिरपर्यंत गेले. जागोजागची निरनिराळी ठिकाणे दाखवली. श्रीनगरमध्ये जेथे स्वत:ची उतरण्याची व्यवस्था होती, त्या हॉटेलमध्येच त्यांचीही व्यवस्था केली.

असे अनेक प्रसंग इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीचे ज.मा.मोरे सांगतात. पवार साहेबांचा विषय निघाला की त्यांचे भान हरपते. पवारसाहेबांनी तुम्हाला काय दिले, या प्रश्नावर मात्र मिश्किलपणे `गुढगेदुखी दिली` असे उत्तर येते. या उत्तराबरोबरच निमगाव ते पुणे आणि जळगाव ते नागपूर पायी दिंडीची हकिगत सांगायला सुरुवात होते. या दिंडीतही साहेब सर्व कार्यकर्त्यांबरोबर सर्व काळ पायी चालत होते हे मात्र ते आवर्जुन सांगतात.

गुऱ्हाळावर मते

मोरे इंदापूरच्या निमगाव केतकीचे. राजकारणाचा वारसा वडिलांकडून आलेला. वडील राजकारण, समाजकारणातील इंदापूर तालुक्यातील महत्वाचे नाव. एकदा विधानसभेला गावाचे मतदान कोणाला द्यायचे यावर गावाची मिटींग सुरु होती. वडिलांनी मत मांडले, बावड्याचा शंकरराव पाटील म्हणून उमेदवार उभा आहे, त्याला मते द्यावी. मुलगा चांगला आहे, शिवाय घरचे गुऱ्हाळ आहे, आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने भ्रष्टाचार करणार नाही. या युक्तिवादावर गावाची मते शंकरराव पाटलांना मिळाली. मोरे या मिटींगमध्ये उपस्थित होते. घरी आल्यावर वडिलांना म्हणाले, गुऱ्हाळ बघून मत देताय, शेतकऱ्यांच्या पक्षाचा उमेदवार तुळशीदास जाधव उभे आहेत. त्यांचा विचार करत नाही.

यानंतरही गावाची मते शंकरराव पाटलांनाच मिळाली. मात्र याच शंकरराव पाटलांशी मोरेंचा सततचा राजकीय संघर्ष होत राहिला. योग्य कार्यकर्ता ओळखायचा, त्याला बळ द्यायचे ही शरद पवारांची राजकीय नीती. मोरेंचा शंकररावांशी होत असणारा राजकीय संघर्ष पवारसाहेब जवळून पहात होते. मोरेंना त्यांनी बोलावून घेतले. त्यांना सांगितले, आपण बरोबर काम करू. तुम्हाला काय मदत पाहिजे ते सांगा. मोरेंनी गावासाठी पाणी मागितले. साहेबांनी गावासाठी पाणीयोजना मंजूर केली. 77 साली निमगावची ही पाणीयोजना 1 महिन्यात मोरेंनी पुर्ण करून घेतली. त्याच्या उद्घाटनासाठी पवारसाहेबांना बोलावले. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. यानंतर इंदापूर तालुक्यातील पवारांचा कार्यकर्ता म्हणजे ज.मा.मोरे हे समीकरण पक्के झाले. सतत तीन विधानसभेच्या निवडणूका शंकरराव पाटील यांच्याविरोधात ज.मा.मोरेंनी लढविल्या. प्रत्येकवेळी 2500 ते 3000 मतांनी पराभव झाला. पण हिंमत कधीच हरली नाही. लोकांशी संपर्क कधीच तोडला नाही. या साऱ्यात पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते शरद पवार.

सचिवालयात शिपाई करा

पवारसाहेबांचा सततचा सहवास लाभला, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साहेबांबरोबर जाण्याचा योग आला. त्यातून मोरेंचा स्वभाव हसतमुख. सतत काहीतरी विनोद करत राहणार. साहेबही दिलखुलास दाद देणार. एकदा मुख्यमंत्री असताना मोरेंना म्हणाले, जमा, तुम्हाला अशी कोणती जागा देऊ, ज्यामुळे मी बोलावताच लगेच तुम्ही येऊ शकाल. मुख्यमंत्रीपदावर खुप टेँन्शन असते. तुमच्याबरोबर गप्पा मारल्या तर टेन्शन कमी होईल. हजरजबाबी मोरेंनी लगेच उत्तर दिले, साहेब, मला सचिवालयात शिपाई करा, तुम्ही बेल वाजवली की लगेच हजर. यानंतर काही काळाने साहेबही मुख्यमंत्री राहिले नाहीत. त्यानंतर साहेबांची भेट झाल्यावर मोरे पुन्हा म्हणालेच, साहेब, ते सचिवालयात शिपायाचे काम राहिलच की.

साहेब विरोधी पक्षात असतानाची गोष्ट. पुणे जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष टिकतच नव्हता. ज्याला जिल्हाध्यक्ष करावे तो काही महिन्यात सत्ताधारी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करी. दोनतीनदा असे झाल्यावर असे झाल्यावर साहेबांनी ठरवले, आता अशा कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष करायचे जो काही झाले तरी पक्ष सोडून जाणार नाही. यासाठी पहिले नाव साहेबांना आठवले ते ज.मा.मोरेंचे. .मा.मोरेंनी 11 वर्ष जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. सतत कार्यकर्त्यांशी संपर्क, गावोगाव भेटी देत राहिले. फारसा पैसा नव्हता, साधने नव्हती. फक्त एकच बळ होते ते म्हणजे शरद पवार. मागितला त्या वेळेस साहेबांनी वेळ दिला. याच बळावर जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात घेतली. साहेबही पदाचा मान राखीत. पुणे जिल्ह्यातील एका तालुक्यातील आमदारकीचे तिकीट मोरेंनी नक्की केले. त्या तालुक्यातील लोकांना ते पसंत नव्हते. ते पवारसाहेबांकडे गेले. पवारसाहेब म्हणाले, जिल्हाध्यक्षाला विचारल्याशिवाय मी बदल करणार नाही. त्यांनी मोरेंना फोन लावला. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांचा होकार घेतला, त्यानंतरच तिकिट बदलले. सत्ता असो किंवा नसो. शरद पवार या नावाला एक वलय होते. विश्वास होता. त्याच बळावर विधानसभेला एस कॉंग्रेसचे 57 आमदार निवडून आले, त्यापैकी 7 पुणे जिल्ह्यातील होते.

लोकांचे ऐकून घेण्याची साहेबांची क्षमता अफाट. एखाद्या सभेला साहेब आले की व्यासपीठावर बसत. चार तास, पाच तास कार्यकर्त्यांची भाषणे होत. साहेब लक्षपूर्वक ऐकत असत. कार्यकर्त्यांना आग्रह करून बोलायला उभं करीत. सर्वांचे ऐकल्यावर साहेब भाषणाला उभे राहत. कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. त्याला भाषण करता आले पाहिजे यावर कटाक्ष असे. अनेकदा कार्यकर्त्यांना मोरेंचे उदाहरण देत. कार्यकर्ता कसा असावा, कसे काम करावे हे पहायचे असेल तर इंदापूरच्या ज.मा.मोरेंकडे जा. ते कसे काम करतात ते पहा असे सांगत असत.

साहेंबांशी बोलताना मोरे कोणताही आडपडदा ठेवत नाहीत, मनात येईल ते बोलणार. एकदा साहेबांसोबत हेलिकॉप्टरने जाण्याचा योग आला. विमानतळावर साहेबांसोबत गेले. हेलिकॉप्टर तयार होते. पायलटची पत्नी त्याच्यासाठी डबा घेऊन आली होती. तिने सहज विचारले, आज कोणाला घेऊन जाणार आहे. पायलटने शरद पवारांचे नाव सांगितल्यावर ती म्हणाली, मला त्यांना भेटायचे आहे. साहेब येईपर्यंत ती थांबली. साहेब आल्यावर पुढे येऊन नमस्कार करून म्हणाली, “मला ओळखलं का, तुम्ही मला बघायला आला होता.”

साहेबांच्याही लक्षात आले, ते म्हणाले, “हो, तुम्ही त्या कर्नलसाहेबांची मुलगी ना ? “ साहेबांनी नंतर सगळी हकिगत सांगितली ती अशी पवारसाहेब त्या मुलीला बघायला गेले. मध्यस्थ होते श्रीनिवास पाटील. मुलीच्या वडिलांनी विचारले, काय करता. उत्तर आले मी आमदार आहे. मुलीचे वडील म्हणाले, ते नाही, पोटापाण्याची सोय काय . पवारसाहेबांनी उत्तर दिले महिन्याला तीस रुपये भत्ता मिळतो. मुलीचे वडिल म्हणाले, “अहो, माझ्या मुलीचा दररोजचा खर्च तीस रुपये आहे. तुम्ही माझ्या मुलीला काय सांभाळणार. हे जमणार नाही.” ऐवढ्यावर पवारसाहेब व श्रीनिवास पाटीलांना परत यावे लागले.

ही हकिगत ऐकल्यावर मोरे त्या बाईंना म्हणाले, वडिल आहेत का अजून. तिने हो म्हणाल्यावर म्हणाले, त्यांना सांगा, आज तुमच्या जावयाला पवारसाहेंबाची ड्युटी होती ते. तुम्हाला सांगायला जमणार नसेल तर मी येतो घरी.

अशीच एकदा विधानसभा निवडणूकीचा प्रचार सुरू होता. मराठवाड्यात कुठेतरी मोठी सभा झाली. हजारो माणसे सभेला रात्री 10 नंतरही जमली होती. सभेनंतर जेवण वैगेरे करून गेस्टहाऊसवर जायला रात्रीचे बारा वाजले. जमा आणि काही कार्यकर्ते एका खोलीत झोपायला गेले. पवारसाहेब त्यांच्या खोलीत गेले. रात्री दोननंतर साहेब पुन्हा आले. म्हणाले, तुम्ही झोपला काय? अशी मोठी सभा झाली की मला झोपच लागत नाही. एवढ्या माणसांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. यांच्या अपेक्षा आपण केव्हा पूर्ण करणार या विचाराने माझी झोप उडून जाते.

सदैव लोकहिताचा विचार करणाऱ्या या नेत्यावर म्हणून जमा देवासमान मानतात.

1 thought on “सखे आणि सोबती – जमा”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.