अरेबियन नाईटस सूत्रकथा

अरेबियन नाईटस व एक हजार एक गोष्टी हा प्राचीन कथासंग्रह ज्या कथासूत्रात बांधलेला आहे. ती मुळ कथा….    या कथेतील राणी राजाला एक हजार एक रात्री गोष्टी सांगत राहते आणि त्यातून त्याचे मनपरिवर्तन करते याची ही मनोरंजक कथा

अरबस्थानातील एका बादशहाला दोन मुले होती.  बादशहाच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य त्याच्या दोन्ही मुलांमध्ये विभागले गेले. दोन्ही राज्यामध्ये खुपच अंतर होते. त्यामुळे अनेक वर्षात दोन्ही राजांची एकमेकाशी गाठ पडली नाही. एके दिवशी थोरल्या भावाला धाकट्याची खुप आठवण आली. त्याने आपल्या वजिराला बोलावले आणि धाकट्याच्या राज्यात जाऊन त्याची भेट घेण्याची आज्ञा केली. धाकट्याची खुशाली घ्यावी व त्याला आपल्या बरोबरच येथे घेऊन यावे म्हणजे मला त्याला भेटता येईल असे त्याने सांगितले. प्रवासाची तयारी करून वजीर व त्याचा सगळा लवाजमा गावाबाहेरच्या तळावर जाऊन थांबला. सोबत धाकट्या राजासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी दिलेल्या भेटी होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा लवाजमा घेऊन तो निघाला. मजल दरमजल करत वजिराचा प्रवास सुरु झाला. जितक्या वेगाने जाता येईल त्या वेगाने वजिर निघाला होता. पण वाटेतल्या राज्यातून जाताना तेथील राजे, त्यांचे प्रतिनिधी वजिराचे स्वागत करत, त्याच्या स्वागताच्या मेजवान्या होत, भेटी – परतभेटी दिल्या घेतल्या जात. यामुळे वजिराला काही काळ थांबावेच लागे. तरीसुद्धा वजिराने मोठ्या मजला मारत प्रवास सुरू ठेवला होता. काही महिन्याच्या प्रवासानंतर तो धाकट्या राजाच्या राज्याच्या सीमेवर पोचला. तो आल्याची माहिती मिळताच धाकट्या राजाचा वजीर त्याला सामोरा गेला. मोठ्या मानाने त्याला घेऊन धाकट्या राजाकडे घेऊन गेला. भेटी गाठी झाल्या. वजिराच्या आगमनासाठी मेजवानी झाली. त्यानंतर वजिराला मोठ्या प्रवासातून आल्यामुळे सात दिवसाची विश्रांती घेण्याची धाकट्या राजाने आज्ञा केली. विश्रांतीचा काळ संपल्यावर वजिर धाकट्या राजाकडे गेला. त्याने त्याच्या भावाचा निरोप दिला. थोरल्याचा निरोप ऐकून धाकट्याच्या डोळ्यात पाणी आले. त्यालाही आपल्या थोरल्या भावाची खूप आठवण आली. तो वजिराला म्हणाला, “शक्य असत ना, तर मी लगेच असाच उठून त्याला भेटायला आलो असतो. पण थोड थांब, मी माझ्या राज्याची व्यवस्था लावतो. काही दिवसात आपण निघू, मीदेखील माझ्या भावाला भेटायला आतूर झालो आहे. ”

काही दिवसांनी धाकट्याने वजिराला प्रवासाला निघण्याची तयारी करण्यासाठी निरोप पाठवला. वजिराने सर्व तयारी केली. धाकटाही सर्व लवाजमा घेऊन आला. गावाबाहेर दोघांचाही पहिला मुक्काम पडला. रात्री धाकट्याच्या लक्षात आले की आपण थोरल्यासाठी घेतलेली भेटवस्तू तर महालातच राहिली. ती घेण्यासाठी तो तातडीने शहरातील आपल्या महालात आला. त्याच्या शयनकक्षात येऊन बघतो तर त्याची आवडती राणी आचाऱ्याच्या मिठीत त्याच्याच पलंगावर झोपलेली आहे. ते दृश्य पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने तरवार उपसली आणि एकेका घावात दोघांचीही मुंडकी धडावेगळी केली. तसाच तो परत गावाबाहेर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासास सुरवात झाली. वजिराने धाकट्याकडे पाहिले तर चेहरा एकदम उतरलेला. काय झाल त्याला कळेना. त्याने विचारले तर धाकटा काही सांगेना. धाकट्याच्या मनात एकच विचार घोळत राहिला. आपल्या आवडत्या राणीने आपल्याशी असा विश्वासघात कसा काय केला. आपण कोठे कमी पडलो की तिला आपला दरिद्री नोकर आवडावा. विचार करूर करून त्याचे डोके भणाणून गेले. जेवणावरची वासना उडाली. झोप येईनाशी झाली. एकीकडे प्रवास सुरूच होता. वजिरालाही चिंता वाटू लागली. तो सतत धाकट्याजवळ राहू लागला. त्याने प्रवासाचा वेग कमी केला. जागोजागचे मुक्काम वाढवले. धाकट्याला आनंदी ठेवण्यासाठी जे करता येईल ते करण्याचा त्याने प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. धाकट्याच्या चेहऱ्यावरची उदासी काही गेली नाही.

प्रवास करता करता अखेर ते थोरल्याच्या राज्यात येऊन पोचले. धाकट्याच्या येण्याची खबर मिळताच थोरला घाईघाईने त्याला भेटायला आला. त्याने धाकट्याला मिठी मारली. धाकटाही थोरल्याला पाहून आनंदला. पण त्याच्या चेहऱ्यावरची उदासी थोरल्याला जाणवली. पण त्याला वाटले की मोठा प्रवास झाला आहे, त्यामुळे धाकटा दमून गेला असेल. थोडी विश्रांती मिळाली की होईल ठीक.  त्यामुळे त्याने धाकट्याला विश्रांती मिळावी म्हणून वेगळा महाल नेमून दिला. दासदासी दिमतीला दिले, खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था लावून दिली. असेच काही दिवस गेले पण धाकट्याच्या चेहऱ्यावरची उदासी जाईना. आवडत्या राणीने केलेला विश्वासघात त्याच्या मनावर मोठा आघात करून गेला होता. थोरल्याला धाकट्याची अवस्था पाहवेना. त्याचे मन रमविण्यासाठी नेमके काय करावे हेदेखील त्याला कळेना. अखेर त्याला शिकारीला जाण्याची युक्ती सुचली. शिकारीच्या निमित्ताने धाकट्याला या  वातावरणातून बाहेर काढता येईल. या बदलाने कदाचित त्याची तब्येत सुधारेलही असे त्याला वाटून गेले. त्याने शिकारीची सर्व तयारी केली. धाकट्याकडे येऊन त्याला म्हणाला, ” भाऊ, चल आपण शिकारीला जाऊ, तेवढेच तुझे मन रमेल, ” पण धाकट्याने नकार दिला. अनेकदा आग्रह करूनही तो तयार होईना. मात्र त्याने थोरल्याला मात्र शिकारीला जाण्यास सांगितले, ” ऐवढी सगळी तयारी केली आहे तर तु मात्र जाऊन ये. मी येथेच महालात राहून विश्रांती घेतो.” हे ऐकून थोरलाही शिकारीला निघून गेला.

थोरला गेल्यानंतर काही वेळाने धाकटा उठला आणि महालात येरझारा घालू लागला. अचानक त्याची नजर खिडकीबाहेर गेली. बाहेरील बागेत थोरल्याची आवडती राणी तिच्या दासींना घेऊन आली. तिच्यामागोमाग एक काळा निग्रो त्याच्या काही साथीदारांसह आला. त्यांनी राणी आणि तिच्या दासींबरोबर प्रेमाचे खेळ सुरु गेले. पहिल्याने तर धाकट्याचा विश्वासच बसेना. काही वेळ समोरचा प्रकार पाहून धाकटा परत आपल्या जागी येऊन बसला. आपलीच बायको नाही, तर थोरल्याची बायकोही त्याचाशी प्रामाणिक नाही या विचाराने त्याचा थोडे बरे वाटले.  आपल्या बायकोच्या विश्वासघाताला तो स्वत:ला जबाबदार धरत होता. परंतू आता त्याची या अपराधीपणाच्या भावनेतून सुटका झाली. त्याने जेवण मागवले. व्यवस्थित जेवण केले. त्या रात्री त्याला कितीतरी दिवसांनी चांगली झोप लागली. एक दोन दिवसात त्याच्या चेहऱयावर चांगलाच तजेला आला. दोन दिवसांनी थोरला शिकारीवरून परत आला. धाकट्याकडे आल्यावर त्याला त्याच्यातील बदल जाणवला. तो त्याला म्हणाला, भाऊ, आता तु पहिल्यापेक्षा बरा दिसतो आहेस, चेहऱ्यावरही चमक आली आहे. दोन दिवसात असे काय झाले की तुझी तब्येत अशी सुधारली ?. धाकटा म्हणाला, मला आता बरे वाटते आहे हे खरे, पण यामागचे कारण मात्र विचारू नकोस.

हे ऐकून तर थोरल्याची उत्सुकता वाढतच गेली. धाकट्याची तब्येत कशी सुधारली याचे कारण सांगण्यासाठी तो सतत आग्रह करू लागला. धाकट्याने अखेर सांगितले, भाऊ, हे कारण तुला कळले तर तु मात्र दु:खी होशील. आता तर थोरला हट्टालाच पेटला, मला हे कारण कळलेच पाहिजे. '  अखेर धाकट्याने त्याने जे पाहिले होते ते सारे सांगितले.थोरल्याला हे पटेनाच. आपली बायको असे वागेल यावर त्याचा विश्वासच बसेना. शेवट धाकटा म्हणाला, तुझा विश्वास बसणार नाही हे मला माहितच होतं. आता एक काम कर, मागल्या वेळेप्रमाणेच शिकारीला जायचे जाहिर कर, सगळा लवाजमा घेऊन गावाबाहेर जा. आणि मग गुपचुप परत येऊन येथे माझ्याजवळ येऊन बस. मी तुला प्रत्यक्षच दाखवतो. त्यानंतर तर तुझा विश्वास बसेल. '  थोरल्याने त्याप्रमाणेच केले.  थोरला शिकारीला गेला असे समजून त्याची बायको पुन्हा आपल्या दासींसह व त्या निग्रो गुलामांना बरोबर घेऊन बागेत हजर झाली आणि पुर्वीचाच खेळ त्यांनी पुन्हा सुरू केला. हे पाहून थोरल्याचा संताप अनावर झाला. हातात तलवार घेऊन तो बागेत धावला. तलवारीच्या घावाखाली त्याने आपल्या राणीचे आणि तिच्या प्रियकराचे मुंडके उडवले. मात्र त्याच्याही मनावर दु:खाचे सावट पसरले. धाकटा म्हणाला, माझ्या बायकोने मला असेच फसवले, त्यामुळे मी स्वत:ला दोष देत होतो. पण तुझ्या बायकोनेही तुला फसवलेले मी पाहिले, त्यामुळे माझ्या लक्षात आले की बायका अशाच विश्वासघातकी असतात. ' थोरला म्हणाला, `होय रे होय, तु म्हणतोस ते खरेच आहे. मला तर या सगळ्या संसाराचाच वीट आला आहे. आपण दोघेही हे सगळं सोडून जाऊ. ‘ धाकट्याच्या मनात तेच होते. दोघेही महालाच्या मागच्या दारातून बाहेर पडले. कोणीही त्यांना जाताना पाहिले नाही. चालत चालत ते शहराच्या बाहेर समुद्रकिनाऱ्यावर येऊन पोचले.

दोघेही चालत चालत शहराबाहेर आले. तसेच चालता चालता समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. थोड्या वेळ तिथे बसले असता अचानक मोठा भुकंप झाल्यासारखा आवाज येऊ लागला, पायाखालची जमीन हादरू लागली. दोघेही घाबरून जवळच्या एका झाडावर चढून बसले. समोरच्या समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या. त्यातून एक भयंकर राक्षस वर आला. त्याच्या हातात एक मोठी पेटी होती. ती पेटी घेऊन तो किनाऱ्यावर आला.  किनाऱ्यावर आल्यावर त्याने ती पेटी खाली ठेवली. आपल्या कमरेला लटकावलेल्या सात किल्ल्या काढल्या. त्यानी त्या पेटीला लावलेली सात कुलुपे उघडली. आणि ती पेटी उघडली. त्या पेटीत एक सुंदर तरुण मुलगी होती. त्या मुलीला त्याने बाहेर काढले.

त्या मुलीकडे बघून तो राक्षस म्हणाला, माझ तुझ्यावर प्राणापलिकडे प्रेम आहे. त्यामुळेच तु कुणा दुसऱ्याच्या नजरेत आलेलीसुद्धा मला चालणार नाही. त्यामुळेच तुझ्या बापाने तुझे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरविले त्यावेळी लग्नघरातून मी तुला पळवून आणले. त्यानंतर तुला या पेटीत बंद करून ही पेटी समुद्राच्या तळाशी टाकून दिली. ज्यावेळी मला तुला बघायचे असेल त्यावेळेसच मी ही पेटी बाहेर काढतो. माझ्याखेरीज इतर कुणा पुरुषाच्या नजरेसह तु कधी पडणार नाहीस. असे बोलून काही काळाने त्या राक्षसाने त्या मुलीच्या मांडीवर डोके ठेवले आणि तो झोपी गेला. राक्षस गाढ झोपला आहे हे पाहून त्या मुलीने आजुबाजुला नजर फिरविली. झाडावर चढून बसलेले दोघेही जण तिच्या नजरेत आले. तिने खुणेनेच त्यांना खाली उतरण्यास सांगितले. ते खाली उतरले. तिने हळूच राक्षसाचे डोके आपल्या मांडीवरून खाली ठेवले आणि त्या दोघांना जवळ बोलावले. ते जवळ आल्यावर ती त्यांना म्हणाली, या राक्षसाला पाहिलेत ना, त्याच्यापासून तुम्हाला फक्त मीच वाचवू शकते, पण त्यासाठी तुम्हाला माझे एक काम करावे लागेल. " तुम्हाला दोघांना आळीपाळीने माझ्याबरोबर संग करावा लागेल" हे ऐकल्यावर ते दोघेही म्हणाले, " बाई, ज्याला कंटाळून आम्ही लांब पळतो आहोत, तेच तु आम्हाला करायला सांगते आहेस." त्यावर ती मुलगी म्हणाली, " ते मला काही सांगू नका, तुम्हाला जिवंत रहायचे असेल तर मी सांगते तसे वागावेच लागेल, नाहीतर मी या राक्षसाला उठवते, तो उठला की तुम्हाला खाऊनच टाकेल. " मनात नसतानाही राक्षसाच्या भितीमुळे त्या दोघांनीही तिची इच्छा पूर्ण केली. त्यानंतर तिने सांगितले, " तुमच्या दोघांच्याही अंगठ्या मला काढून द्या. तिने त्या अंगठ्या तिच्याकडील एका तारेत गुंफलेल्या अंगठ्यांमध्ये अडकवून टाकल्या. त्यानंतर दोघांकडे वळून ती म्हणाली, " आता तुम्ही जाऊ शकता, पण त्याअगोदर जरा ऐका, या अंगठ्या पहिल्यात का ?, तुमच्या अंगठ्या धरून या शंभर अंगठ्या आहेत. "  त्या झोपलेल्या राक्षसाकडे हात दाखवून ती म्हणाली, " या मुर्खाने मला लग्नाच्या दिवशीच उचलून आणले. त्यानंतर मला या पेटीत टाकून समुद्रतळाशी ठेवले. या मुर्खाला असे वाटत होते की, आता त्याच्याशिवाय माझ्याकडे कोणी बघणारही नाही, पण बघा या शंभर अंगठ्या, या मी ज्यांच्याबरोबर संग केला अशा पुरुषांच्या आहेत. जर एखाद्या स्त्रीच्या मनात असेल तर जगातील कोणतीही शक्ती तिला या गोष्टीपासून अडवू शकत नाही. "

हे ऐकल्यावर दोघेही राजे तेथून निघून गेले. जगात कोणतीही स्त्री प्रामाणिक नाही, यावर त्यांचा पुर्ण विश्वास बसला.  त्यानंतर थोरला राजा त्याच्या राज्यात परत गेला. स्त्रीयांवर सुड उगवण्यासाठी त्यांने अतीशन अघोरी प्रकार सुरु केला. दररोज एका कुमारिकेबरोबर लग्न करायचे, तिच्याबरोबर रात्र घालवायची, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला मारून टाकायचे असा क्रम त्याने सुरू केला. त्यामुळे व्याभिचार करण्याची संधीच तिला मिळणार नाही असा त्याचा दावा होता. मात्र त्यामुळे त्याच्या राज्यात हलकळ्ळोल माजला. अनेकांनी विरोध करून पाहिला, ज्यांना तरुण मुली होत्या, अशा हजारो नागरिकांनी राज्य सोडून पलायन करायला सुरुवात केली. पण स्त्रीद्वेषाने आंधळ्या झालेल्या राजाने हे सुडचक्र सुरूच ठेवले.  राजाला दररोज एक कुमारिका मुलगी पुरविण्याची जबाबदारी त्याच्या वजिरावर होती. त्या वजिरालाही दोन तरुण मुली होत्या. दररोजच्या या हत्या वजिराच्या थोरल्या मुलीला बघेनाशा झाल्या. अखेर एक दिवस तिने एक निर्णय घेतला. तिने तिच्या वडिलांना सांगितले कि मला राजाकडे घेऊन जा, मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. अर्थातच वजिर आपल्या मुलीवर खुपच संतापला. पण मुलगी काही बधली नाही. त्याने वेगवेगळ्या प्रकारे तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. अखेर तिने वजिराला सांगितले, ” जर तुम्ही मला राजाकडे घेऊन गेला नाहीत, तर मी स्वत: जाईन, त्यावेळी तुम्ही मला येऊ देत नव्हता हे राजाला सांगेन. ” आपल्या मुलीचे हे बोलणे ऐकून चिडलेला वजिर म्हणाला, ” ठिक आहे मग, तुला मरायची हौसच आली असेल तर मर बापडी. तुझ्याबरोबर आम्हाला कशाला मारतेस. मी तुला राजाकडे घेऊन जातो.” राजाकडे जाण्यापूर्वी थोरलीने आपल्या धाकट्या बहिणीची भेट घेतली.  तिला सांगितले कि राजाबरोबर माझे लग्न झाले की पहाटे तुला राजाकडून बोलावणे येईल, त्यावेळी तु तातडीने निघून ये. ”

वजिर थोरलीला घेऊन राजाकडे गेला.  माझ्या मुलीचे तुमच्याशी लग्न लावून देण्याची माझी तयारी आहे असे त्याने राजाला सांगितले. राजा त्याला म्हणाला, ” तुुुुझ्या मुलीचा जीव जावा अशी माझी इच्छा नाही, हिच्याऐवजी तु दुसरी एखादी मुलगी आणलीस तरी चालेल, पण एकदा या मुलीबरोबर लग्न झाले की उद्या तिचे मरण अटळ आहे हे मात्र लक्षात ठेव. ”  त्यावर वजिर म्हणाला कि माझ्या मुलीलाच तुमच्याशी लग्न करायचे आहे. त्यामुळे माझा निर्णय पक्का आहे.

अर्थातच लगेचच लग्नाची तयारी झाली. लग्न पार पडले. लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी वधुवर त्यांच्या महालात गेले. ती रात्र संपून पहाट होऊ लागली. त्यावेळी राजाला जाग आली. त्यावेळी त्याच्या नवीन वधुलाही जाग आली. राजाकडे पाहून ती म्हणाली, ” महाराज, आता मला झोप लागेल असे वाटत नाही. थोड्याच वेळात मी मरणार आहे, त्यापूर्वी माझ्या धाकट्या बहिणीला भेटावे अशी माझी इच्छा आहे. ही माझी शेवटची इच्छा तुम्ही पुर्ण करावी. ”  तिने असे म्हणताच राजानेही संमती दिली. त्याने शिपाई पाठवले आणि धाकटीला बोलावून घेतले. दोघी एकमेकीच्या गळ्यात पडून खुप रडल्या. थोड्या वेळाने सावरून धाकटी थोरलीला म्हणाली, ” अग ताई, तु दररोज रात्री मला किती छान छान गोष्टी सांगायचीस, आता मला कोण त्या गोष्टी सांगणार, आता तुझी माझी भेट होणार नाही, त्यापूर्वी मला तुझी आठवण म्हणून एखादी छान गोष्ट सांग ना!” त्यावर थोरली म्हणाली, ” ठिक आहे, मलाही आता झोप येत नाही. सांगते तुला एक छान गोष्ट.” असे म्हणून तिने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. बाजुला बसलेला राजा ही गोष्ट ऐकतच होता. थोड्या वेळातच सुर्य उगवला. सुर्य उगवलेला पाहिल्यावर थोरलीने गोष्ट सांगणे थांबवले आणि म्हणाली, ” आता सुर्य उगवला आहे. माझ्या मरणाची वेळ आली आहे. जर राजाने माझा जीव वाचवला तरच ही गोष्ट मी पुर्ण करू शकते, नाहीतर आता ही गोष्ट अपूरीच राहणार. ”

राजाही ही गोष्ट ऐकण्यात मग्न झाला होता. या गोष्टीत पुढे काय होते हे ऐकण्याची त्यालाही मोठी उत्सुकता लागून राहिली होती. त्याने विचार केला कि हिला आणखी एक दिवस जिंवत ठेवल्याने असे काय नुकसान होणार आहे.  तिची गोष्ट संपली की उद्या तिला मारून टाकला येईलच. त्यामुळे त्याने तिला मारण्यासाठी आणखी एक दिवसाची मुदत दिली. त्यानंतर राजा उठून त्याच्या कामाला लागला. तो दरबारात हजर झाला. त्यााचा वजिर खांद्यावर कफन टाकून दरबारात आला. आपल्या मुलीचे प्रेत घेऊन जावे लागणार या चिंतेने तो व्याकुळ झाला होता. आपली मुलगी अजुन जिंवत आहे, हे एेकून त्याला जरा बरे वाटले. राजाने दिवसभर त्याची सर्व कर्तव्ये पार पाडली. रात्री जेवण झाल्यावर तो महालात परतला. त्याची वधू व तिची बहिण त्याची वाट पहात होते. तो ऐकल्यावर थोरलीने तिची गोष्ट पुढे सुरू केली. पुर्ण रात्र संपली पण गोष्ट संपली नाही. पुन्हा सुर्य उगवलेला पाहून थोरली थांबली. तिने कालचेच वाक्य पुन्हा म्हणले, ”  जर राजाने आणखी एक दिवस माझा जीव वाचवला तर मी ही गोष्ट पुरी करेन. ” राजानेही तिचे म्हणणे ऐकून तिला आणखी एक दिवस दिला. त्या रात्रीही गोष्ट पुरी झाली नाही.

असे करता करता एक हजार रात्री गेल्या. प्रत्येक दिवशी राजा तिच्या गोड गोष्टी ऐकण्यासाठी तिचे मरण पुढे पुढे ढकलत राहिला आणि तिच्या मनोरंजक गोष्टी ऐकत राहिला. या काळात तिला दोन मुलेही झाली. एका गोष्टीच्या मध्यात दुसरी गोष्ट सुरु होई. त्यातून दुसरी सुरू होई.  राजांच्या, राण्यांच्या, चांगल्या आणि वाईट माणसांच्या, माणसांचे चित्रविचित्र स्वभाव सांगणाऱ्या, प्राण्यांच्या कथा, भुताखेताच्या कथा अशा अनेक गोष्टी तिने सांगितल्या. अखेर एक हजार एक दिवसानंतर तिची गोष्ट संपली. त्यानंतर आपल्या दोन लहान मुलांना घेऊन ती राजासमोर आली आणि त्याला म्हणाली, ” आता मला तुम्ही मारू शकता, पण मला सांगा इतके दिवस मी तुमच्याशी संसार केला, माझे पाऊल वाकडे पडलेले तुम्हाला कधीतरी दिसले. हे राजा, जगात वाईट चालीच्या स्त्रीया असतात तशा चांगल्या चालीच्याही असतात. एकीवरून सगळ्यांशी परिक्षा करणे योग्य ठरणार नाही. ”  अर्थातच या काळातील तिच्या गोष्टी ऐकून राजाचे मन पालटले होतेच. त्यामुळे त्याने तिला मारण्याचा विचार सोडून दिला.

या काळात तिने सांगितलेल्या गोष्टींचा संग्रह म्हणजे अरेबियन नाईटसच्या एक हजार एक गोष्टी होय.

———————————————————————————————————————-

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.