नशिब

अरेबियन नाईटसमधील ही गोष्ट सर्वाधिक वाचली गेलेली असावी. एक उत्कृष्ट कथा कशी असावी याचे हे एक उदाहरण आहे…….

एक श्रीमंत माणूस होता. त्याला एकुलता एक मुलगा होता. एके दिवशी सर्व संपत्ती आपल्या मुलासाठी ठेऊन तो माणूस मरण पावला. मुलाच्या हातात सारी संपत्ती आल्यावर त्याने मित्रमंडळी गोळा केली. दररोज पार्ट्यांना सुरुवात झाली. अखेर व्हायचा तोच परिणाम झाला. त्या मुलाकडील सर्व संपत्ती हळूहळू संपत गेली. एके दिवशी त्याच्याकडे त्याच्या घराशिवाय काहीसुद्धा राहिले नाही. सगळे मित्र त्याला सोडून गेले. दररोजच्या जेवणाची भ्रांत पडू लागली. दररोज घराच्या दारात बसून कसातरी दिवस घालवायचा असे त्याचे सुरू होते.

याच वेळेस त्याला एके दिवशी एक स्वप्न पडले. स्वप्नात एक माणूस त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हणाला, ” दिल्लीला ( मुळातल्या कथेतील नाव हे अरबस्थनातील आहे. आपल्या ते अनोळखी वाटेल म्हणून शहराचे नाव बदलले आहे.)जा, तिथे तुझ्यासाठी खुप संपत्ती ठेवलेली आहे. ” आणि त्याला एक घरही दिसले. तो झोपेतून जागा झाला. त्याला वाटले, सध्या आपल्याला पैशाची गरज आहे. त्यामुळे असे स्वप्न आपल्याला पडले असावे. पण दुसऱ्या रात्रीही पुन्हा हेच स्वप्न पडले. पण त्याने तेव्हाही दुर्लक्ष केले. पण दररोजच असे स्वप्न पडू लागले. असा महिना गेला. तो वैतागून गेला. अखेर त्याने दिल्लीला जायचा निर्णय घेतला. तसे येथेही आपले हालच चालले आहेत, तेव्हा दिल्लीला जाऊन यायला काय हरकत आहे, असा त्याने विचार केला.

अर्थातच हातात पैसा नव्हता. त्यामुळे चालत, मिळेल त्याची मदत घेत त्याचा प्रवास सुरू झाला. ( गोष्ट ज्या काळातील आहे, त्यावेळी पेट्रोल, डिझेलचा शोध लागलेला नव्हता, त्यामुळे पायी किंवा बैलगाडी, घोडागाडीनेच प्रवास होत असे.) काही महिन्यांच्या प्रवासानंतर तो संध्याकाळच्या वेळी दिल्लीत पोचला. शहरात फिरत असताना त्याला एक घर दिसले. तेच घर जे त्याला स्वप्नात दिसत असे. तो घराच्या दरवाजाजवळ गेला. दार फक्त ढकलेलेले होते. ते दार ढकलून तो घरात गेला. घरात सगळीकडे अंधार होता. त्या अंधारात चाचपडत दोन पावले पुढे गेला असता त्याचा पाय कशाला तरी अडखळला. काय आहे हे बघण्यासाठी तो वाकला तर त्याचा हाताला काहीतरी ओलं लागले. नीट चाचपडून त्याने पाहिले तर तिथे एक प्रेत पडले होते. त्यातून वाहणाऱ्या रक्ताने त्याचे हात भरले होते. तो घाबरून परत जाऊ लागला. तोवर बाहेरच्या गल्लीतून आवाज येऊ लागले. ” खुन, खुन, पकडा, पकडा” असा आरडाओरडा करत लोक या घराकडेच येऊ लागले. तो घाबरून आतल्या बाजूला पळाला आणि लपून बसला. थोड्याच वेळात ते लो़क घरात आले. सोबत एक पोलीस हवालदारही होता. त्यांनी मशाली पेटवल्या. त्या खून झालेल्या प्रेताची पाहणी केली. तो हवालदार सोबतच्या लोकांना म्हणाला, ”  हा खून आत्ताच झालेला आहे, कोणीही माणूस बाहेर जाताना दिसला नाही, म्हणजे नक्कीत खूनी याच घरात लपलेला असणार. जरा सगळे घर नीट तपासा.

सगळे लोक घरात शोध घेऊ लागले. आता लपलेला तो त्यांच्या तावडीत सापडला. त्यांनी त्याला पकडून जवळच्या पोलीस चौकीत नेला. तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला खरपूस मार दिला. आणि कोठडीत डांबून टाकले. तो स्वत:वरच वैतागला. कशाला आपण त्या स्वप्नाच्या नादाला लागलो आणि येथे येऊन पडलो असे त्याला झाले. आता आपला येथे हकनाक जीव जाणार याची त्याला खात्रीच पटली. तीन चार दिवसानंतर त्याला कोठडीतून बाहेर काढण्यात आले. त्या पोलीस अधिकाऱ्यापुढे नेण्यात आले. त्या अधिकाऱ्याने त्याला समोर बसवले आणि म्हणाला, ” तुला आता भ्यायचे कारण नाही, खरा खुनी आम्हाला सापडला आहे. त्यामुळे तु आता काळजी करू नको. पण मला एकच प्रश्न पडला आहे, की तु त्याच वेळी त्या घरात काय करत होतास. ”  त्याने सगळी कथा सांगितली. स्वप्नाच्या मागे लागून आपण कसे येथे आलो हे ऐकून तो अधिकारी मोठ्यामोठ्याने हसू लागला. हसू आवरून तो त्याला म्हणाला,  ” अरे मुर्खा, ही स्वप्ने खरी थोडीच असतात. आता मलाही दररोज असेच स्वप्न पडते. त्यात मलाही घर दिसते, तेथील चौकात खणल्यावर तुला खुप संपत्ती मिळेल असे एक माणूस सांगत असतो. पण मी गेलोय का त्या स्वप्नाच्या मागे. अरे यात काही खरे नसते. ”

पण आता खरे काय ते त्या तरुणाला कळले होते. तो अधिकारी ज्या घराचे वर्णन करत होता, ते घर त्याचे स्वत:चेच होते. अधिक काही न बोलता त्याने त्या अधिकाऱ्याचे आभार मानून त्याचा निरोप घेतला. पुन्हा तो आपल्या गावी आला. अधिकाऱ्याने वर्णन केलेल्या जागेवर त्याने खणून पाहिले तर खरोखरच त्याला खूप संपत्ती सापडली. त्या संपत्तीच्या आधारावर तो श्रीमंत झाला आणि सुखासमाधानात राहू लागला.

—————————————————————————————————————indexindex

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.