सखे आणि सोबती – भिवा शेलार

 

शरद पवारांचे बालमित्र असलेल्या भिवा शेलार यांचे हे मनोगत. आपल्या या बालपणीच्या मित्राची मैत्र पवारसाहेबांनी आजपर्यंत कसं राखल आहे, त्याची ही कथा…….

दुसरीमध्ये असताना एका वर्षासाठी साहेब आणि मी एका वर्गात होतो. बारामतीतील भिगवण चौकाजवळची त्यावेळची 4 नंबर शाळा. भिगवणचे सय्यद गुरूजी शिकवायला होते. त्यानंतर तिसरीत असताना आईवडील कन्हेरीला गेले. त्यामुळे या शाळेतून कन्हेरीच्या शाळेत गेलो. परंतू ओळख कायम राहिली. त्यानंतर आठवीत बारामतीत मी रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कुलमध्ये होतो व साहेब मएसोच्या हायस्कुलमध्ये होते. त्यावेळी आमचा कब्बडी खेळाचा एकत्र ग्रुप होता. मारुतराव चोपडे, जाधव हे आमचे कॉमन मित्र. मएसोच्या ग्राऊंडवर कब्बडी खेळण्यासाठी आम्ही नेहमी सोबत असू. त्यावेळी साहेबांच्या टीममध्ये मी असायचो. साहेबांनी इंट्री टाकली की तीनचार गडी मारूनच यायचे. त्यांना साथ द्यायला मी असायचो. मला आठवतयं त्या काळात एकदा बार्शीलाही कबड्डी स्पर्धेसाठी एकत्र गेलो होतो.

आठवीची सहामाही परिक्षा झाली. तेव्हा मला प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यामुळे शिक्षण सोडून बारामती तालुक्यातील सावंतवाडी येथील शाळेवर शिक्षक म्हणून रुजु झालो. त्यानंतर साहेबांशी भेटीचा योग आलाच नाही. साहेब पुण्याला शिकायला गेले, त्यानंतर राजकारणात गेले, आमच्या गाठीभेटी होईनाश्या झाल्या.  परंतू हायस्कुलला असेपर्यंत मात्र ज्यावेळी साहेब कन्हेरीला जात असत, त्यावेळी माझ्या आईला भेटल्याशिवाय रहात नसत.

माझा प्राथमिक शिक्षक म्हणून प्रवास सुरूच राहिला. दररोज कन्हेरीवरून सायकलवरून सांवतवाडीला जाऊन येऊन करायचो. सकाळी आठला घर सोडल की रात्री आठलाच परत. त्यानंतर खात्यामार्फत दोन वर्षासाठी डीएडला पाठवले. तेथून पुढची सगळी सर्व्हीस दौंड तालुक्यातच झाली. हातवळण, कानगाव येथे खुप काळ काम केले. सासुरवाडी हातवळणची मिळाली. तेथेच स्थायिक झालो.

साहेबांची परत एकदा गाठ पडली हातवळणमध्येच. साहेब दुष्काळी दौऱ्यासाठी आले होते. गावातल्या मंदीरात सभा सुरु होती. समोरच्या गर्दीत मला बसलेले पाहून साहेबांनी मला बोलावून घेतले. एवढ्या मोठमोठ्या लोकांसमोर मला ओळख दाखवली. माझ्या तर डोळ्यात टचकन पाणी आले. साहेबांनी सगळी चौकशी केली, घरचे कसे आहेत, मुलगा काय करतो हे विचारले. मुलगा आठवी नापास.मुलाला नोकरी नाही म्हणल्यावर त्याला मुंबईला बोलावून घेतले. त्याला मार्गदर्शन करून मुंबईला गव्हर्मेंट प्रेसमध्ये काम मिळवून दिले. दुष्काळी दौऱ्यात आले असताना त्यांच्या हस्ते एक झाड लावले होते. त्या झाडाची जोपासना गावकऱ्यांसोबत केली, ते झाड आज जोमाने उभे आहे.

माझा शिक्षकी पेशा चालूच होता. सहाय्यक शिक्षक होतो, त्यानंतर मुख्याध्यापक झालो. त्यावेळी माझा परिपाठ सर्वत्र दौंड तालुक्यात प्रसिद्ध होता. अनेक शाळांमध्ये मला परिपाठ म्हणण्याची बोलावत. अनेक शाळातील शिक्षकांनी या परिपाठाचे रेर्काडींग करून घेतले. 1996 सालात हातवळण येथेच मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालो.

अनेक विद्यार्थी हाताखालून गेले. सावंतवाडी येथे सावंत नावाचा एक लाडका विद्यार्थी होता. आता तो कलेक्टर आहे, अजुनही अनेकदा येतो, फोनवरून चौकशी करतो.

72 च्या दुष्काळानंतर साहेबांची भेट नाहीच. एकदम भेट झाली ती 2005 मध्ये. मी भीमा पाटस कारखान्याच्या मोळीपूजन समारंभासाठी गेलो होतो. खूप गर्दी होती. साहेब सभास्थानावर आले. मी समोरच्या गर्दीत बसलो होतो. कस कोण जाणे साहेबांची माझ्याकडे लक्ष गेलं. त्यांनी शेजारी बसलेल्या राहूल कूल यांना विचारलं, या माणसाला ओळखतोस का तु ?  कुल म्हणाले, नाही. त्यावर साहेब म्हणाले, अरे हा भिवा शेलार आहे, माझा मित्र.  त्यांनी मला बोलावयाला सांगितले.  मी साहेबांकडे गेलो. साहेबांनी पाठीवर थाप टाकली आणि म्हणाले, काय, भिवा. माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागले. तोंडातून शब्द फुटेना. काही वेळानंतर मी सावरलो. तेवढ्या गर्दीतही साहेब माझ्याशी दहा पंधरा मिनिटे बोलत होते. ते बोलत होते आणि मी ऐकत होतो. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होतो.

हे दृष्य सकाळचे पत्रकार रमेश वत्रेंनी पाहिलं, त्यांनी चौकशी केली. त्याच दिवशी ते माझ्या घरी हातवळणला आले. दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये बातमी आली. बातमी आल्यावर तर मी एकदम प्रसिद्ध झालो. अनेक जण आवर्जून भेटायला आले. आतापर्यंत मी रिटायर्ड मुख्याध्यापक होतो, आता शरद पवारांचा मित्र भिवा शेलार झालो.

यानंतर मात्र अनेकदा भेटी झाल्या. त्यानंतर दिवाळीच्या पाडव्याला साहेंबाची भेट कधी चुकवली नाही.  प्रत्येक वेळेस साहेब भेटल्यावर पाठीवर थाप मारणार, ये भिवा म्हणून बोलावणार. या पाडव्यालाही मला पाहिल्यावर साहेबांनी माझा हात हातात घेतला. जवळच सुप्रिया उभी होती. तिला म्हणाले, याला ओळखलस का? हा माझा मित्र भिवा शेलार. बराच वेळ मी साहेबांच्या हातात हात देऊन उभा होता. अखेर रांगेतले लोक नाराजी दाखवू लागले. त्यावेळीस मी पुढे गेलो. बोलता बोलता साहेबांनी मला सांगितले की आता माझ्याकडे काही काम असेल तर दिल्लीला येऊ नको. अगोदर चौकशी करून मुंबईला ये किंवा बारामतीत ये.

यापूर्वी पेपरमध्ये बातमी आल्यावर अनेक लोक माझ्याकडे येत. साहेबांकडे काम आहे, त्यांच्याकडे घेऊन चला म्हणत. अशा अनेकांच्या अडलेल्या कामांसाठी मी साहेबांकडे मुंबईला तसेच दिल्लीलाही गेलो आहे. प्रत्येक वेळी साहेबांनी मला लगेच वेळ दिला आणि कामेही मार्गी लावून दिली. पण कधी वैयक्तिक कामासाठी साहेबांकडे गेलो नाही. साहेबांना पायाला लागल्याचे कळले. मी ऑपरेशनच्या वेळी भेटायला गेलो. मला तिथे आलेला पाहून साहेबांनाही गहिवरून आले.

अनेकदा साहेब चेष्टा करतात, अरे भिवा, आता किती दिवस सरकारची पेन्शन खाणार.  खरं आहे, आता पेन्शनरचेच आयुष्य जगतो आहे. आईवडील खुप गरीब होते. सरपण विकून त्यांनी आम्हाला वाढवलं. पण त्यांनी आम्हाला शिक्षण दिले आणि चांगले संस्कार दिले. आयुष्यात कोणतेही व्यसन केले नाही. पंढरपूरची यात्रा चुकवली नाही. साधे सरळ आयुष्य जगत राहिलो. पण साहेबांचे प्रेम पाहिले की मन भरून येतं. आता इतक्या वेळा साहेबांबरोबर भेटी झाल्या, बोलण झालं. पण त्यांच्याबरोबरचा एकही फोटो नाही काढलेला. पेपरला बातमी आली होती. त्याचे कात्रण ठेवले होत बरेच दिवस, आता ते कुठे गेले काय माहित. त्याची काही गरजच नाही मला. साहेब माझ्या मनात घर करून आहेत. तेवढं पुरेसे आहे मला.

——————————-शब्दांकन – घनश्याम केळकर—————————————————————–

2 thoughts on “सखे आणि सोबती – भिवा शेलार”

  1. शेलार साहेब आपण पांडुरंग भक्त असल्यामुळे दरवर्षी पंढरपूरला जात होता पण तिथे मुर्तीरुपी पांडुरंगाच दर्शन व्हायच पण सजीवरुपी पांडुरंग तर आ पवार साहेबांची भेट झाल्यावर तुमच्या आनंदाला पारावारच नसायचा हे समजल आणी तुमची पांडुरंगावरील श्रध्दा अपार होती म्हणून आ पवार साहेब भेटले.मानसातला देव भेटला हे काय कमी आहे ? मी लहान आहे पण आ साहेबांवर माझी श्रध्दा अपार आहे म्हणून विचार मांडले.

    Like

  2. अाभिप्रायाबाबत धन्यवाद. पवारसाहेबांचे असे असंख्य कार्यकर्ते आहेत, ज्यांना ” शरद पवार” या धाग्याने जोडलेले आहे. यातील जमेल तितक्या लोकांना भेटून त्यांचे अनुभव जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपलीही साथ आम्हाला हवी आहे.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.